तुसडय़ा लोकांबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. मागच्या आठवडय़ात माझ्याकडे भरपूर फावला वेळ होता. त्यामुळे त्या वेळातला बराचसा वेळ मी तुसडय़ा माणसांबद्दल चिंतन करण्यात खर्च केला. मी माझ्या वाटय़ाला आलेल्या तुसडय़ा लोकांना आठवायला सुरुवात केली आणि लोकविलक्षण प्रसंगांची रोमांचक मालिकाच माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. त्यातल्या एका तुसडय़ाचे मनोगत जाणून घ्यायचा मी प्रयत्न केला.

अगदी काही दिवसांपूर्वीच घडलेला एक प्रसंग मला आठवतोय. एका ख्यातकीर्त तुसडय़ाबरोबर त्याच्या ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा त्याला एकजण भेटायला आला. हल्ली भेटीच्या वेळी व्हिजिटिंग कार्ड द्यायची कॉर्पोरेट पद्धत प्रचलित आहे. लोक जणू काहीतरी भलतीच जड वस्तू पकडावी तसे दोनही हातांत व्हिजिटिंग कार्ड पकडतात आणि वाकून ते दुसऱ्याच्या हातात देतात. मग दुसराही तसाच दोन्ही हाताने आरतीचे तबक धरल्यासारखा कार्ड समोरच्याला कंबरेत वाकून देतो. ख्यातकीर्त तुसडय़ाने कमरेत वाकून कार्ड देणाऱ्याच्या अदबीकडे दुर्लक्ष केले आणि ‘काय आहे?’ असा रोकडा सवाल केला. समोरच्याने बसू की नको अशा अस्वस्थतेत अर्धवट उभा राहत काहीतरी माहिती द्यायला सुरुवात केली. सुमारे अर्धा मिनिट ते ऐकून घेतल्यावर ख्यातकीर्त त्याला म्हणाला, ‘याचा मला काही उपयोग नाही.’ समोरचा मग जायला निघाल्यावर ख्यातकीर्ताने त्याला थांबवले आणि त्याचे व्हिजिटिंग कार्ड त्याला परत दिले. ‘असू द्या ना साहेब. कधीतरी लागेल,’ असे तो म्हणाल्यावर ख्यातकीर्ताने उत्तर दिले, ‘मला भविष्यात कधीही तुझ्याकडे काहीही काम पडणार नाही, याची तुला नसली तरी मला पक्की खात्री आहे. उगा कशाला मी तुझे कार्ड सांभाळत बसू? आणि कार्ड सांभाळत बसायला तू प्लम्बर नाही, इलेक्ट्रिशियन नाही किंवा कार म्याक्यानिकपण नाही- की अचानक तुझी गरज पडावी. तू आपला घेऊन जा तुझे कार्ड. दुसऱ्या कोणातरी गरजूला दे. उगा माझ्याकडचा पसारा वाढवू नकोस.’ तो बिचारा कार्ड परत घेऊन निघून गेला.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

आपले काही चुकले आहे असे कोणत्याच तुसडय़ा माणसाला कधी वाटत नाही. त्यामुळे ख्यातकीर्तला तसे वाटायचा काही प्रश्नच नव्हता. आपण अनेकदा मग्रुरी किंवा उद्धटपणा आणि तुसडेपणा यांची गल्लत करतो. बहुतांश वेळेला मग्रुरी ही पोज असते. जाणूनबुजून मग्रुरीचा आव आणलेला असतो. तुसडेपणाचे तसे नाही. तुसडेपणाचा आव आणता येत नाही. तुसडेपणा प्रगट होतो. मोठी स्वयंभू अवस्था आहे ती. एखाद्याने मेहनत करून तुसडा व्हायचे ठरवले तरी त्याला तसे होता येणार नाही. तुसडा माणूस असतो किंवा नसतो. मी ख्यातकीर्ताला तो असे का वागला याचा जाब विचारला. त्याला अर्थातच त्यात काही चुकले असे वाटलेच नव्हते.

‘आपण किती करड गोळा करीत बसायचे? पूर्वी मी गोळा झालेली करड आठवडय़ाच्या शेवटी जाळून टाकायचो. नंतर एकदा लक्षात आले- हे भलतेच काम दर आठवडय़ाला आपल्यामागे लागले आहे. करा करड गोळा आणि लावा काडी. मग मी नंतर लोकांकडून कार्डच घेणे बंद करून टाकले.’

