scorecardresearch

Premium

चौसष्ट घरांच्या गोष्टी: लोभस कार्लसन..

मॅग्नस कार्लसननं आनंदला हरवून २०१२ साली जगज्जेतेपद मिळवलं आणि नंतर ते अनेक वेळा कायम राखलं.

Loksatta Lokrang Magnus Carlsen Football Play Magnus chess
चौसष्ट घरांच्या गोष्टी: लोभस कार्लसन..

रघुनंदन गोखले

मॅग्नस कार्लसननं आनंदला हरवून २०१२ साली जगज्जेतेपद मिळवलं आणि नंतर ते अनेक वेळा कायम राखलं. फुटबॉलमध्ये त्याला खूप रस आहे आणि वेळ मिळाला की तो फुटबॉल खेळतो. त्याच्यावर ‘प्ले मॅग्नस’ नावाचं एक अ‍ॅपदेखील काढण्यात आलं आहे. उंची उत्पादनांच्या जाहिरातींमध्येही तो झळकतो. पण बुद्धिबळ खेळायला बसल्यावर त्याच्यात दडलेला असीम योद्धा दिसायला लागतो..

Odisha BJP
ओडिशात BJD ला मोठा धक्का! मुख्यमंत्री पटनायकांच्या जवळचा महत्त्वाचा नेता भाजपात दाखल!
BCCI Secretary Jai Shah instructs IPL franchises
IPL 2024 : टी-२० विश्वचषकापूर्वी बीसीसीआयचा आयपीएल फ्रँचायझींना इशारा! ‘या’ मार्गदर्शक तत्त्वांचे करावे लागणार पालन
former president jair bolsonaro marathi news, jair bolsonaro latest news in marathi, brazil latest news in marathi
विश्लेषण : ब्राझीलचे माजी अध्यक्ष ‘ट्रम्पभक्त’ जाइर बोल्सोनारो पुन्हा अडचणीत? वर्षभरापूर्वी केलेला बंडाचा प्रयत्न किती भोवणार?
king charles cancer diagnosis
किंग चार्ल्स यांना कर्करोग झाल्यानं आता ब्रिटनच्या राजगादीचे काय होणार? वाचा सविस्तर

गेल्याच आठवडय़ात आपण मॅग्नस कार्लसनच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि बालपणाचा आढावा घेतला. ज्या वेळी मॉर्फीपासून सगळय़ा महान खेळाडूंचा उल्लेख होतो त्या वेळी एक गमतीदार चर्चा सुरू होते- आतापर्यंतचा सर्वोत्तम खेळाडू कोणता? प्रत्येक रसिक आपापल्या आवडीप्रमाणे फिशर, कास्पारोव्ह, आनंद यांची नावं पुढं करतो. अशा वेळी फ्रान्समधील टुलूझ गावातील संगणक शास्त्रीय संशोधन संस्थेच्या जीन मार्क इलियट नावाच्या बुद्धिबळप्रेमी शास्त्रज्ञानं कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि ‘स्टॉकफिश’ या इंजिनचा वापर करून एक अफलातून प्रयोग केला. त्यानं स्टाइनिट्झपासून सगळय़ा जगज्जेत्यांचे डाव स्टॉकफिश या संगणकातील जगज्जेत्याकडून तपासून घेतले आणि स्टॉकफिशनं मॅग्नस कार्लसनच्या नावानं कौल दिला. सर्वात अचूक खेळणारा खेळाडू म्हणजेच जगातील आत्तापर्यंतचा सर्वोत्तम खेळाडू मॅग्नस ठरला.

