जन्म, मृत्यू, गंभीर आणि थकवणारी आजारपणं अशा भावनाशील प्रसंगांत अनेकदा डॉक्टर साक्षी असतो. एव्हढेच नव्हे, तर अशा वेळी डॉक्टर म्हणून कर्तव्य बजावत असताना तोही अनेकदा भावनिक, मानसिकदृष्टय़ा त्यात गुंततो. डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ‘डॉक्टर म्हणून जग(व)ताना ’ हे पुस्तक अशा निरनिराळ्या उत्कट अनुभवांकडे संवेदनशील, समंजस व चिंतनशील भूमिकेतून बघणारे आहे. ‘बालरोगतज्ज्ञ’ बनण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेताना आलेल्या अनुभवांपासून कराडमध्ये तीस वष्रे एक संवेदनशील, जबाबदार, प्रामाणिक बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना, तसेच काही सहकारी डॉक्टरांसोबत काढलेले मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल यशस्वीपणे चालवताना आलेले वेगवेगळय़ा टप्प्यांवरचे हृदयस्पर्शी अनुभव व त्यावरील चिंतन या पुस्तकात आहे. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण हे ‘शिकाऊ डॉक्टर’ला सर्व अंगाने ताणणारे असते. दिवसरात्र इस्पितळात काम, त्याचा शारीरिक, मानसिक ताण, अतिशय अवघड परीक्षेसाठी अभ्यास या सर्वाना तोंड देत केलेल्या प्रवासापासून पुस्तकाची सुरुवात होते. पुढे अत्यंत नावारूपाला आलेल्या डॉक्टरी व्यवसायातून ‘वेळेवर’ निवृत्त होईपर्यंत वेगवेगळय़ा टप्प्यांत आलेले अनुभव नुसते कालक्रमानुसार न मांडता त्यातून उलगडलेल्या अनेकविध मुद्यांभोवती डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर (डॉ. सुब्र) यांनी प्रकरणे गुंफली आहेत.

नवजात बाळ गंभीर आजारी पडल्यास त्याला जगवण्याचा आटोकाट प्रयत्न करणे हे डॉक्टरचे कर्तव्य आहे हे खरेच; पण जगलेले मूल जन्मभर मतिमंद राहील अशी शक्यता असल्यास डॉक्टरलाही अनेकदा योग्य काय या बाबत संभ्रम पडतो. कारण मूल मतिमंद होईल असा अंदाज अगदी क्वचितप्रसंगी खोटा ठरतो, पण जर खरा ठरला तर अनेकदा मतिमंद जिवाचे, पालकांचे आयुष्य कमालीचे ओढग्रस्तीचे, दु:खदायक शेवट असलेले बनते. ‘संभ्रम’ या प्रकरणात याविषयी वाचताना जाणवते, की काही प्रश्नांना समाधानकारक उत्तरे नसतात.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती

एकीकडे पालकांच्या वात्सल्याचे कितीतरी अनुभव येत असताना, दुसरीकडे आपल्या बाळाच्या मृत्यूकडे गरिबीमुळे अतिशय निर्विकारपणे, कोरडेपणे पाहावे लागणारा बाप किंवा पाचवीही मुलगीच झाली म्हणून तिला दूध न पाजता उपाशी मारून टाकू पाहाणारे कुटुंब व त्यात सामील व्हावे लागलेली मुलीची आई हेही चित्र डॉ. सुब्र यांनी पाहिले. ‘वात्सल्य’ या प्रकरणात त्या केवळ या अनुभवकथनाशी न थांबता, ‘वात्सल्याची भावना मूलभूत आहे का?’ असा प्रश्न विचारून उत्क्रांतिवादाच्या परिप्रेक्ष्यात त्याचे उत्तर शोधू पाहतात.

मृत्यूच्या दाढेतून रुग्णाला खेचून आणणे, क्वचित आढळणाऱ्या आजाराचे अचूक निदान करणे, काही वेळा हताशपणे पराभवाला सामोरे जाणे, आपल्या मुलांप्रति असलेले कर्तव्य, वाटणारी माया व रुग्णांची गरज यांत समतोल साधताना होणाऱ्या घालमेलीला तोंड देणे.. असे अनेक प्रसंग या पुस्तकात आहेत. तज्ज्ञ, संवेदनशील डॉक्टरचे जग डॉ. सुब्र रेखाटतात. आपण केलेल्या चुका व त्यातून घेतलेले धडे हेही प्रांजळपणे मांडणारे एक अख्खे प्रकरण पुस्तकात आहे. ते वाचताना डॉक्टरी कामात कसे चकवे असतात याचीही कल्पना वाचकांना येईल. एकविसाव्या शतकातली नवी सामाजिक परिस्थिती व मूल्ये यांतून पालकत्व, बालसंगोपन, संस्कार यांबाबत नव्या रूपात प्रश्न उभे राहिले आहेत. त्यांना एक सहृदयी डॉक्टर व पालक म्हणून सामोरे जाताना आलेले अनुभव व त्यासोबतचे चिंतन ‘संस्कार’ या प्रकरणात मांडले आहे.

