‘The Time of the Assassins’ या हेन्री मिलर यांच्या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद..
त्याच्या ‘क्रियाशील’ काळात सत्ता, संपत्ती, सुरक्षितता मिळवण्यासाठी काय त्याची ती लढाई! त्याला कळत नव्हतं का, की आपण कवी आहोत फक्त; आणि हीच आपली धनसंपत्ती आहे, हीच आपली जगावरची सत्ता, हीच अभेद्य सुरक्षितता. पण एक अंतहीन आंधळेपण म्हणून असतं; रँबो त्यातला होता. तो शापितच आहे. तो नुसता दिशाहीनच होत नाही, त्याला अंदाजही राहत नाही. सगळं चुकीचं होतं. तो स्वत:चं व्यक्तित्व इतकं बदलवतो, की रस्त्यावरून जाणारा दिसला तर त्याचा त्यालाच तो ओळखू येणार नाही. वेड आपल्या वाटय़ाला येऊ नये म्हणून वेडालाच गुंगारा देण्याचा त्याचा हा शेवटचा अटीतटीचा प्रयत्न. इतकं ताळ्यावर राहायचं, की आपण वेडे आहोत हेही कळू नये. रँबोचा वास्तवाशी संबंध कधी तुटला नाही; उलट त्यानं वास्तवाला मिठीच मारली. त्यानं केलं काय असेल तर आपल्या अंतरात्म्याचं वास्तव गमावलं. असं माणूस मरणाचं कंटाळणार नाही तर काय? स्वत:बरोबर नांदणं तसंही त्याला कठीणच होतं; कारण स्वत:पणच त्यानं गमावलं होतं. ह्य़ाच्या संबंधात लोत्रमोंचे शब्द आठवतात : ‘‘मी आहे आपला, खडक असतो तसा. आयुष्याच्या सुरुवातीला, मध्यावर, देवदूत त्यांच्यासारखेच दिसतात : मी स्वत:सारखं दिसणं कधी थांबलंय?’’
असं वाटतं की अबिसिनियामध्ये त्यानं आठवणीचा अवयव पण कापून टाकण्याचा प्रयत्न केला की काय? पण जीवनान्त जवळ आला तेव्हा- जेव्हा तो ‘थोर अधू माणूस’ झाला होता तेव्हा- दडपलेल्या स्वप्नांचा धागा तो पुन्हा पकडतो आणि भूतकाळातल्या आठवणी उचंबळून येतात. इस्पितळात त्याचा एक पाय कापलेल्या अवस्थेत तो असताना त्याच्या मांडीवर एक मोठी गाठ वाढू लागली. तो गनिमी कॅन्सर एखाद्या लुटारू मारेकऱ्यासारखा त्याच्या शरीरातून थमान घालू लागला तेव्हा तो ज्या विचित्र भाषेत बोलत होता त्याची काही नोंद आपल्याकडे नाही. एखाद्या स्वरमेळाप्रमाणे स्वप्नं आणि भ्रांती एकमेकांशी स्पर्धा करताहेत आणि ते संगीत ऐकायला कोणी नाही; फक्त त्याच्यासाठी धडपड करणाऱ्या त्याच्या बहिणीशिवाय. त्यानं पाहिलेली स्वप्नं आणि त्यानं जगलेली स्वप्नं आता एकमेकांत कालवली जातायत; सगळ्या शृंखलांमधून मोकळा झालेला तो आता पुन्हा गाऊ लागलाय.
