इनाम सहारनपूरचा. सहारनपूरची लाकडी खेळणी खूप प्रसिद्ध आहेत म्हणे. या सहारनपूरमध्येच इनामचा जन्म झाला. तिथेच तो वाढला. इनामच्या वडिलांना अकरा मुलं. त्यातला इनाम सहावा किंवा सातवा असावा. वडील नमाजी मुसलमान. लाकडाच्या खेळण्यांचाच पारंपरिक व्यवसाय करणारे. उत्तर प्रदेशातल्या छोटय़ाशा गावात एका कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात दहा भावंडांबरोबर वाढणाऱ्या इनामच्या डोक्यात नाटकाचं वेड कुठून शिरलं, हेच मला कधी कधी कळेनासं होतं. बरं, शिरलं तेही साधंसुधं नाही. एकदम ‘इप्टा’चाच मेंबर झाला. ‘इप्टा’ ही भारतीय रंगभूमीवर कार्यरत असणारी फार फार जुनी संस्था. ‘इप्टा’च्या शाखा भारतभर आहेत. रंगकर्मीना कुठलीही जात, कुठलाही पक्ष, कुठलाही धर्म नसला तरी ‘इप्टा’ ही संस्था कम्युनिस्ट विचारसरणीशी सलगी राखून असलेली. त्यामुळे इनाम जेव्हा राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात आला तेव्हा तो नानाविध स्फोटकांमधून तयार झालेल्या एखाद्या सुतळी बॉम्बसारखा होता. कट्टर मुस्लीम वातावरणात गेलेलं बालपण.. त्याच्या बरोब्बर विरुद्ध टोकाला जाणारे कम्युनिस्ट विचार.. आणि शिवाय सहारनपूरसारख्या छोटय़ा गावातून दिल्लीसारख्या महानगरात आल्यानंतर येणारं एक वैचारिक सैरभैरपण.. त्यावेळी एन. एस. डी.च्या बॉईज् हॉस्टेलमध्ये पहिल्या वर्षांच्या मुलांसाठी दोन डॉरमेट्रीज् असायच्या. १३ नंबर आणि ५ नंबर. १३ नंबर डॉरमेट्रीत इनाम माझ्या बाजूच्या बेडचा मालक झाला. साधारण पहिल्या तासालाच त्याची-माझी मैत्री झाली. का नसती झाली? त्यानं घरून आणलेल्या खिम्याचा डबा उघडला. झणझणीत वास आसमंतात घुमला. मी माझ्या बॅगेचं कुलूप उघडण्याच्या कार्यात मग्न होतो. एखाद्यानं मुस्काटात मारून आपल्याला स्वप्नातून जागं करावं, तसं त्या वासानं मला हलवलं. मी वर पाहिलं. इनाम माझ्याकडे पाहून हसला. डबा पुढे केला. एकाही शब्दाची अदलाबदल झाली नाही. मनीचे गुज मनाला कळले. सगळा डबा रिकामा केल्यावरच मी माझा खरकटा उजवा हात मागे करत डावा हात पुढे केला. ‘चिन्मय मांडलेकर.. मुंबई.’ इनामनं त्याचा हात पुढे केला : ‘इनाम उल हक.. सहारनपूर.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढे जसा आमचा कोर्स सुरू झाला तशा इनामच्या अंगीच्या नाना कळा दिसू लागल्या. सगळ्यात प्रकर्षांनं दिसली ती त्याची कुठल्याही मुद्दय़ावरून मॅनेजमेंटशी भांडण्याची जिगर. त्या काळात इनाम जवळजवळ ‘इन्कलाब जिन्दाबाद’ असं कपाळावर लिहूनच फिरत होता. मग हॉस्टेलचा कूलर बिघडलेला असो किंवा स्कूलमधला एखादा शिक्षक नीट शिकवत नसो; इनाम तक्रारीचा अर्ज घेऊन डायरेक्टरच्या केबिनबाहेर उभा दिसायचा. एकदा मी धावतपळत नऊचा वर्ग गाठायला निघालो होतो. इनाम मला हॉस्टेलच्या रेक्टरच्या घराबाहेर उभा दिसला. त्यांचं घर तेव्हा हॉस्टेलच्याच आवारात होतं. मी हाक मारली- ‘‘ओय! क्लास नहीं चलना क्या?’’ ‘‘चलना है. पर पहले ये कंप्लेंट की अर्जी दे दूं.’’ माझे खांदे पडले. ‘‘अब क्या कंप्लेंट है?’’ मी त्याच्याजवळ गेलो. ‘‘५ नंबर डॉरमेट्री में लीकेज है.’’ ‘‘लेकिन तुझे उससे क्या? अपन तो १३ नंबर में रहते हैं.’’ तो माझ्यावर चिडलाच. ‘‘जब प्रॉब्लेम खडी हो, तो तेरा-मेरा नहीं देखा जाता मांडलेकर! बस- लडा जाता है!’’ ‘‘ए! इप्टा की औलाद! भाषण मत दे. तेरे साथ ५ नंबर का एक भी लडका है क्या? छत उनकी टपक रही है ना?’’ ‘‘दॅटस् नॉट माई प्रॉब्लेम! जो बात सही है उसके लिये मैं लडूंगा.’’ मी निमूट शाळेचा रस्ता धरला. आणि त्या दिवशी वर्गात उशिरा आल्याबद्दल इनामनं शिक्षकांचा ओरडा खाल्ला. आपल्या या क्रांतिकारी वृत्तीचा लोक गैरफायदा घेतायत आणि आपली खिल्लीही उडवताहेत, हे त्याच्या ध्यानी येत नव्हतं. किंवा येत असलं तरी दुसऱ्यांची घमेली स्वत:च्या डोक्यावर वाहणं त्याला थांबवता येत नव्हतं.

Web Title: Chinmay mandlekar article on actor inaamulhaq
First published on: 28-05-2017 at 02:33 IST