प्रत्येक देशाला स्वत:ची अशी एक संस्कृती तर असतेच; पण त्याचसोबत किंवा त्या संस्कृतीचे द्योतक म्हणता येईल अशी एक गोष्ट असते- जी कायमस्वरूपी आपल्या मनावर ठसते. जेव्हा केव्हा त्या देशाचा उल्लेख होतो, त्यावेळी तीच गोष्ट आपल्याला सर्वप्रथम आठवते. यूएईच्या ठळक सांस्कृतिक खुणा म्हणून lok03ज्याची गणना करता येईल ते म्हणजे तिथले परफ्युम्स! खरं तर युरोप, अमेरिका किंवा कोणत्याही विकसित देशात गेलो तर तेथून होणाऱ्या खरेदीमध्ये परफ्युमची खरेदी हा अनिवार्य घटक असतो. पण तिथल्या परफ्युमला गंध असतो तिथल्या सोफिस्टिकेशनचा. त्या तुलनेत यूएईच्या परफ्युमचा विचार केला तर त्या परफ्युममधून स्थानिक संस्कृतीशी घट्ट विणलेली नाळ आणि अभिमानाचा दरवळ अनुभवायला मिळतो.
काल-परवाच एका मॉलमध्ये गडबडीत चुकून एका अरेबिक बाईला धडकले आणि तिने लावलेल्या खूप स्ट्राँग पफ्र्युममुळे क्षणात मी काही र्वष मागे आठवणींच्या विश्वात गेले. आम्ही यूएईमध्ये आलो तेव्हा काही वष्रे इथली राजधानी अबुधाबी येथे होतो. अबुधाबी दुबईच्या मानाने जरा जास्त अरेबिक आहे असे म्हणता येईल. अरेबिक संस्कृतीच्या मनावर प्रभाव टाकणाऱ्या खुणा तिथे वरचेवर अनुभवण्यास मिळतात. दुतर्फा खजुराची झाडे आणि तुरळक स्थानिक अबया व कंधुरा घातलेले लोकही नियमित दिसतात. पण या सांस्कृतिक खुणांपेक्षा एका खास गंधाने मनाचा ताबा घेतला; तो इतका खोलवर गेला, की अनेक वेळा मला त्या सुगंधांची आठवण येते! सुगंध हा अनुभवावा लागतो, पण मी तो आठवू शकते, इतके या गंधाशी माझे नाते जुळले आहे.
अत्तर किंवा पफ्र्युमला अरेबिक संस्कृतीमधे विशेष महत्त्व आहे. मूलत: इटॅलियन शब्द ‘पफ्र्युमरे’ (धुराच्या माध्यमातून) पुढे ‘पफ्र्युम’ म्हणून प्रचलित झाला. प्राचीन काळी एका विशिष्ट झाडाचा वाळवलेला सुगंधी चीक- ज्याला आपण धूप म्हणूनही ओळखतो, तो जाळून येणारा धूर आपल्या प्रार्थना घेऊन स्वर्गात जातो अशी आख्यायिका होती. फक्त िहदूच नव्हे, तर मुस्लीम आणि ख्रिस्ती समाजातही धार्मिक प्रसंगांना सुगंधी धूप जाळण्याची प्रथा होती. तंत्रज्ञान जसे प्रगत होत गेले, तसे हाच पफ्र्युम आधी essential oils म्हणजे तल रूपात आणि मग त्यात अल्कोहल मिश्रित spray च्या रूपात दिसू लागला. आज तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी पफ्र्युम म्हणजे स्प्रे असे एक गणितच झाले आहे. पण अरब संस्कृतीने मात्र जुन्या पारंपरिक पफ्र्युमचा वारसा खूप कलात्मकतेने जपलाय.
स्थानिक अरब लोक तल रूपातील पर्फ्यूम म्हणजे अत्तर अधिक पसंत करतात. अत्तर म्हटल्यावर मला आजोबा आठवतात. छोटय़ा कापसाच्या बोळ्यात एक थेंब अत्तर टाकून तो कानाच्या पाळीमध्ये अलगद सरकवतानाचे त्यांचे स्मितहास्य आजही डोळ्यांसमोर तरळते. मात्र, त्याच अत्तरातील ही नजाकत इकडे थोडी भडकपणाकडे झुकणारी वाटते. सुवासिक, पण बऱ्याच स्ट्रॉँग अशा या अत्तराचा वापर येथील लोक हात सल सोडून करतात. अंगावरच नव्हे, तर कपडय़ांवर, केसांवर, हातांवर आणि काहीजण चक्क चेहऱ्यावर अत्तर लावतात; जेणेकरून हस्तांदोलन करताना आणि अरबिक पद्धतीने गालावर गाल किंवा नाकाला नाक लाऊन हलके चुंबन देतानाही हा सुगंध दरवळेल.
