गिरीश पांडुरंग कुलकर्णी 

परवा बरं का, सहज अन्याकडे पान खायला गेलो असता म्हणालो की, ‘‘कळलं का तुम्हाला? अभिजीत बॅनर्जी नावाच्या भारतीय माणसाला नोबेल पारितोषिक मिळालं.’’

‘‘नाही, ते मिळू दे. पण आपलं पेमेंट दिवाळीच्या तोंडावर करा. मार्केटमध्ये फुल मंदीए. मला दिवाळीला होतील पशे.’’

अन्यानं शांतपणे लवंग जाळीत धूर काढला. मी चकित होऊन ती मूर्तिमंत स्थितप्रज्ञता पाहत राहिलो. मला शुभ्रवस्त्रांकित अन्यामागे प्रभावळ फिरत असल्याचा भास झाला. खुद्द समर्थानी आपण स्थितप्रज्ञतेविषयी जो काय कल्पनाविलास केला तो तंतोतंत जन्माला आलेला पाहून मन:शांतीसाठी एखादं नवरतन १२०-३००, गिली सुपारी, हरी पत्ती दाढेखाली दाबलं असतं. झाल्या दृष्टांताने आणि पानातल्या किवामनं आलेली चक्कर सांभाळत कुबडीवर रेलून दोन घटका कर्वे रोडवरच्या अन्याच्या दुकानाबाहेरच्या कट्टय़ावर विसावले असते. ते दासबोधवाले जरी नाही समजा, तरी इतर अनेक समर्थ अन्याच्या कट्टय़ावर रोज विसावतात. राजकीय पुढारी, बांधकाम उद्योजक, डॉक्टर्स, पत्रकार, नट अन् बोल्ट सारेच जमतात नेमाने आणि आस्थेने. या सर्व समर्थाच्या मांदियाळीत अन्या उजव्या तर्जनीने पानावर घोटवीत असलेल्या कातासवे आपली स्थितप्रज्ञताही रंगवीत राहतो. मला अनेकदा अन्याबद्दल लिहावंसं वाटलं आहे. पण पुलंनी लिहिलेल्या पानवाल्याच्या विडय़ाची रंगत अनेक पिढय़ा पोशीत असता आपण भिंतीवर बोटाचा चुना पुसल्यागत उगा डाग लावायचा धीर होत नव्हता. अर्थात अन्या अनेकार्थाने पानवाला नाही. म्हणजे फक्त पानवाला नाही. त्याच्या व्यक्तित्वाच्या पासंगास करंडीभर पानेही पुरणार नाहीत. तेव्हा उगाच हात दाखवून अवलक्षण नको म्हणूनही आजवर मी त्याच्याबद्दल लिहिले नाही. मात्र परवा त्याने माझी बोटे पानाविना तोंडात घातली.

‘‘काय म्हणता? बॅनर्जीसाहेबांचं पण हेच म्हणणं आहे.’’ मी सावरत म्हटलं.

‘‘काय म्हणतोय तो?’’

‘‘हेच, की भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे.’’

‘‘मग ते सांगायला बक्षीस कशाला पाहिजे? मी सांगतोय की. कांबळेला विचारा, तो पण सांगेल. सिगारेट नाहीए.’’

अन्यानं विडय़ाची सफाईदार घडी करत सिगारेट मागणाऱ्या एका नव्या पोरगेल्या गिऱ्हाईकावर बुबुळं फिरवली.

‘‘अहो, ते काय, आहे की सिगारेट.’’ पोरानं चाचरत म्हटलं.

‘‘दुकान माझंय का तुमचं? सिगारेट नाहीए.’’

ते पोरगं हताश होत निघून गेलं तसे आम्ही उभे असलेले एक-दोघे हसायला लागलो. कुणीतरी म्हटलं, ‘‘नवा होता म्हणून नाही दिली का रे?’’

‘‘हे पाहा, गिऱ्हाईकानं आपल्याला निवडायचं नाही, आपण गिऱ्हाईक निवडायचं.’’ सांप्रतकाळी ग्राहक ‘राजा’ आहे, असं सारं जग कोकलत असता हा पुणेरी पेशकार स्वत:चं तत्त्वज्ञान ऐकवीत बोलला.

‘‘कसंय, कुणीही दुकानावं यायचं आनि काहीही मागायचं हे बरोबर नाहीए. कुठली कुठली पोरं समोर कॉलेजला येतात. आत काय कळलं नाही की भाएर लगेच सिग्रेट. आई-बापानं काय शिग्रेटी फुकायला पाठवलंय का? मिसरूड फुटली नाई तर शिग्रेट सुचती लगीच. हा हितं फुकनार आन् धूर बापाचा निगनार!’’

