विदर्भाची शैक्षणिक, सांस्कृतिक पंढरी म्हणून अमरावती हे शहर ओळखलं जातं. अलीकडे या शहरात बऱ्यापकी रस्ते आणि पुलांच्या विकास कामाला गती आली आहे. मात्र, माणसांनी गजबजलेल्या या शहरात पोपटांचं पण एक छोटंसं गाव आहे. हे गाव जमिनीवर नसून ते आहे पिंपळाच्या एका मोठय़ा महावृक्षावर. होय, हे खरं आहे. एक झाड म्हणजे पक्ष्यांचं गावच ना! कारण त्या झाडांवर राहतात असंख्य पोपट. गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक ऋतुचक्रातून त्यांचंही जीवनचक्र सुरू आहे.

पोपटांचं हे अनोखं गाव आहे चक्क पोलीस स्टेशनच्या सुरक्षित आवारात. अनेक विकासकामांमुळे रस्त्यांच्या आजूबाजूच्या कित्येक झाडांची कत्तल होते, पण हे पाखरांचं गाव अमरावती राजापेठ पोलीस स्टेशनच्या परिसरात गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून सुरक्षित आहे. या परिसरात पिंपळ, कडुनिंबाची चार-पाच मोठी झाडं आहेत. या झाडांवर हे पोपट राहतात. हे केवळ एक पिंपळाचं झाड नसून ते आहे हजारो पोपटांचं एक गाव!

mariaai, Pre-monsoon custom,
कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी मरीआईचा गाडा ओढण्याच्या प्रथेचे पालन
Leaps of Agri Medical Tourism Solapur
वैद्यकीय पर्यटनाची झेप
per capita income increased In naxal affected gondia district
दरडोई उत्पन्नात वाढ, आरोग्य स्थितीत सुधारणा
no expected industrial development in akola due to airport project stalled and lack of basic facilities
औद्योगिक विकासाला चालनेची गरज! आरोग्य, शिक्षणाच्या दृष्टीने प्रगती; जीवनमानातही सुधारणा
Maharashtra Day 2024 Celebration of cultural program with flag hoisting
औचित्य महाराष्ट्र दिनाचे… ध्वजारोहणासह सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी
Harappan industrial settlement discovered in Rajasthan
विश्लेषण: राजस्थानात सापडली हडप्पाकालीन औद्योगिक वसाहत; पुरावे काय सांगतात?
Historical record of Ashram of Padmashri Shankar Baba Papalkar Polled with 60 children
६० मुलांसह बापाने केले मतदान; पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्‍या आश्रमाची ऐतिहासिक नोंद
PSI Sanjay Sonawane, nagpur,
पीएसआय संजय सोनवणे म्हणतात, “मी पोलीस आयुक्तांना ओळखत नाही,” नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…

एक दिवस भल्या पहाटे मी या परिसरात गेलो. नुकत्याच संपलेल्या शिशिरामुळे बोडक्या झालेल्या झाडांवर वसंत ऋतूची हिरवी कोवळी छाया पसरली होती. येथील हे झाड हळूवारपणे हजारो पोपटांच्या कलकलाटानं जागं होऊ लागलं होतं. येणाऱ्या-जाणाऱ्या कित्येक नागरिकांचं लक्ष वेधून घेत होतं. पहाटे अन्नाच्या शोधात निघण्याची झाडांवरील पोपटांची लगबग सुरू होती. काही पोपट आपापले पंख साफ करत होते. काही एकमेकांना आवाज देऊन जागं करीत होते. तर काही पोपट ऐकमेकांच्या झाडांवर जाऊन निघण्याच्या सूचना देत होते; आणि मग काही क्षणातच हजारो पोपट आपापले पंख फडफडवून, आवाज देत थवेच्या थवे दिगंतरातून दूर गावी अन्नाच्या शोधात निघून गेले. यावेळी एखादं वादळ उठावं तसं हे दृश्य होतं. या विलोभनीय दृश्याने मी अचंबित झालो होतो. पूर्व दिशा उजळायच्या आतच पोपटांचं गाव अबोल होऊन गेलं होतं. महत्त्वाचं म्हणजे, पोपटांच्या या गावातील झाडांवर केवळ पोपटच राहतात, तेही हजारोंच्या संख्येत. यांनाच रावे असंही म्हणतात.

त्यानंतर परत मी सांजवेळी तेथे पोहोचलो. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हळूहळू पोपटांचा एक एक थवा झाडावर परतण्यास सुरुवात झाली होती. फांदीफांदीवर, पानापानांत जागा शोधण्याची लगबगही सुरू झाली होती. पोपटांचा आवाजही वाढू लागला होता. थव्यामागून थवा असे हजारो पोपटांचे थवे झाडांवर जागा शोधू लागले होते. आता तर परिसरात केवळ आणि केवळ पोपटांचाच आवाज येत होता. एवढा की बाजूच्या वाहतुकीच्या रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीचा आवाजसुद्धा झाकोळून गेला होता. दिवसभर शांत असलेली झाडं पानापानांतून पोपटांची भाषा बोलू लागले होते.

बोडकी झाडं पोपटांच्या उपस्थितीमुळे लदबदल्यासारखी दिसत होती. झाड पानापानांतून पोपटांची भाषा बोलू लागलं होतं. हळूहळू संध्याछाया पसरू लागली आणि काही वेळानंतर पोपटांचं गाव शांत झालं होतं. रात्रभर हे पोपट निवाऱ्यासाठी येथेच असतात. अशा झाडांना मारुती चितमपल्ली यांनी ‘सारंगागार’ किंवा ‘पक्ष्यांचा रातनिवारा’ असे म्हटलं आहे. रात्र संपून जाते आणि पूर्वेचं तांबडं फुटता फुटता या गावाला परत पोपटांचा कंठ फुटतो. माझ्या मते, त्यांच्या आवाजातून जणू काही हे केवळ आमचंच गाव आहे, असं सांगायचं असावं.

येथील सर्वात मोठा पिंपळाचा वृक्ष शंभरी पार केलेला असावा. तर दुसरे पिंपळाचे झाडही शतकाकडे झुकलं असावं. गेल्या कित्येक वर्षांपासून आतापर्यंत या झाडावर पोपटांच्या कित्येक पिढय़ा विसावल्या असाव्यात. घडल्या असाव्यात. संपल्या असाव्यात. उत्पत्ती, विनाश आणि विनाशातून परत उत्पत्ती निसर्गाचं हे चक्र सुरूच राहणार आहे. सोबतच हा वृक्ष वारसा वृक्ष (Herritage Tree) म्हणून जतन होणे गरजेचे वाटते. पर्यावरण तज्ज्ञांतर्फे त्यादृष्टीने या परिसराचा आणि झाडांचा विशेष अभ्यास होणे आवश्यक आहे.

जीवन मरणाच्या या चक्रात जोपर्यंत पोपटांचं हे इवलंसं गाव सुरक्षित आहे तोपर्यंत ते गजबजलेलंच राहणार आहे. नागरिकांचं रक्षण करणाऱ्या पोलिसांप्रमाणे अमरावतीकर नागरिकही पोपटांच्या या सारंगगाराचं रक्षण करतील, अशी अपेक्षा करू या; आणि निसर्ग संतुलनात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पोपट नावाच्या या निसर्गाच्या एका इवल्याशा घटकाला सलाम करू या !

– प्र. सु. हिरुरकर

ranbhul@gmail.com