-विक्रान्त भिसे
विक्रोळी विद्यालयात मी दहावीपर्यंत शिकलो, दहावीत गटांगळ्या खाऊन अखेर कुरियर कंपनीत कामाला लागलो. ‘इन्ट्रासिटी सर्व्हिस’ या कंपनीतलं ते काम बँकिंग क्षेत्रातल्या कुरियरचं होतं. चेक भल्या सकाळी नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचवणं, हे माझं काम. ते मी नीट करायचो. चार वर्षांत पगारवाढही दरवर्षी मिळवत होतो. पण कलेकडे ओढा होता. जिमला जाण्याबरोबरच आमच्या एरियातल्या डान्सच्या स्पर्धांतही भाग घ्यायचो. मी सातवीत असतानाच एका वर्तमानपत्रानं शालेय चित्रकला स्पर्धा घेतली, त्यात मला बक्षीस मिळून पेपरात नाव छापून आले होते, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत ‘ए ग्रेड’ आठवीतच मिळाली होती. पण दहावीतच अडल्यामुळे पुढे शिकण्याची इच्छा दबली होती. चार वर्षांनी दहावी झालो, तेव्हा चित्रकला शिकावी- तेसुद्धा ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्येच, असे पुन्हा वाटू लागले.

काका प्रकाश भिसे हे चित्रकार आहेत, रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये प्राध्यापकी करून ते निवृत्त झाले. त्यांनी माहिती दिली- ‘जे.जे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये प्रवेशाचे नियमच बदलले आहेत. आता बारावीच्या मार्कांवर मिळतो प्रवेश. दहावीनंतर चित्रकला शिकायची तर डिग्री नाही, डिप्लोमाच मिळेल. अखेर, जवळ पडेल म्हणून दादरच्या मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटला प्रवेश घेतला. कुरियरची नोकरी सोडली. आता ही दुसरी संधी मिळाली आहे, ती घालवायची नाही असे ठरवून कलाशिक्षणातल्या पहिल्या- फाउंडेशनच्या वर्षी दिवसरात्र चित्र काढत राहिलो. दोन-तीन पारितोषिकेही मिळाली. मग डिप्लोमासाठी वांद्य्राला (वांद्रे स्कूल ऑफ आर्ट). तिथे फिल्म इंडस्ट्री, एमटीव्ही अशी काम करत पैसे मिळवून शिकलो. पण जेजेत शिकायचेच, जेजेच्या लायब्ररीत पुस्तके पाहायची- वाचायची म्हणून जेजेतून ‘डीपीएड’ (डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन) झालो. ते शिक्षण सुरू असतानाच एका छोट्या शाळेत कलाशिक्षक म्हणून लागलो. त्याआधी अॅड एजन्सीसाठी इलस्ट्रेशन्स केली. कलाशिक्षणाच्या डिप्लोमानंतर ऐरोलीच्या एका शाळेत चांगली नोकरी मिळाली… माझी जोडीदार सिद्धी जाधव ही तर ‘मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट’मध्येच भेटली होती, हा झाला माझा व्यक्तिगत प्रवास.

satara A minor girl commits suicide
अल्पवयीन मुलीची तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; साताऱ्यात तणाव, पोलीस अधीक्षकांचे कठोर कारवाईचे आदेश
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Addiction, Abuse, Womens Commission, Akola,
“व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष
Opposition of Mahavikas Aghadi to development works in Naina area
नैना क्षेत्रातील विकसकामांना महाविकास आघाडीचा विरोध
Kolkata rape-murder case
Kolkata doctor rape-murder case:पीडितेच्या पालकांनी ममता बॅनर्जींना विचारला जाब; ही दुटप्पी भूमिका का आणि कशासाठी?
Maratha Reservation, reservation,
आंदोलनांना बळी पडून आरक्षण दिले, तर राज्यातही बांगलादेशसारखी परिस्थिती, आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा दावा
sushma andhare on ajit pawar
Sushma Andhare : “सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन चुकलो”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “वरातीमागून…”