पण मॅग्नस कार्लसनला हे मंजूर नाही. ‘न्यू इन चेस’ या मासिकानं त्याची २०२१ साली मुलाखत घेतली होती, त्यामध्ये त्यानं स्वत:पेक्षा गॅरी कास्पारोव्हला आणि आनंदला जास्त गुण दिले होते. गॅरीच्या प्रतिभेला १० पैकी १० आणि आनंदला ९ गुण देताना मॅग्नसनं स्वत:ला ८ गुण घेतले. यामध्ये विनयाचा जराही भाग नसून ते त्याचं परखड मत आहे, असं मॅग्नसनं सांगितलं. यावरून रसिकांमध्ये आणखी एक जोरदार चर्चा होण्यास हरकत नाही. मॅग्नसचं २८८२ (मे २०१४) हे आतापर्यंतच्या बुद्धिबळ इतिहासातील सर्वोच्च रेटिंग आहे आणि अजून कार्लसननं ते २८०० च्या खाली येऊ दिलेलं नाही. गेल्या महिन्यात झालेल्या कतार ओपन स्पर्धेत फॉर्मात नसलेल्या मॅग्नस कार्लसनची भारतीयांनी पार हबेलंडी उडवून दिली. महाराष्ट्राच्या अभिमन्यू पुराणिक आणि आंध्र प्रदेशच्या प्रणेश या युवा ग्रॅण्डमास्टर्सविरुद्ध हरता हरता बरोबरी साधणारा मॅग्नस माजी राष्ट्रीय विजेत्या मुरली कार्तिकेयनबरोबर चक्क पराभूत झाला. परंतु मॅग्नस तयारी करून येईल आणि पुन्हा त्याला आपला सूर गवसेल याची सर्व रसिकांना खात्रीच आहे.

अपयश हे मॅग्नससाठी एक टॉनिक असतं. आता बघा- २०१० सालच्या ऑलिम्पियाडमध्ये मॅग्नस चक्क तीन डाव हरला. त्याला हरवणारे वीर होते जोबावा, अडॅम्स आणि सुगिरोव हे ग्रॅण्डमास्टर्स. एका स्पर्धेत तीन डाव हरणं आतापर्यंत मॅग्नसच्या आयुष्यात ग्रँडमास्टर झाल्यावर तरी घडलं नव्हतं. त्याची घसरण इथंच थांबली नव्हती, तर स्पेनमधील बिल्बाओ या गावी झालेल्या ग्रॅण्डप्रिक्स मास्टर्समध्येही सुरू राहिली. विश्वनाथन आनंद, व्लादिमिर क्रॅमनिक आणि अलेक्सी शिरोव्ह या प्रतिस्पध्र्याविरुद्ध मॅग्नसची सुरुवात भीषण झाली. पहिली फेरी त्यानं काळय़ा सोंगटय़ांकडून क्रॅमनिकविरुद्ध गमावली आणि दुसऱ्या फेरीत आनंदनं दावा साधला. या सगळय़ा प्रकारात मॅग्नस २८०२ पर्यंत खाली आला आणि जगज्जेत्या आनंदनं २८०४ गुणांसह जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान मिळवलं. आता नॉर्वेमध्ये टीकेचा सूर उमटू लागला की मॉडेलिंगला वेळ देत असल्यामुळे मॅग्नसचा खेळ वयाची २० वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच उतरणीला लागला आहे. आता मॅग्नसला याला उत्तर देणं गरजेचं होतं आणि त्यानं ते दिलंही- पण पटावर!

चीनमधील नानजिंग या महाकाय शहरात पर्ल स्प्रिंग नावाची ही स्पर्धा भरवण्यात आली होती. आपल्याकडे एका जिल्ह्यात अनेक शहरे असतात तर या शहरात ११ जिल्हे आहेत आणि त्याचं एकूण क्षेत्रफळ ६६०० चौरस किलोमीटर आहे. पहिल्यांदाच आनंद, कार्लसन आणि टोपालोव्ह हे जगातील पहिल्या तीन क्रमांकाचे आणि इतिहासात पहिल्यांदाच २८०० वर रेटिंग असणारे खेळाडू एकत्र येणार होते. बाकी खेळाडू होते वांग यू, उगार गाशीमोव आणि एटिएन बॅकरोट. मॅग्नस वेगळय़ाच मूडमध्ये होता. त्यानं एकाहून एक सरस विजय मिळवून ही स्पर्धा आरामात जिंकली आणि विश्वविजेत्या आनंदला एका गुणानं मागे टाकलं. आता मॅग्नस पुन्हा जागतिक पहिल्या क्रमांकाचा खेळाडू झाला होता आणि आजही त्यानं ते अढळपद कायम राखलं आहे.