नोंद नसलेल्या त्या गीतांची काहीशी कल्पना देण्याचा प्रयत्न त्याच्या बहिणीनं केला आहे. मला नीट आठवत असेल तर ती त्यांच्या दैवी स्पर्शाबद्दल बोलतेय. ती गीतं त्याच्या कवितांसारखी नव्हती की त्याच्या साक्षात्कारी उद्गारांसारखी नव्हती. हे तर सगळं होतंच त्यात; पण आणखीही काही त्यात होतं. आणि हे आणखीही काही बेटोव्हेननं त्याच्या शेवटच्या क्वार्टेट्समध्ये दिलं, त्या जातीचं होतं. त्याचं प्रभुत्व अजून कायम आहे. त्यानं हरवलं नाहीए ते. मृत्यू जवळ येऊ लागला तसतसा तो त्याच्या यौवनातल्यापेक्षाही अधिक ‘जीनियस’ झाला. त्याचे स्वरमेळ आता एकमेकांवर आदळत नाहीत, निषिद्ध स्वर लागत नाहीत; तर जीवन वादाच्या कठोरातल्या कठोर राक्षसाशी लढा देऊन मिळवलेला सत्वांश, अर्क त्यांच्यात आहे. अनुभव आणि कल्पना एकमेकांत मिसळून आता गाणं गाताहेत. ती भेट नजराणा आहे, शाप किंवा तळतळाट नाही. आता ते ‘त्याचं’ गाणं राहिलं नाहीए. अहंकार धुळीला मिळाला आहे. वाद्य व वादन एकरूप झालं आहे. सृजन म्हणजे आता औद्धत्य, प्रतिरोध, दंभ नाही; सृजन आता क्रीडा आहे. दु:ख भोगण्याचं त्याचं काम संपलंय. तो त्याच्या मृत्युशय्येवर प्रार्थनेबरोबरच क्रीडाही करायला मोकळा झाला आहे. आता अंतहीन समुद्रावर तो दर्यावर्दी झाला आहे. त्याची बोट फुटली आहे. कदाचित त्याच्या ह्य शेवटच्या घटका मोजत असताना मानवी कष्टांमागचा हेतू त्याला कळलाय. त्याला कळलंय, की आंधळे स्वार्थी हेतू कष्टताना असणं म्हणजे गुलामगिरी आणि माणसांची सेवा करण्यासाठी कष्टणं म्हणजे आनंद.
सर्जकाच्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही; कारण सृजनाशिवाय दुसरा काहीच हेतू सृजनामध्ये नसतो. ‘‘सगळ्या चराचराला स्पर्श करता येईल इतकी आपली बोटं आपण संवेदनशील करू या..’’ असं रँबो म्हणाला होता एकदा. परमेश्वरही आपली बोटं तशीच हळुवार कोवळी करतो, जेव्हा तो मानवाला सर्जकाच्या पातळीवर आणतो. सगळ्या सृजनामधून सर्जनाचा आनंद जाणवत राहतो. अस्तित्वाच्या सगळ्या परी, सगळे आकार, आविष्कार, अगदी देवदूतांपासून ते क्षुद्र जंतूंपर्यंत, वर, खाली, सर्वत्र असणाऱ्याशी संवाद साधण्याची धडपड करीत असतात. कुठलाही यत्न वाया जात नाही. कुठलंही संगीत ऐकलं गेलं नाही असं होत नाही. पण मानवी सामर्थ्यांचा जेव्हा जेव्हा दुरुपयोग होतो तेव्हा तेव्हा ईश्वर जखमी होतो, सृजन थांबून जातं आणि पृथ्वीवर येऊ घातलेला ख्रिसमस आणखी दूर जातो.
मी स्वत:ला नेहमी विचारतो की, इतर सर्व लेखकांपेक्षा मला रँबोच का एवढा प्रिय? मला काही किशोरांचं कौतुक नाही, की मला असंही वाटत नाही की, इतर मला आवडणाऱ्या लेखकांपेक्षा तो मोठा आहे. पण दुसऱ्या कुणाही लेखकापेक्षा त्याच्यात असं काही आहे, की ते मला हलवून जातं. आणि तेसुद्धा फ्रेंच भाषेच्या धुक्यातून मी वाचतो. मला त्या भाषेवर प्रभुत्व कधी मिळवता आलं नाही. खरं सांगायचं तर मी जेव्हा गाढवासारखा त्याचं भाषांतर करण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हा मला त्याच्या लेखनाच्या ताकदीचा व सौंदर्याचा अंदाज आला. रँबो माझा आरसाच आहे. तो काहीही म्हणो, ते मला परकं वाटत नाही; मग ते कितीही भन्नाट, हास्यास्पद, अनाकलनीय असू दे. समजून घ्यायचं तर शरण जावं लागतं. आणि मला स्पष्ट आठवतंय की ज्या दिवशी मी त्याच्या कामाकडे प्रथम नजर टाकली, त्याच दिवशी मी त्याला शरण गेलो. मी त्या दिवशी त्याच्या थोडय़ाच ओळी वाचल्या, आणि झाडाच्या पानाप्रमाणे थरथरत ते पुस्तक मी बाजूला ठेवून दिलं. तेव्हाही मला वाटलं आणि आताही वाटतंय की, आपल्या काळाबद्दल व काळासाठी त्यानं सगळं सांगून टाकलंय. जणू ह्य युगाच्या पोकळीवर त्यानं कनात घातलीय. तो एक लेखक आहे- जो मी एकदा नव्हे, वारंवार वाचतो तरी माझा आनंद आणि औत्सुक्य कमी म्हणून होत नाही. दरवेळी त्याच्यामध्ये काहीतरी नवीन सापडतं आणि दरवेळी त्याच्या विशुद्धतेनं मी हलून जातो. त्याच्याबद्दल मी जे काय म्हणेन ते नेहमीच संदिग्ध राहणार. तो एक लेखक आहे, ज्याच्या प्रतिभेचा मला हेवा वाटतो. इतर लेखक कितीही थोर असू देत, त्यांच्याबाबत माझं असं होत नाही. आणि वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ह्यनं संपवलं होतं लेखन! माझ्या तरुणपणी मी रँबो वाचला असता तर मी कधी काही लिहिलं असतं की नाही शंकाच आहे. अज्ञानी असणं कधी कधी भाग्याचं असतं!