‘अरे, पण तुला आपला जनसंपर्क वाढावा, खूप लोकांशी ओळखी व्हाव्यात, आपला चांगला PR  असावा असे कधी वाटलेच नाही का?’

‘छे छे..’ तो झुरळ झटकल्यासारखा म्हणाला, ‘हे PR  वगैरे सगळे झूट आहे. लोक करायला दुसरे काही नाही आणि भरपूर रिकामा वेळ आहे म्हणून मुले जन्माला घालतात. त्यामुळे देशाची लोकसंख्या वाढते. या मोकाट लोकसंख्येतल्या प्रत्येकाशी आपली ओळख असली पाहिजे याचा आग्रह म्हणजे PR. कशाला उगाच फापटपसारा गोळा करायचा? मला तर फार लोकांशी आपली ओळख असावी असेदेखील वाटत नाही.’

‘म्हणजे?’

‘कशाला ओळखी वाढवायच्या? मुळात खूप लोकांशी ओळख असावीशी वाटणे यातच काहीतरी गैर आहे. कशाला पाहिजेत ढीगभर माणसे? खूप अनावश्यक वस्तू घरात साठल्या की कशी अडगळ होते, तशी खूप माणसे ओळखीची झाली की त्यांचेपण गचपण होते. खूप लोकांशी ओळखी करणे म्हणजे पातेलेभर कुरमुरे खाण्यासारखे आहे. पोट भरल्याने पोटाला पार तडस लागतेच पण चिमूटभरही सत्त्व पोटात जात नाही.’

‘अरे, पण माणसे लागतातच ना? शेवटी खांदा द्यायला पण चार लोक लागतात. तू सगळ्यांशी फटकून राहायला लागलास तर कसे जमायचे?’

‘शंभरपैकी नव्वद लोक हे फटकून काय, झटकून टाकायच्या लायकीचेच आहेत. आणि शेवटी चार माणसे कशाला पाहिजेत? तुमचा काय संबंध चार माणसांशी आणि तुमच्या मयताशी? सगळी तत्त्वज्ञाने बोंबलून सांगतात.. आत्मा वेगळा आणि शरीर वेगळे. आणि आत्मा अमर आहे. माणूस मेला म्हणजे शरीर मेले. टरफलात जसा दाणा असतो तसा शरीरात आत्मा असतो. दाणा महत्त्वाचा. आता एकदा हा दाणा निघून गेल्यावर टरफलाची कशाला फिकीर करायची? आता हे शरीररूपी टरफल वाहून न्यायला खांदे मिळाले काय, नाही मिळाले काय? काय फरक पडतो?’

तुसडय़ा माणसांचे काही गुणधर्म असतात. यांना जिभेच्या जागी काटा असतो. आणि तो समोरच्याला टोचेल याची त्यांना अजिबात पर्वा नसते. बहुतांश वेळेला तुसडी माणसे परफेक्शनिस्ट असतात. मी एकदा एका तुसडय़ा मित्राच्या घरात वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. सगळे करतात त्याप्रमाणे वाचून झाल्यावर ज्या पानावर वाचन संपले त्या पानावर मी घडी करून वर्तमानपत्र ठेवून दिले.

‘तुम्ही वर्तमानपत्र कसे वाचता यावरून तुमचे चरित्र कळते?’

काटा टोचायला सुरुवात झाली.

‘म्हणजे? काय झालं?’

‘नाही, तुला कोणी वर्तमानपत्र वाचायला शिकवलेच नसेल तर तू तरी काय करणार? अशी घालतात का घडी वर्तमानपत्राची? वर्तमानपत्र हे जशी घडी घालून घरात येते, तशीच्या तशी घडी घालून परत ठेवता आले पाहिजे. आणि त्याच्या जशा घडय़ा आहेत तशाच उलगडत ते वाचता आले पाहिजे. तुम्ही जर घडय़ा व्यवस्थित घालून वाचले नाही तर नंतर वाचणाऱ्याला शिळे वर्तमानपत्र वाचल्याचा फील येतो. सकाळी वर्तमानपत्र वाचण्यापासून जर तुम्ही गलथानपणा करीत असाल तर तुमचा अख्खा दिवस भोंगळ जाणारच. ज्यांना साध्या गोष्टीत व्यवस्थितपणा जपता येत नाही त्यांच्यावर मोठमोठय़ा गोष्टींसाठी कसे अवलंबून राहावे?’

