गिरीश कुबेर – girish.kuber@expressindia.com 

नेमस्तांना बुळे, शामळू समजणं डोनाल्ड ट्रम्प यांना शोभतं. परंतु आपापलं काम नेमानं करतानाही व्यक्तिस्वातंत्र्य, विचार/ उच्चार/ संचार स्वातंत्र्य यांबद्दल सातत्यानं भूमिका घेणारे त्या देशात आहेत. माध्यमं सरळ ‘आम्ही या बाजूचे’ असं सांगू शकतात.. सांगतातही. आणि कलावंत, क्रीडापटूसुद्धा आपापली वैचारिक भूमिका जाहीर करताना दिसतात. हे सारं आहे म्हणूनच लोकप्रिय नेता प्रत्यक्षात लबाड आहे हे तिथे उघड होऊ शकतं. ते नसेल तर काय होतं, हे ‘नेता बोले आणि जनता डोले’ यातून दिसतंच..

‘‘जगात दोनच प्रकारचे लोक असतात. एक शिकारी आणि दुसरे सर्वस्व गमावणारे..’’ हे अमेरिकेचे पराभूत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे तीर्थरूप फ्रेड ट्रम्प यांचे वचन. फ्रेड ट्रम्प हे व्यवसायाने बिल्डर होते. ‘निष्ठुर’ हा शब्द सौम्य वाटावा असं त्यांचं घरात वागणं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा भाऊ फ्रेड (ज्युनियर) याला ते सतत हाडतहुडत करत. कारण तो स्वभावाने मवाळ होता. काही चूक, आगळीक झाली की माफी मागायचा. त्यामुळे ट्रम्प तीर्थरूपांचा संताप होत असे.

व्यवस्थित, राजमान्य अशा निवडणूक पराभवानंतरही ट्रम्प आपण हरलो हे का मान्य करत नाहीत, याचं उत्तर वरच्या परिच्छेदात मिळेल. ट्रम्प यांची पुतणी, मानसोपचारतज्ज्ञ मेरी ट्रम्प हिच्या ‘टु मच अ‍ॅण्ड नेव्हर इनफ : हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वल्र्ड्स मोस्ट डेंजरस मॅन’ या गाजलेल्या पुस्तकात हे ट्रम्प कुटुंबाचं वास्तव धक्कादायकपणे समोर येतं. त्यातून लक्षात येतं की ट्रम्प यांनी निवडणुकीस सामोरं जाताना आपलाही पराभव होऊ शकतो, ही शक्यताच गृहीत धरली नव्हती. अजूनही त्यांना तो मान्य नाही. त्यांच्या मते दोनच शक्यता : आपला विजय, नाहीतर निवडणूक हेराफेरी आणि विरोधकांकडून आपल्याला रोखण्याचा प्रयत्न. ‘माझा काका स्वप्रेमात आकंठ बुडालेला असतो. त्याचा गंड सुखावेल असं सतत सगळ्यांनी करावं लागतं. कारण त्याला माहीत आहे की आपल्याकडे मिरवावं असं काही नाही. आपण पोकळ आहोत..’ असं त्यांची सख्खी पुतणी या पुस्तकात लिहिते.

आणि त्यात हा पराभव पचवणं त्यांच्यासाठी आणखीनच जड. कारण ‘बुळे, शामळू, झोपाळलेले’ जो बायडेन हे आपल्यासारख्या देखण्या, मर्दानी व्यक्तिमत्त्वासमोर कसे काय टिकणार, हा ट्रम्प यांना पडलेला प्रश्न. बायडेन यांच्यासारख्या नेमस्तानं आपल्याला हरवलंय ही कल्पनाही त्यांना झेपत नाहीये. मर्दुमकीची भाषा करणाऱ्यापेक्षा मोठी, महत्त्वाची आणि जगाच्या इतिहासाला आकार देणारी कामं ही मृदू, मितभाषी आणि नेमस्त भासणाऱ्यांनीच केलेली आहेत, हा जगाचा इतिहास स्वप्रेमी ट्रम्प यांना ठाऊक असायची काहीच शक्यता नाही.

