खिचडी म्हणजे काय? आजारी व्यक्तीसाठी उत्तम आहार! खिचडी म्हणजे काय? दिवसभर जड जेवण झाल्यानंतर रात्रीला लागणारा हलकासा आहार! एवढंच..? हीच खिचडी ‘व्यावसायिक’ होईल आणि देशभरात तिचा स्वाद दरवळेल अशी कल्पना कुणी डोक्यात आणली आणि ती एखाद्याला बोलून दाखवली तर क्षणार्धात ती झटकली जाईल. एमबीए झालेल्या अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांनी ही संकल्पना आपल्या काही मित्रांजवळ बोलून दाखवली तेव्हा त्यांनाही असाच अनुभव आला. पण त्यामुळे त्यांनी स्वत: मात्र ती डोक्यातून काढून टाकली नाही. उलट, अधिक जोमाने ती प्रत्यक्षात उतरवली. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये ‘खिचडी म्हणजे काय?’ असं एखाद्या पाहुण्यानं विचारलं तर थेट गायत्रीनगराकडे बोट दाखवले जाते. मग आपसूकच पावलं तिकडे वळतात आणि ‘खिचडीवाला’ असा फलक दिसायच्या आधीच ‘नाक’ जागे होते. काहीसा परिचयाचा, हवाहवासा वाटणारा, मसालेदार सुगंध नाकाभोवती पिंगा घालू लागतो. त्याचा माग घेत चालू लागलं की पावलं आपोआपच ‘खिचडीवाला’समोर जाऊन थांबतात. मोठय़ा कंपनीत नोकरी करून महिन्याला लाखो रुपये पगार मिळवता येईल असे शिक्षण घेऊनही त्या खात्रीच्या कमाईला लाथ मारून एका बेभरवशाच्या व्यवसायात उतरत खिचडीचा स्वाद दरवळविण्यात या तरुणांनी धन्यता मानली. राज्याच्या उपराजधानीने चवीची पावती दिलेली ही खिचडी आता लवकरच महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा पोहोचणार आहे..
उच्चशिक्षित तरुणाईची स्वप्नंसुद्धा मोठीच असतात. त्यातही एमबीए व अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे तरुण असतील तर गलेलठ्ठ पगाराची नोकरी, बंगला आणि कार अशी भौतिक सुखाची आलिशान स्वप्नं उराशी बाळगून त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होते. त्यांच्यात वेगळी वाट चोखाळणारे फारच अपवादात्मक असतात. पण ही वेगळी वाट आणखीनच वेगळी करणाऱ्या नागपुरातील दोन तरुणांनी राज्याबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. त्यांची एकूण वाटचाल पाहता अल्पावधीतच कदाचित हा झेंडा देशाबाहेरसुद्धा गाडला जाईल. पँटच्या खिशात महत्प्रयासाने वाचवून जमलेल्या शिलकीतून सुरू झालेली त्यांची ही व्यावसायिक उलाढाल आता लाखो रुपयांपर्यंत गेली आहे. गेल्या दोन वर्षांतील प्रवासाची ही गती पाहता तो लवकरच सातासमुद्रापार जाईल आणि कोटींत ही उलाढाल जाईल अशी अपेक्षा आहे. त्यांच्या खमंग खिचडीला पसंतीची पावती खवय्या नागपूरकरांकडून मिळू लागली आहे.