अन्या बोलू लागला की थांबत नाही. त्याच्या अखंड चालणाऱ्या हाताला जीभ सोबत करते. पाठीशी ठेवलेल्या जुन्या रेडिओचा आवाज कमी करत अन्या बोलायला सुरुवात करतो तेव्हा खरं पान जमून येतं. पुण्यातल्या गरवारे कॉलेजच्या समोर दुकान असूनही विद्यार्थ्यांची वर्दळ येथे नसते. अन्या दुकान उघडतो तोच मुळी दुपारी तीन वाजता. पंधरा मिनिटात साफसफाई आणि पाणी भरणं, पानं करडीतून काढणं, कात तयार करणं, इत्यादी कामे पार पडतात आणि मग रेडिओ आणि अन्या या दोघांचे कार्यक्रम त्या दुकानावर सुरू होतात. दहाएक वर्षांपूर्वी कधीतरी एका दुपारी मी प्रथम तिथे गेलो होतो. एखाद्या अपरिचित जागी प्रथम जाताच आपले जुने ऋणानुबंध असल्याची जाणीव होते तसं काहीसं झालेलं मला आठवतं. शुभ्र पांढरी अर्ध्या हातांची बंडी आणि पांढरा पायजमा असा पोशाख. पांढरी हनुवट झाकणारी दाढी, डोईवर पांढरे केस आणि मुखात गायछापची गोळी असा अनवट अन्या आयुष्यात आला आणि माझा पुण्याच्या सांस्कृतिक विश्वातच जणू चंचुप्रवेश झाला. पुण्याच्या सांगीतिक वारशापासून ते नाटय़मर्दुमकीपर्यंतची सारी दालनं अन्यानं पाहिलेली असल्यानं त्यानं आपल्या ज्ञानाचा ऐतिहासिक सारांश देत मला मघईनं जोडून घेतलं. मी पान कसं हवं आहे ते सांगायच्या आत मला थांबवत म्हणाला,

‘‘मी देतो ते खा.’’

प्रथम परिचयाची एकतर्फी भीड ठेवीत मी अन्यानं दिलेला विडा मुखात घोळवला आणि त्याचा पाईक झालो.

गिऱ्हाईकाला पानातलं काहीही कळत नाही. ते काहीबाही ऐकून आलेलं असतं. आपण त्याची प्रकृती ओळखून योग्य ते पान लावून द्यायचं असतं, हा अन्याचा आणिक एक आवडता सिद्धांत. आपल्या व्यवसायावरची त्याची कालजयी बैठक सिद्ध करणारा. एखाद्या निष्णात वैद्यानं केवळ दृष्टीपरीक्षेनं निदान करावं तद्वत अन्या गिऱ्हाईकाच्या तोंडओळखीतल्या पहिल्या गप्पांतून त्याचं हुन्नर तपासतो. मग अस्सल वैद्यकीय जबाबदारीनं पान सिद्ध करतो आणि गिऱ्हाईकाशी तार जोडतो. अर्थात हे- जर गिऱ्हाईक पसंतीस उतरलं तर! अन्यथा (तोंडात) भरल्या पानावरची वासनाच उडवून गिऱ्हायकाला सन्मार्गाला लावतो. या त्याच्या अवखळ सवयीमुळे त्याच्या गिऱ्हाईकांना मात्र एक निराळीच पत प्राप्त होते. एकदा कधीतरी माझ्याकडून अनेकवार ऐकल्याने उत्सुकता म्हणून माझा मित्र अन्याकडे गेला. त्याचे काय चुकले कोणास ठाऊक, अन्याने दिलेले पान खाऊन त्याचा माझ्यावरचा विश्वास उडायची पाळी आली. मग मी सोबत गेलो आणि रीतसर ओळख करून दिली तर अन्या म्हणाला, ‘‘गिरीशचे मित्र म्हणून सांगायचं ना राव! काय हरकत नाई. आता पान खाऊन बघा.’’