मॅग्नस कार्लसननं आनंदला हरवून २०१२ साली जगज्जेतेपद मिळवलं आणि नंतर ते कसं अनेक वेळा कायम राखलं या आकडेवारीत मी जात नाही. मॅग्नस जात्याच हुशार असल्यामुळे त्यानं एस्पिन अगडेस्टीनला आपला मॅनेजर म्हणून नेमलं आणि स्वत: बुद्धिबळावर लक्ष केंद्रित करण्यास मोकळा झाला. मॅग्नसची पहिली जाहिरात होती ती लीव्ह टायलर या अमेरिकन अभिनेत्रींबरोबर ‘जी स्टार रॉ’ या तयार कपडे बनवणाऱ्या डच कंपनीसाठी. या कंपनीने ‘रॉ जागतिक आव्हान’ या नावानं एक अफलातून नावीन्यपूर्ण स्पर्धा घेतली होती. यामध्ये मॅग्नसच्या खेळीविरुद्ध नाकामुरा, ज्युडिथ आणि मॅक्सिम वाचियेंर लेगरेव हे तिघं आपापल्या खेळय़ा सुचवायचे आणि जगातून समस्त बुद्धिबळपटू त्यातून एका खेळीची निवड करायचे. ज्या खेळीला सर्वात जास्त मतं मिळतील ती खेळी खेळली जात असे. मॅग्नस हा सामना सहज जिंकला. हॉलीवूडचा दिग्दर्शक अब्राम्सनं तर मॅग्नसला स्टार ट्रेकमध्ये भविष्यातील जगज्जेता म्हणून काम करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण मॅग्नसला वेळ नव्हता. नाही तर कॅपाब्लांकानंतर आणखी एक जगज्जेता आपल्याला छोटय़ा का होईना, पण पडद्यावर दिसला असता. तरीही अमेरिकेत तुफान गाजणाऱ्या ‘दी सिम्पसन्स’ या मालिकेत मॅग्नसनं आपलं दर्शन दिलं होतं. नॉर्डिक सेमी कंडक्टर या कंपनीचा मॅग्नस सदिच्छादूत (ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर) आहे. युनिबेट या सट्टेबाजी करणाऱ्या कंपनीचा तर तो वैश्विक राजदूत आहे. आपल्याकडे हे विचित्र वाटेल, पण जुगार, सट्टा या गोष्टी पाश्चात्त्य जगात सर्रास चालतात. हल्ली आपले नट आणि क्रिकेट खेळाडू नाही का गुटखा, सिगारेट यांच्या जाहिराती करतात? किंड्रेड नावाच्या सट्टेबाज कंपनीनं नॉर्वे बुद्धिबळ महासंघालाच पुरस्कृत करण्याची तयारी दर्शवली, त्या वेळी महासंघानं बाणेदारपणे त्यांना नकार दिला. व्यावसायिक मनोवृत्तीच्या मॅग्नसनं ही संधी साधून ऑफरस्पिल नावाच्या क्लबची स्थापना केली आणि आज तो क्लब मॅग्नस कार्लसनच्या व्यवस्थापनाखाली आहे. तसेच नॉर्वेतील सर्वात मोठा क्लब आहे. गेल्याच महिन्यात त्यांनी युरोपिअन क्लब कप जिंकला आणि मॅग्नसच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला गेला. मॅग्नस हा खरा रत्नपारखी आहे. त्यानं त्याच्या संघात खेळण्यासाठी नागपूरच्या १७ वर्षांच्या ग्रँडमास्टर रौनक साधवानीला बोलावलं होतं. रौनकनं मॅग्नसला योग्य ती साथ दिली आणि क्लबच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

