‘हरवलेले पुणे’ हे डॉ. अविनाश सोवनी यांचे पुस्तक पुणे शहर ‘स्मार्ट सिटी’ होण्यापूर्वी आले आहे, हे एका परीने बरे झाले. एकेकाळी हे शहर म्हणजे पेन्शनरांचे शहर होते. पुढे ते सायकलींचे शहर झाले. त्याही पुढे ते वाडे पाडून अपार्टमेंट उभारणाऱ्यांचे शहर झाले. आता हे शहर सर्वाधिक प्रदूषणग्रस्त, बेशिस्त वाहनचालकांचे, बकालपणाचे, कोणताच आकार नसलेले, अक्राळविक्राळ वाढणारे शहर झाले आहे. मग हे शहर लक्षात ठेवायचे, ते का? इतिहासाने या शहराची नोंद का ठेवायची? आश्चर्य वाटेल, परंतु हे शहर एकेकाळी भारताचे नेतृत्व करीत होते. दिल्लीचा बादशाह कोण होणार, हे पुणे शहर ठरवीत होते. या शहराला प्राचीन आणि मध्ययुगीन असा मोठा वारसा आहे. हा वारसा काय आहे याची जाणीव वाचकांना डॉ. अविनाश सोवनी करून देतात. हे या पुस्तकाचे यश आहे.

‘हरवलेले पुणे’ हा ग्रंथ म्हणजे एका अर्थाने स्थानिक इतिहासलेखन आहे. युरोपात उदयाला आलेल्या या शाखेने इतिहासात मोलाची भर घातली आहे. इतिहासाची भौगोलिक निकषांवर केली गेलेली विभागणी वा भूगोलाधारित इतिहास म्हणजे स्थानिक इतिहासलेखन. भारतातील प्रत्येक गावाला स्वत:चा असा एक इतिहास, स्वत:ची अशी एक संस्कृती आहे. एखाद्या व्यक्तीच्या वागण्या- बोलण्याच्या ढबीवरून आपण क्षणार्धात ओळखतो, की ती व्यक्ती कोणत्या गावची आहे! याबाबत पुणे शहर भारतभर प्रसिद्ध आहे.

the new york times book review
बुकमार्क : ग्रंथ परिचयाच्या विश्वात..
ghorpade ghat pune history
Video: ऐतिहासिक घोरपडे घाट…जुन्या पुण्याची गोष्ट सांगणारा अमूल्य वारसा!
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…

‘हरवलेले पुणे’मध्ये पुण्याचे ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि प्रशासकीय असे बहुविध पैलू लक्षात घेतलेले आहेत. या प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे विचार केला गेला असला तरीही हे सारे घटक आतून एकमेकांशी जोडलेले असतात. ‘हरवलेले पुणे’ हा पुण्याच्या सखोल व सर्वागीण अभ्यासाचा एक उत्तम नमुना आहे. अशा प्रकारचे लेखन हा एकाच वेळी लेखकाचा आत्मशोध आणि समाजाच्या स्वत्वाचा शोध असतो. त्यामुळे हा ग्रंथ म्हणजे पुण्याच्या संदर्भातील केवळ घटनांची जंत्री नसून तो चिकित्सक, अन्वयार्थी, सैद्धान्तिक, आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देणारा आणि इतिहासापासून नक्की कोणता बोध घ्यायचा, याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. अर्थात, त्यामुळे हा ग्रंथ लिहून झाला म्हणजे पुण्यासंदर्भातील इतिहासलेखनाचा पूर्णविराम झाला असे होत नाही. हा स्वल्पविराम आहे. कारण इतिहासलेखन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. इतिहास घडण्यासाठी व इतिहास लिहिण्यासाठी व्यक्ती, समाज, स्थळ व काळ हे चार घटक अत्यंत महत्त्वाचे. लेखकाने पुण्याचा इतिहास शोधताना या चारही घटकांना यथोचित महत्त्व दिले आहे.

हे पुस्तक वाचताना डॉ. राजा दीक्षित यांच्या ‘प्रादेशिक इतिहासाचा वर्तमान संदर्भ’ या लेखाची पुन: पुन्हा आठवण होते. त्यात डॉ. दीक्षित यांनी स्थानिक इतिहासाचे बलस्थान एका वाक्यात सांगितले आहे. ते लिहितात, ‘इतिहास हा वैश्विकता आणि विशिष्टता या दोहोंचा घेतलेला वेध असतो. त्यातील अनेकदा दुर्लक्षित राहणारा विशिष्टतेचा पैलू प्रादेशिक इतिहासामुळे प्रकाशात येतो.’ सोवनी यांच्या पुस्तकातून हा पैलू समग्रतेने पुढे आला आहे.

३४१ इतकी दणदणीत पृष्ठसंख्या असणाऱ्या या ग्रंथात ५५ लेख आहेत. प्राचीन ते अर्वाचीन अशी स्थळे किंवा पुण्याच्या खुणा या पुस्तकात आहेत. ‘प्राचीन पुणे’ या पहिल्याच लेखाने पुस्तकाची सुरुवात झाली आहे. यात ‘आर्यन सिनेमा’ नावाचा एक लेख आहे. हा लेख पुण्याविषयी प्रेम असणाऱ्या आणि ‘आर्यन सिनेमागृह’ पाहिलेल्या लोकांच्या मनावरची खपली काढणारा आहे. आर्यन सिनेमागृहाची अतिशय सुंदर वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. आता हे नुकसान भरून काढणे अवघड आहे.