रँबोवर येऊन मी आदळलो त्यापूर्वी दोस्तोयवस्की महाशयांचं राज्य माझ्यावर होतं. एका परीनं ते नेहमीच राहील; जसा ख्रिस्तापेक्षा बुद्ध मला नेहमीच जास्त प्रिय राहील. दोस्तोवयस्की थेट जीवनाच्या तळाशीच गेला, तिथे अनंत काळ राहिला आणि बाहेरही आला ते अखंड स्वरूपात. मला अखंड माणसं आवडतात. आणि ह्य पृथ्वीतलावर एकदाच मला जगायचंय तर नरक, पग्रेटरी आणि स्वर्ग- सगळं एकदमच भोगायचंय. रँबोनं स्वर्ग अनुभवला; पण त्याची तयारी होण्याआधीच. तरीसुद्धा त्या अनुभवामुळेच आपल्याला नरकाचं एवढं यथार्थ चित्र तो देऊ शकला. तो काही परिपक्व पुरुष नव्हता, तरी त्याचं जीवनच एक पग्रेटरी होतं. पण अनेक कलावंतांचं ते भागधेय असतं. मला रँबोमध्ये एवढा रस अशासाठी, की स्वर्गाची पुन:प्राप्ती करण्याची स्वप्नं त्यानं पाहिली. ही त्याची खासियत. त्याच्या शब्दकळेच्या वैभवाचं, जादूचं तर ‘अतुलनीय’ असंच वर्णन करीन मी. मला हतबुद्ध करतं त्याचं जीवन. ते त्याच्या जगण्याच्या दृष्टीनं इतकं विरोधी कसं? त्याच्या जीवनाबद्दल जेव्हा जेव्हा मी वाचतो तेव्हा तेव्हा मला वाटतं, आपण पण अपयशी झालो, आपण सगळेच अपयशी झालो. असं वाटलं की मग मी पुन्हा त्याच्या शब्दांकडे जातो; आणि ते कधी निराशा करीत नाहीत.
सगळ्या लेखकांपेक्षा मला त्याचंच कौतुक का म्हणून? त्याचं अपयश शहाणपणाच्या सूचना देतं म्हणून? की शेवटपर्यंत तो लढा देत राहिला म्हणून? मी अगदी कबूल करतो की, ज्यांना विप्लवी, अपयशी म्हटलं गेलंय त्यांच्यावर माझं प्रेम आहे. मी ज्यांच्यावर प्रेम करतो ते इतके सर्वसामान्य माणसांसारखे आहेत. आपल्याला माहीत आहे की इतरांपेक्षा देव त्यांच्यावरच अधिक प्रेम करतो. असं का असेल? त्यांच्यामुळे आत्म्याचं अस्तित्व सिद्ध होतं म्हणून? की त्यांची आहुती पडलीय म्हणून? परागंदा झालेला मुलगा परतला की चराचराला कोण आनंद होतो! हे कोण करतं? माणूस की देव? मला वाटतं, इथं देव व माणूस डोळ्याला डोळा भिडवतात. माणूस उंच जातो, देव खाली उतरतो. कधी कधी त्यांच्या बोटांची भेट होते.
