१९८८ साल असावे. ते तिसऱ्या महायुद्धाचे दिवस होते. मला आजही नाशिक शहरातला तो भयाण दिवस आठवतो. रशियन फौजा संगमनेपर्यंत आल्या होत्या. जर्मन फौजा कधीही कसारा घाट चढतील आणि इगतपुरीच्या दिशेने कूच करतील अशी शक्यता होती. शहराच्या मुख्य रस्त्यावरून रणगाडे फिरत होते आणि वातावरणातील तणाव वाढवत होते. स्कूलबसचा कुठे पत्ताच नव्हता. त्यामुळे घरी कसे जायचे, या विवंचनेत मी आणि माझे मित्र शाळेबाहेर उभे होतो. शेवटी मीच धाडस केले. (मी पूर्वीपासूनच धाडसी आहे. आणि संकटाला अजिबात डगमगत नाही.) तेव्हापासूनच माझे मित्र मला ‘डेअर डेव्हिल’ म्हणतात. मी एका रणगाडय़ाला हात दाखवला आणि ‘नाही तरी रिकामाच आणि विनाकारणच फिरतो आहेस, तर मला आणि माझ्या मित्रांना इंदिरानगरला सोडतोस का?’ असे विचारले. तो ‘हो’ म्हणाला. आम्ही सिटी बसच्या भाडय़ापेक्षा जास्त पैसे देऊ  शकणार नाही, असेही बजावून सांगितले. रणगाडा या वाहनाविषयी माझा त्यावेळी जो भ्रमनिरास झाला तो आजही कायम आहे. फक्त एका माणसाला मान वर काढून बघता येते. बाकी आम्ही सगळे गाडीच्या डिकीत सामान भरल्यासारखे त्याच्या पोटात बसलो होतो. नंतर कळले, की आम्हाला लिफ्ट देणारा रणगाडा हा मुळात गस्त घालतच नव्हता. त्याला बटाटे आणायला गंगेवर पाठवले होते. पुढचे तीन-चार दिवस जर युद्धाच्या भयाने स्कूलबस सुरूच होणार नसतील तर आम्हाला शाळेत सोडायला आणि न्यायला येशील का, असे आम्ही रणगाडा चालकाला विचारले. त्यावर त्याला युद्धासाठी कधीही बोलावणे येऊ  शकते, त्यामुळे नक्की सांगता येणार नाही, असे तो म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझी बहीण आणि तिच्या मैत्रिणी बंकरमध्ये बसून होत्या. त्यांनी बंकरमध्ये पाव लपवले होते. मी आणि माझ्या मित्रांनी त्यांनी लपवलेले पाव हिसकावून घेऊन खाल्ले. युद्धामुळे सगळ्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती. पाव तर अजिबात मिळायचे नाहीत. खरं तर ते पाव माझ्या बहिणीचे होते. पण मी भुकेने कासावीस झालो होतो. पोट भरल्यावर मला रडू यायला लागले. आपण पाव खाताना आपल्या बहिणीचा विचारदेखील केला नाही म्हणून मी कासावीस झालो. माझी बहीण म्हणाली, ‘दादा, रडू नकोस. हे दिवसही जातील. आपली परिस्थिती पालटेल.’ तिचे म्हणणे खरे ठरले आणि आम्ही दोघेही आज या मोठय़ा पदाला येऊन पोहोचलो आहोत. पण तेव्हाचे दिवस फारच भीषण होते.

मराठीतील सर्व बघ्याची भूमिका बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandar bharde remember the day of third world war in nashik
First published on: 11-06-2017 at 03:20 IST