लाकडी बोर्डवर कागद ठेवून चित्रे काढताना तो बोर्ड जुना असेल किंवा त्यावर ओरखडे खूप असतील तर कागदावर तुम्ही जे करता त्यावरही ते उमटणार, तसे होऊ नये म्हणून जशी काळजी घ्यावी लागते, तसाच प्रकार आपल्या कलाशिक्षणात होत असतो. चित्रकाराच्या सामाजिक परिस्थितीचा ‘बोर्ड’ आणि त्याच्यावरले आधीपासूनचे ओरखडे दिसूच नयेत, याची काळजी आपल्याकडच्या कलाशिक्षणात फार घेतली जाते! मी काही अपवाद नव्हतो. त्यामुळे माझेही कलाशिक्षण ठरलेल्या अभ्यासक्रमानुसार झाले. वडील ‘दलित पँथर’मध्ये होते. अगदी पोरसवदा होते तेव्हा पँथरच्या कार्यकर्त्यांबरोबर नाशिकला गेले होते, तिथल्या दंगलीत त्यांना अटक झाली होती. पुढे ते टाटा ऑइल मिलमध्ये होते, तरी घरात पँथरचे वातावरण असायचे. एकंदर दलित कार्यकर्त्यांची ये-जा असायची. राजा ढाले आमच्याइथेच राहायचे, भाई संगारे यांची भाषणे ऐकत राहावी अशी असायची, जयंती एरियातच साजरी झाली तरी सहा डिसेंबरला चैत्यभूमीला जायचो. हे सगळं वातावरण एकीकडे आणि कलाशिक्षण दुसरीकडे. पण माझा ओढा रेषांकडे होता, त्यामुळे तेव्हा मला थोटा वैकुंठमची चित्रं आणि बंगाल स्कूलचीही चित्रं आवडायची. एकंदर भारतीय चित्रकला, भारतीय लघुचित्रशैली, हे फार भारी वाटे. कारण रेषेतली लय, चित्रातला फ्लॅटनेस वगैरे महत्त्वाचे वाटायचे. रेषांचा ओघ कायम ठेवूनच ड्रॉइंग्ज करायचो. मग खूप ड्रॉइंग्ज केल्यावर भोवतालची दृश्ये, माणसे आणि त्यातून ‘क्रिएटिव्ह’ आकार शोधण्याचा प्रयत्न माझ्या रेखाचित्रांमध्ये येऊ लागला. ही चित्रे वेगळी होताहेत, हे समजत गेले. कोणत्याही कलेत स्वत:चा अस्स्लपणा शोधण्यासाठी तरी काही नकला कराव्या लागतातच, त्या आता करून झाल्या आहेत आणि आपले काहीतरी आता आपल्याला अस्सलपणे सापडू लागलेले आहे, हा विश्वास येत असताना २०१६ साल उजाडले. त्या वर्षी ज्या ज्या महत्त्वाच्या कलास्पर्धांना चित्रे पाठवली तिथे बक्षिसे मिळाली. म्हणजे, बॉम्बे आर्ट सोसायटी गोल्ड मेडल, महाराष्ट्र राज्य कला स्पर्धा (व्यावसायिक विभाग) तसेच दिल्लीच्या ‘आयफॅक्स’ आणि ललित कला अकादमीचं ‘नॅशनल अॅवॉर्ड’.

कलाशिक्षक म्हणून शाळेत नोकरी सांभाळून झालेल्या निवडक चित्रांचे प्रदर्शन ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ला २०१९ मध्ये केले. माझ्या कामाबद्दल लिहिले/ बोलले जाऊ लागले तेव्हा ‘कष्टकरी वर्गाची वेदना रेषांतून दिसते’ असा सूर काहींनी लावला होता. त्याच वेळी मला मात्र निराळा प्रश्न पडू लागला होता : अस्सलपणा फक्त शैलीपुरताच असतो की तो वैचारिकसुद्धा असतो? हा प्रश्न पडला तरी काम हळूहळूच बदलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र काढणे हे अवघड नसेल, पण ते का काढायचे हे ठरवण्याचा क्षण माझ्यासाठी तोवर आला नव्हता. कुठल्या कार्यक्रमात नामदेव ढसाळांचे व्यक्तिचित्र हवे, काढून दे- म्हटल्यावर ते मी द्यायचो; पण तसे करणे निराळे आणि स्टुडिओत तुम्ही तुमची अभिव्यक्ती म्हणून जे काम करता ते निराळे. अशात कॅम्लिनच्या स्पर्धेतले बक्षीस म्हणून ‘युरोप टूर’ला जुलै २०१९ मध्ये जायला मिळाले. ज्या रात्री विमानाचे तिकीट होते त्याच दिवशी राजा ढाले कालकथित झाल्याची बातमी आली. अंत्ययात्रेला मी नाही जाऊ शकलो. माझ्या चित्रांमधले बाबासाहेब राजा ढालेंनी पाहिलेच नाहीत.