जेव्हा कधी कधी मला स्वत:लाच पेच पडतो की, आपलं जास्त प्रेम कोणावर, प्रतिरोध करणाऱ्यांवर की शरण जाणाऱ्यांवर; तेव्हा कळतं की ते एकच आहेत. एक गोष्ट मात्र नक्की ठाम आहे. आपण निर्मळ निष्पापपणे त्याच्याजवळ जावं असं देवाला वाटत नाही. त्याच्याजवळ जाण्याआधी पाप म्हणजे काय, दुष्टावा म्हणजे काय, ते आपण अनुभवलेलं असलं पाहिजे, आपला मार्ग चुकून आपण हरवलेलो असलो पाहिजे, आपण बंडखोर, आकांतानं भरलेले असलो पाहिजे. आपण शक्तीचा शेवटचा बूंद संपेपर्यंत प्रतिरोध करायचा आहे, तरच आपली अशरणता परिपूर्ण असेल. आपण स्वतंत्र जन्मलो आणि हे आपलं सुदैव आहे की डोळे उघडे ठेवून आपण त्याची निवड करू शकतो; जेव्हा आपली हृदयं उचंबळत असतात आणि त्याच्याइतकं दुसरं काही नको असतं आपल्याला. निष्पाप माणूस! हा जन्मभर स्वर्ग-स्वर्ग खेळणार! देवाला त्याचा काहीही उपयोग नाही. अधिकाधिक सजग होत जाणं, ज्ञानानं अधिकाधिक परिप्लुत होणं आणि अपराधांच्या ओझ्याखाली आणखी आणखी वाकत जाणं; हे तर फक्त माणसांनाच प्राप्त होणारं सुदैव आहे. अपराधापासून कुठलाही माणूस सुटलेला नाही. तुम्ही कुठल्याही उंचीला पोचा, तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या येणार, तुम्ही नवी पापं करणार. माणसांमधला निष्पापपणा नष्ट करून एका तऱ्हेनं देवानं माणसाला आपला संभाव्य साथीदारच केलंय. बुद्धी आणि इच्छाशक्ती ह्यंच्या साहाय्यानं माणसाला निर्णयशक्ती मिळवता येते आणि माणूस एका मूलभूत शहाणपणानं नेहमीच देवाची निवड करतो.
नव्या आयुष्याची पूर्वतयारी रँबोनं केली असं मी मघा म्हटलं, त्याचा अर्थ आत्मिक आयुष्याची तयारी. मला थोडं अधिक बोललं पाहिजे ह्य़ाबद्दल; ते असं की, त्याची ही पूर्वतयारी नुसतीच चुकीची आणि अपुरी नव्हती, तर आपलं विहित काम काय, ह्यबद्दलच्या गंभीर गरसमजुतीचा तो बळी होता. त्याला एखादं वेगळं आध्यात्मिक पर्यावरण मिळालं असतं तर कदाचित त्याच्या आयुष्यानं वेगळं वळण घेतलं असतं. त्याला गुरू मिळाला असता तर त्यानं हौतात्म्य पत्करलं नसतं. त्यानं अनुभवलं त्यापेक्षा अगदी वेगळ्या अनुभवासाठी खरं तर त्याची तयारी झालेली होती. पण असं म्हणावं तर त्याची तयारी झालेली नव्हतीही. कारण असं म्हणतात की, शिष्यत्व परिपूर्ण असलं की गुरू उभा असतोच तिथे. अडचण अशी होती की, तो न गुरूचं, न देवाचं ऐकणारा होता. त्याला मदतीची नितांत गरज होती, पण त्याचा अहंकार प्रचंड होता. वाकण्यापेक्षा, नम्र होण्यापेक्षा तो कोल्ह्य-कुत्र्यांसमोर स्वत:ला फेकतो. त्याला आलेल्या हाकेकडे पाठ फिरवूनही तो अभंग राहतो, यात त्याच्या निष्कलंकपणाची थोरवी आहेच, पण त्याबरोबरच तो त्याच्या युगाची निर्भर्त्सनाही आहे. बोह्मची आठवण येते. तो चांभार होता. त्याच्याजवळ परिष्कृत भाषा नव्हती, पण त्यानं स्वत:च स्वत:ची भाषा घडवली आणि सगळ्या जगाला आपला संदेश पोचवला. ह्य प्रदेशात पाऊलही न टाकणाऱ्यांना हे गोंधळवणारं वाटेल. असंही म्हणता येईल की, आपला आवाज एकदम बंद करण्यातूनच रँबो संवाद साधत होता. पण तो त्याचा हेतू नव्हता. त्याची थोरवी जगाला गायची होती आणि त्याला