खिचडी प्रत्येकाच्याच घरात शिजते. त्यात वेगळं ते काय, असा प्रश्न कुणी विचारला तर नागपुरातल्या गायत्रीनगराचा रस्ता त्याला दाखवला जातो. प्रत्येकाच्याच घरी शिजणाऱ्या या साधारण खिचडीला ‘खास’ बनवलंय ते सागर भजनी आणि मनिष खानचंदानी या तरुणांनी! खिचडीचे एवढे सारे प्रकार असू शकतात, हे गायत्रीनगरातील ‘खिचडीवाला’कडे पावलं वळवल्यानंतरच कळतं. उच्च शिक्षण ते ‘खिचडीवाला’ हा त्यांचा प्रवासही मोठा मजेशीर आहे. एमबीए, अभियांत्रिकीची पदवी त्यांनी घेतली खरी, पण नोकरीपेशात त्यांचे मन रमले नाही. आणि मग लोकांना चवीचे खाऊ घालण्यासाठी ते सज्ज झाले. ‘लेमन आयडीयाज्’ कार्यशाळेत सागर आणि मनिष दोघे सहभागी झाले. या कार्यशाळेत त्यांना वेगवेगळ्या कल्पना सुचवायच्या होत्या. २१ दिवसांत त्या संकल्पना सिद्ध करून त्यातून नफा मिळवून दाखवायचा होता. आयटीतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आलेला सागर आणि व्यावसायिक कुटुंबातून आलेल्या व पाककलेत रमणाऱ्या मनिषला त्यातूनच खिचडीची कल्पना सुचली. या कार्यशाळेतून ‘खिचडीवाला’ जन्माला आला. सिव्हिल लाइन्स येथील सागरच्या घरी ही खिचडी शिजायची आणि ट्रॅफिक पार्क व फुटाळ्यातील इतर खाद्यपदार्थाच्या ठेल्यांजवळ ती विक्रीसाठी आणली जायची. जंक फूड आणि चायनीज फूडची सवय झालेली तरुणाई खिचडीकडे कशी वळेल, हा प्रश्नच होता. खिचडीचे दोन प्रकार प्रथम त्यांनी सुरू केले. पण अवघ्या काही दिवसांतच खवय्या तरुणांच्या उडय़ा त्यावर पडायला लागल्या. पाककलेत रमलेल्या मनिषची ही सुरुवात होती आणि हळूहळू सागर त्यात ओढला गेला. दिवसागणिक खवय्यांचा वाढता ओघ बघून त्यांनी मग या खिचडीला व्यावसायिक रूप देण्याची तयारी केली. केवळ काही हजारात सुरू केलेला हा खिचडी व्यवसायाचा प्रवास लाखो रुपयांपर्यंत वाढवण्याची तयारी त्यांनी सुरू केली. गायत्रीनगरात छोटय़ाशा जागेत ‘खिचडीवाला’ या नावाने त्यांनी रेस्टॉरंट सुरू केले. होती-नव्हती ती सगळी कमाई त्यांनी यात ओतली आणि एक डाव खेळायचा असे ठरवले. एक महिना.. दोन महिने.. तीन महिने.. असे तब्बल सहा ते सात महिने त्यांनी खिचडीवर लावलेला हा डाव अधांतरी होता. ना तो वर जात होता, ना खाली येत होता. नंतर मात्र हळूहळू हा डाव रंगायला लागला आणि त्यांचे खिचडीतील प्रयोगही वाढत गेले.
गायत्रीनगरातील ‘खिचडीवाला’ सुरू झाले तेव्हा खिचडीचे दहा प्रकार त्यांनी खवय्यांसाठी तयार केले होते. नंतर ही संख्या १५ वर गेली. आणि आता १७ खिचडीचे प्रकार जिभेचे चोचले पुरवू इच्छिणाऱ्यांना आता इथे चाखायला मिळत आहेत. हे कुणा बल्लवाचार्याने नव्हे, तर मनिषने स्वत: प्रयोग करून वेगवेगळ्या चवींच्या या खिचडी तयार केल्या आहेत. खिचडीचे अनेक प्रयोग अयशस्वीसुद्धा झाले आहेत. तरुण खवय्यांना लक्ष्य करून खेळलेला त्यांचा हा डाव यशस्वी झाला. परंतु म्हणून तरुणाईच्या सवयी त्यांनी बिघडवल्या नाहीत. या परिसरातच आयटी पार्क, पर्सिस्टंट, व्हीएनआयटी यांसारखे विद्यार्थीवर्ग आणि नोकरदार असणारी कार्यालये व संस्था आहेत. त्यामुळे दिवसभर या तरुणाईचा राबता इथे असतो. जेवण व भुकेच्या वेळी जेवणाचा डबा नसताना खाण्यासाठी बाहेरची वाट धरणाऱ्यांकरता ‘खिचडीवाला’ हा चांगला आरोग्यदायी पर्याय ठरला आहे. ३१ मार्च २०१६ ला ‘खिचडीवाला’ दोन र्वष पूर्ण करत आहे. या दोन वर्षांत त्यांनी दोन शाखा शहरात उघडल्या आहेत. आजवर त्यांनी कोिल्ड्रक किंवा मांसाहारी पदार्थाना थारा दिलेला नाही. आरोग्यासाठी जे हितकारक आहते तेच पदार्थ, पण नव्या स्वरूपात त्यांनी पेश केले आहेत. कोिल्ड्रक्ससारख्या पेयांपेक्षा आरोग्यास मानवणारे वेगवेगळ्या फळांचे ‘मॉकटेल’, लस्सी, ग्रीन टी, लेमन टी इथे आवर्जून मिळते.