करोना, लॉकडाउन वगैरे सुरू झालं तेव्हा मोठमोठे चित्रकार, शिल्पकार ‘ड्रॉइंग’कडे पुन्हा वळले. कुणी त्या वर्षभरात शेकड्यांनी ड्रॉइंग्ज केली… मी काय करणार होतो? ड्रॉइंग्ज तर मी त्याआधीही दरवर्षी भरपूर करायचोच. मी तोवर निर्णय घेऊन, नोकरी सोडून पूर्णवेळ चित्रकार झालेलो- हे सिद्धी बोलली म्हणून झालं. तिची नोकरी सुरू राहणार, मी चित्रकार असं ठरलं होतं. लॉकडाउनमुळे सिद्धी घरीच होती, पण डिझायनर म्हणून तिच्या नोकरीचं काम घरून सुरू होतं. मी मुक्त, नोकरीबिकरी काही टेन्शनच नसलेला. तिला मात्र ऑफिसच्या लॅपटॉपवरून घरी काम. तेही रात्री साडेअकरा- बारापर्यंत चालणार. ती प्रेग्नंट. आणि मी घरातली कधीतरी विकत घेतलेली किंवा विक्रोळीच्या घराऐवजी भाड्याच्या फ्लॅटमध्ये आम्ही दोघे शिफ्ट झालो तेव्हा आणलेली पुस्तके वाचतोय. डॉ. बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा, त्यांनी महिला कामगारांसाठी दिलेला लढा असे वाचताना समोर सिद्धी असायची. तिच्यावर येणारा ताण दिसायचा. या अशा परिस्थितीत ‘लेबर-लीडर’ या चित्राची कल्पना आली. ते काम सहा फुटी, वीस फुटी कॅनव्हासपर्यंत गेलं. बाबासाहेबांच्या चष्मा पुसला जाऊन त्या कामगाराचा हात कधी बाजूला होणार? चटका तुम्हाला बसल्याशिवाय काही सुचत नाही म्हणतात. तसेच इथे झाले. पण त्यामुळे हेसुद्धा लक्षात येऊ लागले की आता हे सगळे दिसले पहिजे. हे जगणे आणि हे विचार यांचा काहीतरी संबंध आहे हे दाखवण्याची शक्ती चित्रात असली पाहिजे. कारण तोवर राजा ढालेंचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’, भागवत जाधवचा बळी आणि त्याच्या फोटोची अंत्ययात्रा… यांबद्दल पुन्हा वाचू लागलो होतो. हे दृश्यात आणले पाहिजे, याची जाणीव होत होती. दलित पँथर ‘होती’ ती कशी होती, हे दिसले पाहिजे. आजचा समाजही अशा एखाद्या संघटनेला पाठिंबा देऊ शकतो असे मला काय-काय पाहून वाटते आहे, ती सगळी परिस्थितीसुद्धा लोकांना दाखवली पाहिजे. म्हणून भरपूर चित्रं झाली. चैत्यभूमीवरला महापरिनिर्वाण दिनाचा जनसागर चित्रात आणताना लहानपणीचा काळ पुन्हा आठवण्यापेक्षाही, इथे नामदेवसारख्या कवीने लोकांमध्ये जाऊन कविता वाचल्या, लोकांना त्या भिडल्या हेही दिसले पाहिजे असे जास्त वाटत होते. त्यामुळे ही अशी चित्रे पटापट नाही झाली. अभ्यासही करावा लागला.