पण तो अमेरिकेतल्या बहुसंख्यांनी लक्षात घेतला आणि ट्रम्प यांचा पराभव झाला. ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही. लोकप्रिय नेता तुम्ही समजता तितका चांगला नाही आणि तुमचा समज आहे तसं तो देशाचं काहीही भलं करणारा नाही.. असं जनतेत बिंबवणं दूर; आधी त्यांना सांगणं हेच मोठं आव्हान असतं. तो देश अमेरिका आहे म्हणून हे आव्हान तुलनेनं तसं सोपं. पण तरीही अशा स्वमग्न अध्यक्षांचा रोष ओढवून घ्यायला हिंमत लागते. ती अमेरिकेतल्या दोन घटकांनी दाखवली : त्या देशातली माध्यमं आणि तिथले कलावंत व बुद्धिजीवी वर्ग.

आपल्याकडे आणीबाणीच्या वेळेस जसं वातावरण होतं तसं अमेरिकेत कायम असतं.  त्यावेळी(च) आपल्या देशात काय तो नागरिकांचा माध्यमांच्या विचार/ उच्चार स्वातंत्र्याला पाठिंबा होता. याचं कारण इंदिरा गांधी किती ‘भयंकर’ आहेत, अशी वातावरणनिर्मिती करण्यात त्यावेळच्या विरोधी पक्षाला आलेलं ‘यश’! तो एक अपवाद वगळता समस्त देश व्यक्तिस्वातंत्र्य, विचार/ उच्चार/ संचार स्वातंत्र्यासाठी लढलाय याचे फारसे दाखले आपल्या देशात नाहीत. या मुद्दय़ांसाठी लढणं, या स्वातंत्र्यांचा संकोच झाल्यास आवाज उठवणं आदी जबाबदारी (अजूनही) मूठभर बुद्धिजीवींची वगैरे. त्यांना अलीकडच्या काळात ‘लिब्टार्ड’ म्हणतात. एखादा नेता आपल्या लोकप्रियतेच्या आधारे ‘या ‘लिब्टार्ड’ वगळता अन्य कोणालाही विचार/ उच्चार स्वातंत्र्याची गरज नाही,’ असं सर्वसामान्यांना पटवून देऊ शकला तर आपल्यातील बहुसंख्य आनंदाने माना डोलवतात.

या सत्याची तुलना बिहार निवडणुकीत काही वर्षांपूर्वी प्रत्यक्ष अनुभवलेल्या प्रसंगाशी होऊ शकेल. लालूप्रसाद यादव यांची लोकप्रियता टिपेला होती तेव्हाची ही घटना. त्यांच्या निवडणूक प्रचार सभेआधी आम्ही काही पत्रकारांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. त्यात अर्थातच बिहारमध्ये रस्त्यांची अवस्था किती भीषण आहे वगैरे मुद्दे मांडले गेले. लालूंनी नंतरच्या सभेत लगेच हा धागा पकडला आणि समोर बसलेल्या आम्हा ‘बम्बई के पत्रकारां’कडे पाहत गर्दीला उद्देशून ते म्हणाले : ‘‘हे मुंबईचे पत्रकार टीका करतात.. बिहारचे रस्ते खराब आहेत म्हणून. पण तुम्ही सांगा, सरकारी पैसा या रस्त्यांवर खर्च करायचाच कशाला? मी उडनखटोल्यातून (पक्षी : हेलिकॉप्टर) येतो आणि तुम्ही बैलगाडीतून. तेव्हा पाच वर्षांतून एकदा येणाऱ्या या बंबई के पत्रकारांसाठी रस्त्यांवर पैसा वाया घालवावा असं तुम्हाला वाटतं का?’’  ‘‘नहीं.. नहीं..’’ असा समोरच्या गर्दीचा एकमुखी चित्कार.