त्या जगाचा तिटकारा होता. आपल्या लिहिण्याला काही मूल्य आहे हेच त्याला मंजूर नव्हतं. पण त्याच्या मूक होण्याला एकच अर्थ आहे व तो आहे तसा स्वीकारला जावा असं त्याला वाटत होतं. सगळं सोडून देण्याच्या त्याच्या ह्य कृतीमध्ये फार खोल अर्थ एखाद्याला शोधायचाच झाला तर त्याची ख्रिस्ताशीच तुलना करावी लागेल. रँबोनं हौतात्म्य निवडलं ते ह्य परित्यागाला चिरंतन महत्त्व मिळावं म्हणून. पण त्यानं निवड अजाणता केली. ज्यांना त्याची आवश्यकता होती व ज्यांचा त्यानं तिरस्कारच केला, त्यांनी त्याच्या जीवनाला आणि साहित्याला अर्थ दिला. रँबोनं फक्त हात झटकले. आपल्या लिहिलेल्याची जबाबदारी घ्यायला तो तयार नव्हता; कारण त्याला माहीत होतं-त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून.
एकोणिसाव्या शतकाच्या नभांगणात महाकाय दैत्य ताऱ्यांसारखे खच्चून भरलेयत. मोजायलाच बसलं तर ब्लेक, द नेरवाल, किअर्कगार्द, लोत्रमों, िस्टड्रबर्ग, नित्शे, दोस्तोयवस्की. सगळी शोकात्म व्यक्तिमत्त्वं; एका नव्या अर्थानं शोकात्म. सगळ्यांना आत्मस्वरूपाच्या प्रश्नानं पछाडलंय. सगळे जाणिवेचा विस्तार आणि नव्या नतिक मूल्यांचं निर्माण ह्य़ाबद्दलच विचार करतायत. अवतीभोवतीच्या पोकळीवर प्रकाश टाकणाऱ्या ह्य प्रभावळीच्या केंद्रस्थानी ब्लेक आणि नित्शे तेजस्वी जुळ्या ताऱ्यांप्रमाणे राज्य करताहेत. त्यांचा संदेश अजूनही इतका नावीन्यपूर्ण आहे, की आपण अजूनही त्यांचा विचार ते वेडाच्याच मार्गाचे- असा करतो. नित्शे अस्तित्वात असलेल्या सगळ्या मूल्यांची पुनर्माडणी करतो. ब्लेक एक अंतरिक्षव्यवस्था तयार करतो. रँबोचं दोघांशीही अनेक पद्धतीनं नातं आहे. तो ‘नोव्हा’ आहे, तो अकस्मात उद्भवला, त्याचा प्रकाश भय वाटेल अशा कोटीला पोचला आणि एकदम तो तुटून पृथ्वीकडे झेपावला. ज्या त्वेषानं त्यानं स्वर्गातला प्रकाश मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याच त्वेषानं तो अंधाराच्या गर्भात रेडियमसारखा राहू लागला. हाताळायला धोकादायकच आहे तो. आणि त्याचा प्रकाश जेव्हा उजळवून टाकू शकत नाही, तेव्हा तो सगळं भस्म करून टाकतो. तारा म्हणून तो पृथ्वीच्या नको तितका जवळ आला. पृथ्वीवर प्रकाश पसरवून त्याचं समाधान होत नव्हतं, तर त्याला स्वत:च्याच प्रतििबबाचं एक विनाशी आकर्षण वाटलं. आपला प्रकाश त्याला तळपणारी सत्ता व्हावी असं वाटलं. आणि हे होण्यासाठी त्याचा अध:पातच व्हायला हवा होता. हा भ्रम- ज्याला पौर्वात्य पाप म्हणत नाहीत, तर अविद्या म्हणतात- तत्कालीन कलाविश्व आणि जीवन ह्यंच्यातला गोंधळ अधोरेखित करतो. ह्य गोंधळानं एकोणिसाव्या शतकातल्या सगळ्यांना घेरलेलं होतं. आधुनिक जगातल्या सगळ्या थोर माणसांनी स्वत:ला ह्य गोंधळापासून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केलाय; आणि सगळे उल्कापाताखाली नष्ट झालेयत. विजेचा शोध लावणाऱ्यांसारखे हे होते. त्यांनी वीज शोधली, पण प्रतिरोधक त्यांना माहीत नव्हते. नव्यानंच प्रस्फुटित होणाऱ्या शक्तींशी ते आवाज मिळवीत होते; पण त्यांच्या प्रयोगातून वाताहतच हाती आली.