लॉकडाउन उघडू लागला. चित्रे गॅलरीत मांडली जाऊ लागली, तसंच ‘सेक्युलर आर्ट मूव्हमेंट’चेही काम पुन्हा पहिल्यासारखे सुरू झाले. या संघटनेत चित्रकारही आहेत आणि त्यांचं प्रदर्शन चैत्यभूमीवर सहा डिसेंबरला भरते, पण ‘सेक्युलर आर्ट मूव्हमेंट’ला पाठिंबा देणाऱ्या चित्रकारांचे समूह प्रदर्शन जहांगीरमध्येही भरले. चित्रे लोकांपर्यंत पुन्हा जाऊ लागली. अमित जैन नावाचे दिल्लीचे एक कला-संयोजक डोंबिवलीला माझी चित्रे पाहायला आले- त्यांनी दिल्लीच्या अनंत आर्ट गॅलरीबद्दल सांगितले. ‘‘कुठे एवढ्या लांबची गॅलरी- त्यापेक्षा मुंबईतली प्रतिष्ठित गॅलरी मिळाली तर…’’ असे मला वाटत होते. हे ओळखून त्यांनी मुद्द्याला हात घातला- योग्यरीत्या माझ्या एकट्याच्या चित्रांचे प्रदर्शन दिल्लीत केले जाईल. त्याआधी मला व्यवस्थित स्थान दिले जाईल! ठरल्याप्रमाणे हे प्रदर्शन दिल्लीतल्या ऐन ‘इंडिया आर्ट फेअर’च्या काळात झाले. चित्रकार आणि समाजशास्त्रांचे अभ्यासक यांनी ते व्यवस्थित पाहिले. नोएडा भागातली ‘अनंत आर्ट गॅलरी’ची जागा प्रचंड असल्यामुळे मला ४० फूट रुंदीचे ‘क्वेस्ट फॉर जस्टिस’ हे चित्र करता आले. ही मोठी चित्रे करताना मी तुलनेनं लहान आकाराची- पण ‘ड्रॉइंग’ नसलेली काही चित्रे माझ्यासाठी करत होतो. दृश्य-मांडणीचा विचार या चित्रांमधून निराळा होऊ शकतो, हे जाणवत होते. उदाहरणार्थ, रोहित वेमुलाची हॉस्टेल रूम. रोहितचा फोटो जो सगळ्यांना आपला वाटतोय त्यात त्याचा हसरा चेहरा आहे. उमेद आहे त्यात. पण अशा रोहित वेमुलाची उमेद कशी हरली? माझ्या चित्रात मी आधी रूममधला पंखाच काढून टाकला. फक्त हूक ठेवला. या चित्रातल्या रूममध्ये पाणी आहे – चिखलपाणी. सगळेच बुडवून टाकायला पाहणारे पाणी. रूममधल्या वस्तू या पाण्याखाली गेल्यात. आता उरली फक्त उंच जागी असलेली स्फूर्तिस्थाने! मग आमच्याही घराचे चित्र काढले- आईनं बुद्ध-आंबेडकरांच्या तसबिरी सजवलेले घर! तिसऱ्या चित्रात आणखी एक खोली- ही कुणाची ते महत्त्वाचे नाही. ती पुस्तकांची खोली- त्या पुस्तकांची ‘निळाई’सुद्धा महत्त्वाची.

प्रदर्शनासाठी काम करत असताना आणि नंतरही स्वत:चाच पुन्हा शोध लागल्यासारखे वाटत होते. त्याहीआधी ‘बलुतं’ आणि अन्य पुस्तके वाचली होती, ढसाळ माहीतच होते आणि काकांमुळे ‘गोलपिठा’ प्रदर्शनासाठी कामही केलं होतं. पण सवि सावरकर यांनी जी सुरुवात करून दिली होती त्या वाटेवरून चालणारे बरेच चित्रकार आज आहेत, याची जाणीव होऊ लागली- आजवर आर्ट गॅलऱ्यांमध्ये जे जगणे दिसले नाही, जे विचारही क्वचितच दिसले ते इथे दिसणे महत्त्वाचे आहे, आर्ट गॅलऱ्यांचं जग हे लोकांपासून अलग मानण्याचा दांभिकपणा त्यातूनच संपणार आहे. आपण त्यासाठी काम करतो आहोत आणि कदाचित यापुढले प्रत्येक प्रदर्शन हे स्वत:च्या पुनर्शोधासारखेच असणार आहे, हे आता लक्षात येऊ लागले!

vikrantbhise9@gmail.com

शब्दांकन : अभिजीत ताम्हणे