कितीतरी वर्षे झाली या घटनेला; पण आजही मला आहे तशी घडी ठेवून वर्तमानपत्र वाचता येत नाही. आपण दुसऱ्याला शिळे वर्तमानपत्र करून वाचायला देतो, हा फील कायम मनात राहतो आणि सकाळी सकाळी अपराधी वाटत राहते. समोरच्याला नेम धरून खजील किंवा अपराधी करणे हे तुसडय़ा माणसांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मला अपराधी वाटते, कारण त्या तुसडय़ाला वर्तमानपत्र घडी व्यवस्थित ठेवून वाचता येते आणि मला अजूनही वाचता येत नाही.

एका तुसडय़ाने निवडणुकीच्या वेळेला दारावर पत्र चिकटवले होते.. ‘मी श्री. अमुक अमुक यांना मत द्यायचे निश्चित केले आहे. तेव्हा त्यांनी प्रचाराला यायची काही गरज नाही. आणि इतरांनी कितीही प्रयत्न केले तरी माझे मत बदलणार नाही. त्यामुळे इतरांनीही प्रचाराला यायची गरज नाही.’

तुसडय़ा लोकांबद्दलचा माझा अनुभव असा आहे की, ते नेहमीच किमान एका बाबतीत तरी अतिशय काहीतरी दर्जेदार करीत असतात आणि त्यात त्यांनी पराकोटीची गुणवत्ता प्राप्त केलेली असते. अनेक उत्तम कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर बरीच प्रज्ञावान माणसे तुसडी आढळतात. आणि दुसरे म्हणजे तुसडे लोक नेहमीच जे काही सर्वात दर्जेदार किंवा टोकाचे, लॉजिकल आहे त्याच्या समर्थनार्थ बोलत असतात. तुम्हाला बिनडोक तुसडा जवळजवळ सापडत नाहीच.

जगातल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करणाऱ्या एका परिचित तुसडय़ाला मी विचारले होते की, ‘सगळे जग बिनडोक आहे आणि तुलाच एक अक्कल आहे असे तुला वाटते का?’ तर तो म्हणाला, ‘शक्यता तर तशीच दिसते आहे. बहुतांश लोक बिनडोकच असावेत अशीच परिस्थिती आहे. आणि मला जास्त अक्कल आहे, या वस्तुस्थितीकडेही दुर्लक्ष करून कसे चालेल?’ हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर जराही शरम नव्हती. सर्व तुसडय़ा लोकांचे उर्वरित जगाबद्दल फारसे चांगले मत नसतेच. बहुतांश लोक हे खायला काळ आणि भुईला भारच असतात असे त्यांना वाटत असते. उर्वरित जगाशी जुळवून घ्यायचा ते अजिबात प्रयत्न करीत नाहीत. किंबहुना, उर्वरित जग हे जुळवून घ्यायचे तर सोडाच; पण दखल घ्यायच्या पण लायकीचे नाही याची त्यांना खात्रीच असते. बहुतांश वेळा उर्वरित जगाला तुसडय़ा लोकांच्या प्रश्नांचा प्रतिवाद करता येत नाही. त्यांना खोडून काढायला त्यांच्याकडे समर्थन नसते. बरीच सुमार माणसे तुसडय़ा लोकांच्या बाबतीत ‘तो काहीही बोलतो.. आपण काही त्याचे मनावर घेत नाही,’ वगैरे कारणे देऊन तुसडय़ा लोकांना टाळायचा प्रयत्न करतात. तुसडय़ा लोकांच्या अनेक वर्षांच्या माझ्या अनुभवातून असे लक्षात आले आहे की, एखाद्या माणसाच्या तुसडेपणाचा जेव्हा तुम्हाला राग येत असतो आणि तुम्ही त्याला टाळत असता तेव्हा शक्यता हीच असते, की कोणत्यातरी लोकविलक्षण माणसाच्या सहवासाला आपण मुकत असतो. तुसडा तुम्हाला कधी आपणहून जवळ करणार नाहीच. पण तुम्ही कधी उपाय शोधताय त्यांच्याशी जुळवून घेण्याचा?

मंदार भारदे mandarbharde@gmail.com