आणि मग त्यानं दिलेल्या पानाचा मुखरस मित्राच्या रंध्रातच पाझरला. अन्या पानं, तत्त्वज्ञानं देतो तसे नवे मित्रही देतो. जोडून घेतलेल्या प्रत्येक गिऱ्हायकाबद्दल अपार अभिमान आणि जिव्हाळा बाळगणारा अन्या इतरांपाशी तुमचं कौतुक करताना जे काही सांगतो त्यानं त्याची गिऱ्हाईकं वय, मानमरातब, मालमत्ता याचा कुठलाही किंतु न ठेवता एकमेकांशी जोडली जातात. तसं पाहता पुण्यात एकंदरीनं माणसं जोडायची सवय विरळाच. अन्याकडं मात्र एखादं मंतरलेलं चुंबक असावं अशी खेच लागून माणसं येतात. त्या माणसांचे मग अन्या अन्य अन्य दरबार भरवतो. पत्रकारांचा वेगळा, नाटकवाल्यांचा निराळा, व्यावसायिकांचा आगळा.. प्रत्येक दरबारातली त्याची पेशकश वेगवेगळी असते. कुणा समन्वयकांशी सलगीनं चावट विनोद करेल, तर माझ्यासारख्याला खास ‘तेजाब’मधल्या अन्नू कपूरसारखं स्त्री-पुरुषांचे आवाज आलटून-पालटून काढत डय़ुएट गाऊन दाखवेल. लताही अन्या आणि रफीही अन्याच. पाठीआड दडलेल्या रेडिओवर आवडतं युगुलगीत लागावं अन् समोर अन्याचं आवडतं गिऱ्हाईक यावं, की एक अपूर्व संगीत जलसा सुरू होतो. अचूक सूर पकडत आणि बदलत अन्या रसनिष्पत्ती करतो. गिऱ्हाईकानं मुखरस सांभाळीत ‘वॉ! वॉ!’ हे उद्गार काढले की त्याला  स्वत:कडच्या शमशाद बेगमच्या गाण्यांच्या संग्रहाबद्दल सांगतो. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून कमावलेल्या माणसांबद्दल सांगतो अन् ठेवणीतल्या अनुभवांचे किस्से ऐकवतो.

‘‘आप्पांचा वाढदिवस होता. तर आप्पा मला म्हनले, अन्या तू यायचंय. मी म्हनलं, अहो, मी कशाला? तर आप्पा म्हनले, तू यायचंय. मग काय? आदल्या रात्री दुकान बंद करून घरी गेलो. जेवलो. बायकोला म्हनलं, ‘तू झोप.’ मग माझ्याकडं एक रुपायाच्या कोऱ्या नोटा होत्या. त्या काडल्या. रिबिनीला चिटकवून मस्त हार केला अन् दिला पानाच्या टोपलीत ठय़ून. मग गप झोपलो.

दुसऱ्या दिवशी आप्पांच्या कार्यक्रमाला गेलो. तर तितं ही गर्दी. मोटमोठी लोकं आल्याली. मी आपला कोपऱ्यात उभा होतो. तेवढय़ात आप्पांचं लक्ष गेलं. मला म्हनले, ‘ए अन्याऽऽऽ इकडं ये.’ गेलो. म्हनलं, ‘आप्पा, मला तुमचं फक्त एक मिनिट पायजे.’ तर त्ये म्हनले, ‘बरं.’ मग मी टोपलीतनं हार काडला आणि घातला. तर आप्पा खूश झाले. मला म्हनले, ‘जेवल्याशिवाय जाऊ नको.’ तरी मी आपला उभा राह्य़लो मागं. हे पाहा गिरीश, मान्सानी आपली पायरी ओळखून राहावं.

तर तेवढय़ात आप्पांनी आवाज दिला, ‘ए अन्या! बस हितं जेवायला.’ मी आपला गपचिप खुर्चीवर बसून खाली मान घालून जेवत होतो. सहज डाव्या हाताला पाहिलं तर शेजारी कोन?’’

‘‘कोण?’’ – मी.

‘‘आण्णा!’’

मी प्रश्नार्थक नि:शब्द.

‘‘भीमाण्णा! भीमसेन जोशी हो.’’  मिश्कील हसत अन्या.

‘‘काय सांगता?’’

‘‘पुढं ऐका. मग उजवीकडं पालं वर.. तर कोन?’’

‘‘कोऽण?’’  मी बाहेर पडणारे डोळे दाबीत.

‘‘कुमार! कुमार गंधर्व!’’

मी पानातल्या आसमंताऱ्यासवे ताऱ्यात!

‘‘मग?’’

‘‘मग काय?’’

मी म्हटलं, ‘‘अन्या, गपचीप जेवायचं आन् सुटायचं. नस्ती लफडी नाय पायजेल.’’

प्रसिद्ध हार्मोनियमवादक कै. आप्पा जळगावकरांच्या शष्टय़ब्दीला अन्यानं भीमसेन अन् कुमार या कुणासही जिवंतपणी स्वर्गात घेऊन जाणाऱ्या अवलियांशेजारी बसून शांत जेवण केलं आणि कुठलीही लफडी न करता तो निमूट निघून आला. याहून मोठा स्थितप्रज्ञतेचा दाखला तुम्हास ठाऊक असेल तर आपल्यातर्फे मघई जोडी.

असंच एकदा दुकानावर गेलो असता अन्याचा सदैव प्रसन्न, उल्हसित चेहरा कधी नव्हे ते पडलेला दिसला. मला चुकचुकल्यासारखं झालं. म्हटलं ,‘‘का हो? काय झालं?’’