आता बदल असलाच तर इतकाच, की या रस्त्यांची जागा माध्यम स्वातंत्र्यानं घेतली असावी. त्यामुळे अनेकांना माध्यम स्वातंत्र्य आजही तितकं काही महत्त्वाचं वाटत नाही. पण सामान्य अमेरिकी नागरिक मात्र आपल्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यास प्राणपणानं जपत असतो. सत्ताधारी आपल्या विचारांचा आहे की नाही, आपल्या आवडत्या पक्षाचा आहे की नाही, असल्या क्षुद्र आणि दरिद्री विचारांतून त्या देशात माध्यम/ विचार स्वातंत्र्याकडे पाहिलं जात नाही. यात अत्यंत महत्त्वाचा भाग असा की, समाजातील एखाद्या अप्रगल्भ घटकास असं काही वाटलंच, तरी समाजातील केवळ बुद्धिजीवीच नव्हे, तर कला, क्रीडा क्षेत्रांतले धुरीणही जनमानसाला या स्वातंत्र्याची जाणीव करून देतात.

याचा हिशेब मांडताना ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ही आणि अशी वर्तमानपत्रं वा सीएनएन, एमएसएनबीसी वगैरे वृत्तवाहिन्या यांचा उल्लेख करायची गरज नाही. कारण माध्यमांचं ते काम आणि धर्मच आहे. तेव्हा ट्रम्प यांच्या विरोधात माध्यमं लढली हे काही विशेष नाही. याबाबत सत्तेला सवाल न करणाऱ्यांचा उल्लेख करायला हवा. पण त्यातही अमेरिकी प्रामाणिकपणा असा की, ‘आम्ही ट्रम्प समर्थक आहोत’ हे फॉक्ससारखी वाहिनी मान्य करते. निष्पक्षपणाचा, सामान्य माणसाचा आवाज असल्याचा दावा करायचा आणि प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांची मुखवाहिनी म्हणून दुकान चालवायचं, असा ‘रिपब्लिकी’ उद्योग फॉक्सनं केला नाही. तेव्हा व्यवस्थेविरोधात काहीएक ठाम राजकीय भूमिका घेणाऱ्यांत वृत्तमाध्यमांचा विचार करायची गरज नाही. माध्यमांचा जन्मच यासाठी असतो आणि त्याची किंमत ते मोजत असतात. प्रश्न असतो तो समाजातल्या विविध क्षेत्रांतल्या धुरिणांचा. विशेषत: कला आणि क्रीडा! कारण या क्षेत्रांतील मान्यवरांची लोकप्रियता अफाट असते. त्यांच्या भूमिकेचा जनमानसावर काहीएक परिणाम होत असतो.

गेल्या चार वर्षांत अमेरिकेत अशा असंख्य जणांनी आपलं हे इमान राखलं. किती नावं सांगावीत? उच्च दर्जाची अभिनेत्री मेरिल स्ट्रीप, तितकाच तगडा कलाकार जॉर्ज क्लुनी, रॉबर्ट डी निरो, मॅडोना, जिमी किमेल, अ‍ॅलेक बाल्डवीन, जॉन लेजंड, लेडी गागा, ऑलिव्हिया वाईल्ड, जगप्रिय लेखिका जे. के. रौलिंग, स्टिफन किंग, कोलीन केपरनिकसारखा प्रचंड लोकप्रिय अमेरिकी फुटबॉल खेळाडू अशी शेकडय़ांनी नावं देता येतील. या सर्वानी ट्रम्प यांच्या बेताल वर्तनाविरोधात जाहीर भूमिका घेतली. यातला महत्त्वाचा भाग असा की, केपरनिकसारखा खेळाडू वा मेरिल स्ट्रिप, जॉर्ज क्लुनी, रॉबर्ट डी निरो वगैरे ‘खेळ आणि राजकारण वेगळं ठेवायला हवं’ किंवा ‘कला क्षेत्राने राजकारणात पडायची गरज नाही,’ अशी छछोर लबाड भूमिका घेतली नाही. म्हणून अमेरिकेत ‘सेलीब्रिटिज’ हा ‘लबाड निर्बुद्धता’ या शब्दाचा समानार्थी मानला जात नाही. उलट, क्रीडा आणि राजकारण, कला आणि राजकारण यांचा अन्योन्य संबंध आहे आणि या क्षेत्रातल्यांनी राजकारणाविषयी भूमिका घेणं टाळू नये, असंच या सगळ्यांचं ठाम म्हणणं होतं.