पुस्तकात काही अत्यंत दुर्मीळ छायाचित्रे वापरण्यात आलेली आहेत. आताशा फारशी वापरात नसलेली सेपिया किंवा तपकिरी छटेतील छायाचित्रे, कृष्णधवल छटेतील छायाचित्रे आणि रंगीत छायाचित्रे यांचा मुबलक वापर या पुस्तकात आहे. काही ठिकाणी विषय चांगला समजावा म्हणून कल्पनाचित्रांचासुद्धा वापर केला आहे. त्यामुळे वस्तू वा वास्तू समजण्यास मदत होते.

या पुस्तकाला जे संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे त्याचे सर्वाधिक महत्त्वाचे कारण म्हणजे ८१ छोटे-मोठे नकाशे, ५७ छायाचित्रे, ३ कल्पनाचित्रे, ३ रेखाचित्रे, ३० मराठी संदर्भग्रंथांची यादी, ८ इंग्रजी संदर्भग्रंथ, ४ जुने नकाशे यात दिलेले आहेत. उपलब्ध सर्व संदर्भग्रंथांचा पुरेपूर वापर केल्याचे या पुस्तकात दिसून येते. प्राथमिक साधने ऊर्फ अस्सल साधनांचा पुरेपूर वापर केल्यामुळे ग्रंथाला विश्वासार्हता प्राप्त झाली आहे. तसेच लेखकाने दोन महत्त्वाच्या संदर्भग्रंथांबद्दल जी टिप्पणी केलेली आहे ती महत्त्वाची आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यात इतिहास संशोधकांना त्याची मदत होईल.

लेखक लिहितात : ‘विशेषत: ‘पुणे शहराचा इतिहास’ हे ना. वि. जोशी यांनी इ. स. १८६८ मध्ये लिहिलेले पुस्तक किंवा इ. स. १८८५ मध्ये प्रसिद्ध झालेले ‘पुणे गॅझेटियर’ या दोन्ही पुस्तकांमधील पुण्याच्या इतिहासाबाबतची माहिती फारच दिशाभूल करणारी आहे. अर्थात, यात या दोन्ही पुस्तकांचा दोष नाही.’ या दोन्ही पुस्तकांतील माहिती ऐतिहासिक पुराव्यांपेक्षा चालत आलेल्या आख्यायिका आणि ऐकीव माहिती यांवरच आधारित असल्यास नवल नाही. गॅझेटियरकडे बघायचा लोकांचा दृष्टिकोन अजूनही एक विश्वासार्ह साधन असाच आहे. अशा वेळेला लेखकाचे हे जपून केलेले विधान त्या विश्वासार्हतेला धक्का देणारे आहे. या पुस्तकाचा तो विषय नाही, परंतु लेखकाने या दोन्ही साधनग्रंथांवर स्वतंत्र लेख लिहून त्यातील त्रुटी दुरूस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा लेखकाने नमूद केल्याप्रमाणे, ‘परंतु दुर्दैवाने, मराठी कागदपत्रांतील अस्सल माहिती न लक्षात घेता केवळ ‘पुणे शहराचा इतिहास’ आणि ‘पुणे गॅझेटियर’मधील माहितीच संदर्भ म्हणून अनेक मंडळी आजही वापरताना दिसतात..’ याला आळा बसेल. जसजशी नवनवी साधने पुढे येत जातील तसतसे आपणास पुन्हा संदर्भसाहित्यात दुरूस्त्या कराव्याच लागतील. गॅझेटियरची आवृत्ती काढणारे महाराष्ट्र शासन आणि ‘पुणे शहराचे वर्णन’ची कॉपीराइटमुक्त आवृत्ती काढणारे खासगी प्रकाशक हे मनावर घेतील काय?

पुण्यात सापडलेल्या चौथ्या शतकातील पुराव्यांपासून पुस्तकाची सुरुवात झाली आहे. पुण्यात महानगरपालिकेच्या यादीनुसार २५० पेक्षा जास्त हेरिटेज स्थळे (वारसास्थळे) आहेत. त्यातील सगळय़ांची दखल या पुस्तकात घेण्यात आलेली नाही. सर्वच स्थळांना न्याय द्यायचा झाल्यास या पुस्तकाचे पाच खंड काढावे लागतील. लेखकाने हे मनावर घेतल्यास आणि प्रकाशकांनी ते छापण्याचे ठरवल्यास पुण्याच्या इतिहासासंदर्भात मोलाची भर पडेल. या पुस्तकात वारसास्थळांच्या जोडीला पेठांचा विकास, त्यासंदर्भातील हकिकती, आख्यायिका यांचा पुरेपूर वापर केला आहे. ज्या गोष्टींना आधार नाही, पण तर्काच्या आधारे ज्या पटू शकतील अशा गोष्टींना लेखकाने पुस्तकात स्थान दिले आहे. अर्थात, लेखकाने तसे स्पष्टपणे नमूद केलेले आहे.

पुण्यातील अतिपरिचित ठिकाणांबरोबरच आता विस्मृतीत गेलेली ठिकाणे लेखकाने पुराव्यानिशी जिवंत केलेली आहेत. केदार वेस आणि कासार विहीर, जुना कापडगंज आणि चोळखण आळी, कारकोळपुरा, हनुमंत पेठेची नाना चावडी, खडकीचे मैदान, शिवाजी तलाव आणि उद्यान व गुलटेकडी या लेखांमधून विस्मृतीत चाललेले पुणे शहर समोर येते.

‘हरवलेले पुणे’- डॉ. अविनाश सोवनी,

उन्मेष प्रकाशन,

पृष्ठे – ३४१, मूल्य – ४०० रुपये.