गेल्या काही वर्षांत प्रामाणिक तज्ज्ञ डॉक्टरांपुढे दोन प्रकारची आव्हाने उभी ठाकली आहेत. एक म्हणजे ज्ञान, कौशल्याच्या आधारे रुग्णाला बरे करत व्यावसायिक यश कमावण्याचे दिवस मागे पडले. त्यातून वाढत्या वैद्यकीय बाजारपेठेसाठी केवळ पशाच्या जोरावर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, तज्ज्ञ-सेवा पुरवत अधिकाधिक पसा कमावण्यासाठी मोठी, कॉर्पोरेट व तसल्याच प्रकारची तथाकथित धर्मादाय हॉस्पिटल्स उभी राहिली. त्यांनी भल्याबुऱ्या मार्गाने वर्चस्व कमावल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांनी स्वत:च्या मगदुराप्रमाणे चालवलेली छोटी हॉस्पिटल्स लयाला जाऊ लागली. दुसरे म्हणजे, रुग्ण-डॉक्टर संबंध वेगाने पूर्णपणे व्यापारी बनू लागल्याने ते वेगाने बिघडू लागले. या दोन्ही मुद्यांबाबतचे लेखिकेचे अनुभव महत्त्वाचे आहेत.

त्यांचा पहिला मुद्दा आहे ग्रुप-प्रॅक्टिसचा. समविचारी डॉक्टरांनी एकत्र येऊन आधुनिक मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल काढण्याची आवश्यकता त्या विशद करतात. आधुनिक वैद्यकीय उपकरणे सामायिकपणे वापरणे, एकाच इमारतीत निरनिराळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणे, आदी गोष्टींतून सेवेचा दर्जा व आर्थिक कार्यक्षमता वाढवता येते. आजच्या कॉर्पोरेट जगातही अशी मध्यम आकाराची हॉस्पिटल्स चांगली चालू शकतील. कारण शेवटी रुग्णांना नुसत्या तपासण्या, औषधे पुरत नाहीत, तर दिलासा देणारा, विश्वासाचा डॉक्टर नावाचा माणूस हवा असतो. हॉस्पिटल्स मुख्यत: डॉक्टरच्या लौकिकावर चालतात हे डॉ. सुब्र व सहकाऱ्यांनी वेळीच ओळखले; परंतु अशी ग्रुप प्रॅक्टिस करण्यासाठी व्यक्तिगत स्वार्थ, अहंभाव यांच्या आहारी न जाता, पशाला सर्वस्व न मानता काही पथ्ये पाळत, एकमेकांना सांभाळत, सहकार्य करत एकत्र काम करायची तयारी हवी. महाराष्ट्रात असे करणारी काही उदाहरणे आहेत. अशा उदाहरणांपासून नवीन डॉक्टरांना नक्कीच मार्गदर्शन मिळेल.

दुसरा मुद्दा आहे डॉक्टर-रुग्ण संबंधांचा. ‘विश्वास’ या प्रकरणात त्याची संतुलित चर्चा केली आहे. केवळ समाजाला, रुग्णांना दोष देत डॉक्टरांची बाजू मांडणे अशी नेहमीची ‘डॉक्टरी मांडणी’ डॉ. सुब्र करत नाहीत. डॉक्टरी व्यवसायातील काही अपप्रवृत्तींची थोडक्यात चर्चा करून डॉक्टरांनी प्रॅक्टिस करताना, रुग्णांशी वागताना कोणत्या मूलभूत गोष्टी वा पथ्ये पाळण्याची आवश्यकता आहे, याविषयी त्यांनी सविस्तर लिहिले आहे. पुढे रुग्ण व नातेवाईक यांनी पाळायची पथ्ये सांगत काही नेमक्या सूचनाही मांडल्या आहेत. तीस वष्रे डॉक्टरी केल्यावर सुखा-समाधानाने निवृत्त होण्याचा असाधारण निर्णय घेण्यामागची डॉ. सुब्र यांची भूमिका शेवटच्या प्रकरणात आली आहे, ती मुळातूनच वाचायला हवी.

एकूणच एका प्रगल्भ, समंजस, सहृदय डॉक्टरचे हे अनुभवकथन, चिंतन आहे. त्यातून प्रामाणिक तज्ज्ञ डॉक्टर, त्यांचे परिश्रम, कर्तव्यभावना, रुग्णांशी असलेले मानवी नातेसंबंध अशांनी बनलेल्या वैद्यकीय जगाच्या एका कालखंडातील ‘ओअ‍ॅसिस’चे दर्शन घडते.

डॉक्टर म्हणून जग(व)ताना ’- डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर, राजहंस प्रकाशन,

पृष्ठे- २३०, मूल्य- ३०० रुपये.