पूर्वीचे लोक भविष्यातल्या पिढय़ांनी आपल्याला काय आणि कसे म्हणून ओळखावे याबद्दल फारच जागरूक होते. पूर्वजांची चित्रे आठवून बघा. काय मस्त पोज द्यायचे ते! आजूबाजूला भुसा भरलेले वाघ-सिंह, किंवा मिशीला ताव देताना, किंवा उगा ‘चला पुढे..’ म्हणत हात उंचावताना, किंवा हातात काठी घेऊन काय मस्त दिसायचे आपले पूर्वज! स्त्रिया असतील तर त्या हातात हुंगायला एखादे फूल घेऊन किंवा स्वत:ला पंख्याने वारा घालताना वगैरे मस्त चित्र काढून घ्यायच्या. आपले पूर्वज किती महान वगैरे होते याची जाणीव येणाऱ्या पिढय़ांना त्यामुळे व्हायची. आपल्या येणाऱ्या पिढय़ा आपल्या पिढीला काय म्हणून ओळखणार आहेत याची मला सध्या फारच काळजी लागून राहिली आहे. आपल्या काळातील स्त्रिया या तोंडाचा चंबू करून वाकडय़ा मानेच्या जन्माला यायच्या असा समज भविष्यातल्या पिढय़ांचा होईल की काय अशी मला भीती वाटते आहे. पूर्वी कसे दोन स्त्रिया एकत्र आल्या की एकमेकींना कुंकू लावायच्या, तशा आता त्या एकत्र आल्या की तोंडाचा चंबू करतात, मान वाकडी करतात आणि सेल्फी काढतात. दोन पुरुष- दोन स्त्रिया, एक पुरुष- एक स्त्री, पाच-दहा पुरुष किंवा पाच-दहा स्त्रिया यापैकी कोणीही कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये एकत्र आले तर काय करतात, याचे उत्तर ‘ते सेल्फी काढतात’ असेच आहे. आपल्या मोबाइलवरचा डेटा उडाला नाही व तोपर्यंत टिकला तर पाचपन्नास वर्षांनी जेव्हा आपल्या भावी पिढय़ा आपले सेल्फी एकमेकांना दाखवत असतील तेव्हा ‘ते बघ- ती कॅमेऱ्यात बघून डोळा मारतेय ना, ती माझी आजी.. आईची आई! आणि घोडय़ावर बसल्याची नक्कल करतोय ना, ते माझे आजोबा. आणि पाठमोरे वाकून दोन्ही पायांतून कॅमेराकडे बघतायेत ते माझ्या आजोबांचे थोरले भाऊ . मागच्या वर्षी वारले ते..’ अशी ओळख करून देतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सगळ्या देशालाच आज सेल्फी काढायच्या वेडाने ग्रासले आहे. बघावं तो आज धावपळीत आहे. त्याला तो एसटीत बसला त्याचे फोटो काढायचेत. एसटी पंक्चर झाली त्याचे फोटो फेसबुकवर टाकायचेत. तिला तिने फोडणीचा भात केला, किंवा डोक्याला लावायची नवी पिन घेतली, तर ताबडतोब फेसबुकवर टाकायचे आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची सगळी दगदग कशासाठी? तर सेल्फी किंवा फोटो काढायला मिळावा यासाठीच! आमच्या शेजारचे एक आजोबा वारले. एक नातलग मुलगी वेळेवर पोहोचली नाही. आणि अंत्यसंस्कार होऊन गेलेत हे कळल्यावर तिने हंबरडाच फोडला. आजच्या काळात एखाद्याचे असे निव्र्याज प्रेम पाहायला मिळाले म्हणून मला भरून आले. नंतर कळले, की तो माणूस गेला म्हणून तिला फारसे दु:ख झाले नव्हते. तिची मृतदेहाबरोबर सेल्फी काढायची आणि फेसबुकवर टाकायची संधी हुकली म्हणून तिला भरून आले होते.

मराठीतील सर्व बघ्याची भूमिका बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandar bharde article on selfie
First published on: 14-05-2017 at 04:20 IST