अधुऱ्या प्रेमकथा कधी कधी अत्यंत विलोभनीय वाटतात. ‘अद्वैत’ हा ‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’ आणि ‘अ थाऊजंड कंट्री रोड्स’ या कादंबऱ्यांचा एकत्रित अनुवाद आहे. १९६५ साली रॉबर्ट किनसेड आणि फ्रान्सेस्का जॉन्सन यांची भेट होते. अमेरिकेतील आयोवा राज्यात विंटरसेट या गावात छप्पर असणारा वैशिष्टय़पूर्ण पूल आहे. या पुलाचे फोटो काढण्यासाठी रॉबर्ट येतो. रॉबर्ट ‘नॅशनल जिओग्राफिक’ मासिकासाठी हे काम करतो आहे. फ्रान्सेस्का ही शिक्षिका आहे. तिने त्या काळाच्या रुढीप्रमाणे स्वत:ला नवरा, मुलं आणि घराला समर्पित केले आहे. या दोघांमध्ये अवघ्या चार दिवसांत उमलणारे प्रेम दोघांचे संपूर्ण आयुष्य एकीकडे उद्ध्वस्त करून टाकते आणि दुसरीकडे समृद्धही करून टाकते. हे विधान विरोधात्मक असले तरी प्रेमाच्या बाबतीत सगळे काही शक्य असते.

‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’ हे पुस्तक फ्रान्सेस्काच्या निधनानंतर तिच्या दोन्ही मुलांच्या प्रयत्नांतून निर्माण झाले. मुलांनी आईचे हे विवाहबाहय़ प्रेमप्रकरण समजून घेणे, तिचा त्याग, तिची तडफड समजून घेणे हे विलक्षणच म्हणायला हवे. हे अस्सल अमेरिकन वैशिष्टय़ वाटते. रॉबर्ट जेम्स वॉलर यांनी हे पुस्तक लिहिले. त्यासाठी फ्रान्सेस्काने लिहिलेल्या डायऱ्यांचा त्यांनी वापर केला. त्यांनी स्वत:हून रॉबर्ट किनसेडवर भरपूर संशोधन केले. रॉबर्टचे विलक्षण व्यक्तिमत्त्व त्यांनी शब्दांत पुरेपूर उतरविले आहे. रॉबर्टची फोटोग्राफी श्रेष्ठ कलेच्या पातळीवरची होती. रॉबर्ट ‘टेकिंग’ फोटो असे न म्हणता ‘मेकिंग’ फोटो असे म्हणतो.

Marathi Theatre Classic, All the Best play, 50th show within three months, All the Best play Return, all the best return with new actors, marathi theatre, Shivaji mandir, theatre, marathi plays,
नव्या संचातील ‘ऑल द बेस्ट’चा ५० वा प्रयोग, तीन महिन्यांत ५० व्या प्रयोगापर्यंत वाटचाल
Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!

फोटोग्राफीसारख्या क्राफ्ट वरचढ ठरणाऱ्या कलेत हे करणे कठीण असते. फ्रान्सेस्का रॉबर्टला ‘चित्ता’ म्हणते. तिच्यासाठी तो एक निखळ पौरुष आहे. रॉबर्टने फ्रान्सेस्कातली मनस्विनी, उन्मुक्त स्त्री जागृत केली. अवघ्या चार दिवसांच्या सहवासातच ते एकमेकांशी पूर्णपणे एकरूप झाले. नंतर रॉबर्ट फ्रान्सेस्काला स्वत:सोबत येण्यासाठी विनवतो खरा; परंतु तिच्यावर कुठलाही दबाव मात्र टाकत नाही. फ्रान्सेस्कासाठी तिच्या सामान्य नवऱ्याला आणि पौगंडावस्थेतील दोन मुलांना वाऱ्यावर सोडून येणे अशक्य असते. रॉबर्टसारख्या भटक्या, कलंदर माणसावर स्वत:ची कायमची सोबत लादणे हा अन्याय होईल, ही शक्यताही तिला वाटते. रॉबर्ट आणि फ्रान्सेस्काचे प्रेम चिरकालीन वेदनेसारखे ठसठसत राहते.

लीना सोहोनी यांनी वरील दोन कादंबऱ्यांचा केलेला हा अनुवाद प्रवाही आहे. पण त्यातले ‘प्रत्युत्पन्नमती’सारखे शब्द कधी कधी खडय़ासारखे बोचतात. तसेच वर्णनातही काही वेळा वारंवारता जाणवते. ‘अ थाऊजंड कंट्री रोड्स’ ही कादंबरी याच पुस्तकाच्या उत्तरार्धात अनुवादित केली आहे. ‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’च्या उंचीवर गेलेल्या अनुभवानंतर लगेचच ‘अ थाऊजंड कंट्री रोड्स’ वाचणे नकोसे वाटते.

‘अ थाऊजंड कंट्री रोड्स’मध्ये फ्रान्सेस्काशी झालेल्या ताटातुटीनंतर रॉबर्टच्या विरहाच्या आयुष्याचे आणि रॉबर्टच्या अनौरस मुलाने त्याच्या घेतलेल्या शोधाचे वर्णन आहे. बऱ्याच वर्षांनी रॉबर्ट त्याच रोझमन ब्रिजला परत एकदा शेवटची भेट देऊन येतो, त्यावेळी फ्रान्सेस्का आणि रॉबर्टची चुकामूक होते. ही कादंबरी वाचताना ‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’ हा मेरील स्ट्रीप आणि क्लिंट ईस्टवूड यांच्या अभिनयाने सजलेला चित्रपट एकीकडे आठवत राहतो.

‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’ ही एका वेगळय़ाच काळातील प्रेमकहाणी आहे. संपर्कसाधनांचा विस्फोट झाल्याच्या आजच्या काळात तर ही प्रेमकथा एक चमत्कारच वाटते. अधुरी राहिल्याने ही प्रेमकथा दिव्यत्वाची पातळी गाठते असेही वाटते. कदाचित प्रेमाच्या चिरंतनतेसाठी दोघांमध्ये अंतर राहणे आवश्यक असेल. त्यातूनच ही कथा चिरंतन प्रेमाचं यथार्थ चित्रण ठरते.

‘अद्वैत’,

मूळ लेखक- रॉबर्ट जेम्स वॉलर,

अनुवाद- लीना सोहोनी,

मेहता पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे- ३३२ , मूल्य- ३५० रुपये.