हे सगळे लोक- रँबो त्यातलाच- संशोधक होते, कायदे बनवणारे, योद्धे, द्रष्टे होते. ते कवीही झाले, एवढंच. त्यांची प्रतिभा भरभरून उचंबळत होती. पण ज्या युगात ते राहत होते, त्या युगाची त्यांच्या आगमनासाठी काही तयारी नव्हती. ह्य दोन्ही गोष्टी एकत्र येण्यानं विचित्र असं पराभवाचं, नराश्याचं वातावरण निर्माण झालं. एका खोल अर्थानं ते दुसऱ्याची गादी जबरीनं बळकावणारे होते, आणि त्याची जी फळं त्यांना चाखावी लागली त्यानं ग्रीक नाटकातल्या नायकांच्या दु:खान्तिकेची आठवण येते. त्यांचा ‘फ्यूरीज’नी पाठलाग करून त्यांना लोळवलंच. आधुनिक शब्दात- त्यांना वेड लागलं. परमेश्वराची उंची वाढविण्याची अशी किंमत माणसाला द्यावी लागते. नवे देव खात्रीपूर्वक सुस्थापित झाल्याशिवाय माणूस त्याच्या नव्या नियमांनुसार वागू लागले की असंच होणार. आणि हे देव तरी काय, ते माणसाच्याच मनातल्या उन्नत झालेल्या शक्तीचंच प्रक्षेपण असतात. सृजनातल्या अद्भुत अनाकलनीय तत्त्वांचे ते प्रतिनिधी असतात. ते आपले डोळे दिपवतात, आपल्याला नशा आणतात. कारण आपल्या अवतीभोवतीच्या ज्या काळोखातून ते आलेयत, तो काळोख ते अक्षरश: चिरून टाकतात. आपल्या जहाल अनुभवाच्या खोलपणातून बोदलेअर म्हणतो : अवनती आणि बुद्धांचा मृत्यू हे माणसांचं भागधेय आहे. अशा अवस्थेत अस्तित्वाची मूल अवस्था त्यानं विस्कळीत करणं निषिद्ध आहे. ज्या क्षेत्रात त्याच्या क्षमता काम करण्यासाठी त्याला मिळाल्या आहेत त्यांचा तोल गमावणं, त्याचं स्वत:च भागधेय बदलून त्या जागी एक नवीनच दुर्दैव आणून उभं करणं.. (हे सगळं निषिद्ध आहे.)
थोडक्यात, स्वप्नं पाहणाऱ्यानं स्वप्न पाहण्यात समाधान मानावं. त्यानं खात्री बाळगावी की, ‘‘कल्पना अर्थगर्भता निर्माण करते.’’ हेच कवीचं काम आहे. सर्वश्रेष्ठ आहे ते. हे कामच त्याला सृजनाच्या अंतापर्यंत नेऊन अज्ञातापाशी आणून सोडतं. गुरुत्वपदाला पोचलेले सृजनाच्या कक्षेबाहेर असतात; ते ‘असणं’ ह्य अवस्थेच्या शुभ्रधवल प्रकाशात विहरत असतात. त्यांची घडण्याची प्रक्रिया संपलेली असते. सृजनाच्या अंतर्हृदयात ते विलीन झालेले असतात. त्याआधी माणूस म्हणून ते परिपूर्णतावस्थेला पोचलेले असतात आणि परमेश्वरी सत्वांशानं प्रकाशमान होऊन झळकत असतात. त्यांनी स्वत:ला अशा अवस्थेला आणलेलं असतं, की ते आता देवपणच प्रस्फुरित करत असतात.
(क्रमश:)
(C) 1946-1949-1956 by New Directions Publishing Corporation