त्यांनी खिचडीची घरपोच सेवाही सुरू केली असून दूरध्वनीवरूनसुद्धा खिचडीसाठी ऑर्डर स्वीकारली जाते. ‘खिचडीवाला’चा चमू म्हणजे एक कुटुंब आहे. मनिष स्वत: त्यांना खिचडी तयार करायला शिकवतो. त्यांनी इतर बेरोजगारांनाही यातून रोजगार मिळवून दिला आहे. सागर स्वत: खिचडी तयार होताना लक्ष पुरवतो. खवय्यांची आपुलकीने होणारी विचारपूस आणि काळजी यामुळे दूरदूरचे लोक इथे येऊन खिचडीच्या नाना तऱ्हा चाखन सुखावतात. गायत्रीनगरसह रामदास पेठेतसुद्धा ‘खिचडीवाला’ सुरू झाले आहे. आता परराज्यातसुद्धा या खिचडीचा सुगंध दरवळणार आहे. पुणे, मुंबईसह बडोदा, इंदोर, बंगळुरू या ठिकाणी फ्रेंचाईजीसाठी मागणी होत आहे. त्यासाठी मनिष आणि सागर तयारीला लागले आहेत. सारे जुळून आले तर मार्चनंतर हा प्रकल्प मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.
घरगुती तसेच विविध प्रकारच्या स्वादिष्ट खिचडींची चव येथे चाखायला मिळते. आरोग्याशी संबंधित सर्व काळजी घेऊनच इथे पदार्थ तयार केले जातात. विशेष म्हणजे माफक दरात हे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जातात. खिचडीसोबत ‘कॉम्बो पॅक ऑफर’ही उपलब्ध आहे. त्यामुळे ‘खिचडीवाला’च्या खिचडीची चव तरुणाईपुरतीच मर्यादित न राहता आबालवृद्ध साऱ्यांच्याच त्यावर उडय़ा पडतात. कित्येक नोकरदार कुटुंबासाठी वीकेंडचा हा पर्याय ठरतो आहे. अलीकडे वाढदिवसाच्या पाटर्य़ाही इथे रंगायला लागल्या आहेत. पोफळी पामच्या झाडांपासून तयार केलेल्या प्लेटमध्ये वाढली जाणारी खिचडी हे इथले आणखी एक नावीन्य. सहज नष्ट होणाऱ्या आणि पर्यावरणाला हानीकारक न ठरणाऱ्या या प्लेट्स खास बंगलोरहून मागवल्या जातात. त्यामुळे इथे येणारा रसिक खवय्या परतताना या प्लेट्सचीही विचारपूस करूनच घरी जातो.
सागर भजनी हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगचा विद्यार्थी. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यात आयटी कंपनीत तो सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून रुजू झाला. तीन वर्षांतच त्याला या नोकरीचा कंटाळा आला आणि त्याने नोकरी सोडली. दरम्यान, इटली येथे त्याने कार डिझाईन तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. पण या प्रशिक्षणाचा भारतात काहीच उपयोग नाही. नंतर ‘लेमन आयडीयाज् वर्कशॉप’मध्ये तो सहभागी झाला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली..
मनिष खानचंदानी हा एमबीएचा विद्यार्थी. व्यवसायाचे भूत त्याच्या डोक्यात सुरुवातीपासूनच होते. वास्तविक एमबीएनंतर नोकरीच्या अनेक चांगल्या संधी आलेल्या असतानासुद्धा त्याने त्या नाकारल्या. पाककलेत सुरुवातीपासूनच रमलेला असल्याने कोणताही खाद्यपदार्थ तयार करताना काहीतरी वेगळे प्रयोग त्यात करायचे आणि त्यातून नवीन पदार्थ तयार करायचा, ही त्याची आवड. तीच त्याला या व्यवसायात घेऊन आली.

 

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

राखी चव्हाण/ दिनेश गुणे
rakhi.chavhan@expressindia.com
dinesh.gune@expressindia.com