हा प्रामाणिकपणा निकोप समाजासाठी अत्यंत मोलाचा. कारण जगण्याच्या व्यापांत असं एकही क्षेत्र नाही की ज्यास राजकारणाचा स्पर्श नाही किंवा राजकारणाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणून ‘राजकारण हा काही आपला प्रांत नाही बुवा!’ असं म्हणणारे सांस्कृतिकदृष्टय़ा हर्षद मेहता वा तत्समांइतकेच लबाड असतात. अर्थव्यवस्थेतले कच्चे दुवे हेरून हर्षद मेहतानं आपली धन केली. त्याप्रमाणे आपल्याकडे काही लेखक/ कलावंत/ क्रीडाराव सांस्कृतिक व्यवस्थेतले कच्चे दुवे हेरून त्यावर आपली पोळी भाजत राहतात. या वर्गानं व्यवस्थेविरोधातच भूमिका घ्यायला हवी असं नाही. जे काही सुरू आहे ते उत्तम आहे असं वाटत असेल तर तशी तरी भूमिका घ्या! काही हरकत नाही!! लोकशाही ते स्वातंत्र्य देतेच. ट्रम्प यांची बाजू घेणारेही लेखक/ कलावंत अमेरिकेत होतेच. पण त्यांनी ती बाजू जाहीरपणे घेतली. मात्र, आपल्याकडच्या लबाडांत तितकीही धमक नाही. कारण मनात धाकधूक : न जाणो उद्या अमुक पक्षाचं सरकार जाऊन तमुक पक्षाचं सरकार आलं तर काय?

मग अशा समाजात तटस्थता या गुणाचं उदात्तीकरण केलं जातं. ‘कोणाच्या अध्यात ना मध्यात’ हा हवाहवासा सद्गुण ठरतो. आणि मग अशा समाजात विचार/ उच्चार स्वातंत्र्य हे प्राणपणानं राखण्याचं मूल्य राहत नाही. मिळालं मिळालं, नाही नाही.. अशी समाजाची त्याबाबतची धारणा होते. अमेरिकेत सुदैवाने असं नाही. ‘व्यक्त न होणं हेसुद्धा एक प्रकारे व्यक्त होणं’ अशी चापलुशी चलाखी करण्याची गरज अनेकांना वाटत नाही. आणि म्हणून आधीच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणारे, आपल्या कारकीर्दीत प्रत्येक यंत्रणा अशक्त करणारे असे ट्रम्प पराभूत होऊ शकतात.

लोकशाही मूल्यांवर आकंठ आणि अव्यभिचारी प्रेम करणाऱ्यांनी हे सत्य लक्षात घ्यायला हवं. तटस्थता हा गुण असल्याचा दावा करून त्याच्याआड आपल्या पाठीचा लिबलिबित कणा लपवण्याचा प्रयत्न करू नये. तटस्थता म्हणजे सामथ्र्यवानापुढे शरणागती. अन्यायकारी, अपराधी सामथ्र्यवानांना असे तटस्थ हवेच असतात. पण विख्यात कवी रामधारी सिंह ‘दिनकर’ म्हणून गेले त्याप्रमाणे ‘जो तटस्थ है, समय लिखेगा उनके भी अपराध..’

अमेरिकेत तरी निदान ही वेळ येणार नाही! जो बायडन यांच्या विजयाचा हा सांगावा.