अत्तर बनविण्याची प्रक्रियादेखील विलक्षण रंजक आहे. अरेबिक पफ्र्युमचा मुख्य घटक आहे धूप- जो ओमान आणि सोमालियामध्ये छोटय़ा झाडांवर िडकाच्या स्वरूपात आढळतो. प्राचीन काळी अरब लोकांनीच हा धूप इतर देशांत पोचवला. प्रतिकूल वातावरणात उंटावर हा धूप लादून ग्रह-ताऱ्यांनी दाखवलेल्या दिशेने प्रवास करता करता, कधी बाहरेनी मोती, घोडे तर कधी भारतातील सागाचे लाकूड, कधी चायना सिल्क तर कधी रोमन लोकांकडून सोने घेताना बदल्यात धुपाची देवाणघेवाण होत असे. पर्फ्यूममध्ये  धूप  तसेच जाई, अंबर, कस्तुरी, गुलाब आणि ऊद इत्यादींचाही समावेश असतो. कस्तुरीचा सुगंध अधिक काळ त्वचेवर दरवळण्यासाठी वापरला जातो, तर सौदी अरेबियामधे तफच्या खोऱ्यात मिळणाऱ्या गुलाबांपासून गुलाब तेल बनवले जाते. ते खास करून पुरुषांच्या पफ्र्युममधे वापरले जाते. भारतात आसाममध्ये वाढणाऱ्या आगार झाडाच्या सालीपासून ऊद किंवा आऊद मिळतो. या सालीपासून तेलार्क काढला जातो- ज्याचा अत्तरात वापर होतो. आगारवूडचे झाड दुर्मीळ आहे. एक किलो आगारवूडमधून एक मिली इतकेच तेल मिळू शकते. त्यामुळे त्याची किंमत सोन्याहूनही जास्त असते. जितके तेल जुने,  तितके ते अधिकाधिक महाग. दुबईमध्ये काही तुरळक दुकानातच १००-१५० वर्षांपूर्वीचे आगारवूड तेल पाहायला मिळते. गडद लालसर तपकिरी दिसणारे हे लाकूड काय गुणवत्तेचे वा किती किमतीचे असेल, याची एका नजरेत पारख करणारे काही पारंपरिक पारखीदेखील इथे आहेत.
इथल्या काही पफ्र्युमच्या दुकानात हौशी रसिकांसाठी त्यांच्या आवडीप्रमाणे पर्फ्यूम तयार करून मिळतो. पफ्र्युमच्या बाटल्यांचे आकार आणि कल्पकता हेही चित्तवेधक कलाकृतीचे नमुने असतात. अंगावर लावायच्या अत्तर आणि शुद्ध नसíगक सुगंधी तेलाव्यतिरिक्त अजून दोन सुगंध अरब संस्कृतीमधे दरवळतात- उद आणि बखहूर. कोळशाच्या जळणाऱ्या तुकडय़ावर चिमूटभर बखहूर किंवा छोटी काडी ऊद टाकताच त्याचा सुगंध पूर्ण घरात पसरतो आणि वातावरण अस्सल अरबी होऊन जाते. हा धूर अरेबिक लोक त्यांच्या कपडय़ांमधे, कपाटात आणि कधी कधी केसांनासुद्धा देतात. एखाद्या अरेबिक हॉटेलमधे गेलात तर प्रवेशद्वारात एखाद्या आकर्षक
धूपदाणीमध्ये ऊद किंवा बखहूर जळताना नक्की दिसेल.
प्रचंड उकाडा व दमट हवामान आणि त्यात पाण्याची कमतरता ही जरी अत्तर वापरायची सहज कारणे असली, तरी अरब संस्कृतीमध्ये अत्तराला फक्त गरज यापलीकडेही मोठे स्थान आहे. अत्तराचा सुगंध आजूबाजूचे वातावरणच नाही, तर अंतरमनसुद्धा शुद्ध करू शकतो अशी इथे मान्यता आहे. शेक्स्पीयरच्या लेखनात अरेबिक पफ्र्युमचा उल्लेख आढळतो. लेडी मॅकबेथ तिच्या रक्ताळलेल्या हाताकडे पाहून म्हणते “all the perfumes of Arabia could not sweeten them..” कदाचित तिलाही कल्पना असेल, की अरबिक पर्फ्यूम मधल्या जाई, अंबर, कस्तुरी, गुलाब आणि ऊदच्या गूढ, जादुई सुगंधांमध्ये जवळ जवळ काहीही धुवून टाकण्याची शक्ती आहे.
शिल्पा मोहिते-कुलकर्णी, दुबई – shilpa@w3mark.com