‘‘सरकारनं पोटावरच पाय द्यायचं ठरवलंय म्हटल्यावर आता काय बोलनार? आता येत्या १ तार्खेपासून शेंटेड तंबाकु बंद. मंग आता काय विकायचं आमी? १२०-३०० नाय तर धंदाच संपला की हो.’’

अन्यानं सविस्तर कैफियत मांडली. वास्तविक अन्यानं कधीही गुटखा, पान मसाला इत्यादी माल दुकानात आणला नाही. अठरा वर्षच काय, पण वीस-बावीसच्या पोरांनाही कधी तंबाखू, सिगारेटी विकल्या नाहीत. सिगारेटी नेहमीच्या गिऱ्हाईकापुरत्या, ठरावीक ब्रँडच्या. बरं, त्याच्याकडची तंबाखू, कात, चुना, सुपारी सगळं अस्सल. भरीत भर म्हणून हा पानात ज्येष्ठमध घालणार. जेणेकरून गिऱ्हाईकाच्या घशाला काताचा त्रास न व्हावा. बरं, पानातलं सगळ्या जिनसांचं प्रमाण अचूक. तोलूनमापून घातलेलं. त्यानं कधी कोणाला त्रास झाल्याचे ऐकिवात नाही. असा पूर्ण सचोटीने पंचेचाळीस-पन्नास वर्ष धंदा करून आता सरकार अन्याय करत असेल तर काय बोलणार! असा त्याचा सवाल.

मला कळेना त्याची समजूत कशी काढू?

मी उसन्या अवसानानं म्हटलं, ‘‘अशी बरी बंदी घालतील? मी उपोषण करेन. हॉं! मग..’’  तेवढय़ापुरता विषय टळला. अन् काही दिवसांनी अचानक अन्यानं आवाज बारीक करत गुपित सांगावं तसं सांगितलं, ‘‘मी उपोषणाला बस्तोय.’’

‘‘आँ?’’ मी रिकाम्या तोंडी आ वासला.

‘‘लाक्षणिके. एक दिवस.’’ त्यानंच दिलासा दिला.

‘‘तर माझी एक विनंतीए, की तुमी लिंबुपानी द्यावं. तुमच्या हातानी उपोषण सोडावं.’’

मला तंबाखू लागल्यागत झालं. आता आली का पंचाईत! पण म्हटलं, आपला मित्र आहे. जायला हवं.

गेलो. काहीही बोलणार नाही अशी पूर्वअट घातलेली असूनही सगळ्या पानवाल्यांनी गळ घातली. मग काहीतरी बोलून मी माझे दोन शब्द संपवले. कलेक्टर ऑफिससमोरच्या त्या मांडवात मग दोन ग्लासातून मोसंबीचा रस आला. मी एक ग्लास अन्याच्या ओठी लावला अन् दुसरा त्यानं माझ्या. अन्याच्या पाठराखणीला उभ्या असलेल्या नंदू पोळांनी भांबावलेल्या मला हलकेच डोळा मारला अन् मग मी घटाघटा ज्यूस प्यायलो.

तेव्हा माईकवरून पुण्यातले पानवाले माझा जयजयकार करीत होते, तर शेजारच्या मांडवात आसारामबापूला झालेल्या अटकेचा निषेध करायला जमलेल्या बाया कृष्णभजन थांबवून टकामका बघत होत्या. अन्याबद्दल मी खरंच खूप लिहू शकतो. वयाची पासष्ठी गाठलेल्या या ज्येष्ठास पुण्यातले त्याचे सारे सानथोर चाहते प्रेमानं ‘अन्या’च म्हणतात. त्यालाही ते आवडत असावं. मी एकटाच कदाचित त्याला ‘अनिलराव’ म्हणतो. साक्षात लता मंगेशकर ते राजन-साजन मिश्रा, बाळासाहेब मंगेशकर, जब्बार पटेल, नाना पाटेकर, आरती अंकलीकर, डॉ. मोहन आगाशे, आनंद

मोडक, सुधीर गाडगीळ अशा आपल्या बावनकशी गिऱ्हाईकांना आणिक रसदार करणारा हा अन्या कुणा अवलियाहून कमी नाही. अन् त्याच्या कसबाची गोडी लागलेला मी किशोरी आमोणकरांचं गाणं प्रत्यक्ष ऐकलेल्या कुणा ऐपतदार रसिकाहून कमी नाही. अनिलरावांचं पान हा वायफळ बडबड

करीत पिंका उडवण्याचा उथळ विरंगुळा नाही, तर मुखी धारण केलेला मौन समजुतीचा वानवळा आहे. मला समृद्ध करणाऱ्या या पासष्टीच्या बुजुर्गास खास लखनवी अदबीनं म्हणावंसं वाटतं.. ‘‘आप को हमारी उमर लग जाए!’’

girishkulkarni1@gmail.com