जर आपण व्यावसायिक मॅनेजर नेमले तर ते अधिक पैसे मिळवून देऊ शकतात, हे हुशार मॅग्नसला फार लवकर कळलं होतं. त्याचा मॅनेजर इस्पेन आणि अँडर्स ब्रँट या दोघांनी मॅग्नसला भागीदार घेऊन ‘प्ले मॅग्नस’ नावाचं एक अ‍ॅप काढलं. त्यावर तुम्हाला मॅग्नसचं वयाच्या पाचव्या वर्षांपासूनचे सगळे डाव बघायला मिळायचे आणि जर एखादी खेळी कळली नाही तर त्यांनी आपल्या दिमतीला एक इंजिन दिलेलं होतं. ते तुम्हाला ती खेळी आणि त्यामागच्या कल्पना उलगडून सांगत असे. नंतर मॅग्नसनं आपला पसारा वाढवला आणि ‘चेस ट्वेण्टीफोर’ आणि ‘चेस डॉटकॉम’ यामध्येही हातपाय पसरले. मॅग्नसला फुटबॉलमध्ये खूप रस आहे आणि वेळ मिळाला की तो फुटबॉल लाथाडत असतो. रिअल माद्रिद हा त्याचा आवडता फुटबॉल क्लब आहे. पूर्णपणे शाकाहारी असणारा मॅग्नस वेळ मिळाला की ब्रिटिश प्रीमियर लीगमधील फुटबॉलचे सामने बघतो. मागे तर त्यानं फॅण्टसी प्रीमियर फुटबॉलमध्ये भाग घेऊन ७० लाख लोकांमध्ये पहिल्या स्थानापर्यंत मजल मारली होती. अखेर तो दहावा आला. मॅग्नसला फुटबॉल क्लब आणि खेळाडूंमध्येही खूप मान आहे. ३० नोव्हेंबर २०१३ रोजी रिअल माद्रिद आणि रिअल वोलाडिलो यांच्या ला लिगामधील सामन्याच्या उद्घाटनाला त्याला खास बोलावणं करण्यात आलं होतं. मॅग्नस हा फारसा कोणात मिसळणारा माणूस नाही. त्याच्या मित्रमंडळीत मात्र तो रमतो. त्यानं अजून लग्नाचा विचार केलेला दिसत नाही किंवा त्याला लग्नाच्या विचारासाठी वेळच मिळाला नसावा इतका तो बुद्धिबळामध्येच मग्न असतो. नॉर्वेच्या काही मॉडेल्स त्याच्या मैत्रिणी आहेत.

गेली अनेक वर्ष बुद्धिबळ जगताचं साम्राज्यपद उपभोगल्यामुळे मॅग्नसला एक प्रकारचा कंटाळा आला होता. इतिहासातल्या गोष्टीत आपण वाचलंच आहे की अलेक्झांडर द ग्रेट जिंकण्यासाठी काहीही उरलं नाही म्हणून रडला होता! इयान नेपोमानेचीला एकदा हरवून झाल्यावर तोच पुन्हा एकदा आव्हानवीर झाल्यामुळे मॅग्नसनं जगज्जेतेपदाची लढत न खेळण्याचा निर्णय घेतला. आता त्याच्यापुढे खरं आव्हान आहे ते भारताच्या तेजांकित आणि विक्रमादित्य खेळाडूंचे. प्रज्ञानंद, गुकेश, निहाल, अर्जुन, रौनक या पंचकडीनं अनेक वेळा मॅग्नसला दणका दिला आहे. एवढय़ावरच सर्व थांबलेलं नाही. नुकत्याच संपलेल्या कतार मास्टर्स स्पर्धेत मुरली कार्तिकेयननं त्याला हरवलं होतं. प्रणेश आणि अभिमन्यूकडून हरता हरता वाचलेला मॅग्नस एक गोष्ट समजून चुकला आहे की, त्याला खरं आव्हान पूर्वेकडून आहे. त्यानं भले विश्वनाथन आनंदला दोन वेळा जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत हरवलं का असेना; तोच आनंद आता त्याच्या अकादमीमध्ये एक पैसाही न घेता भारताच्या तरुणवीरांची कसून तयारी करवून घेत आहे. ३३ वर्षांच्या मॅग्नसविरुद्ध विशीतील तरुण भारतीय या लढतीकडे सर्व विश्वाचे डोळे लागले आहेत.

मॅग्नसचे व्यक्तिमत्त्व आकर्षक आहे. जगज्जेता बुद्धिबळपटू म्हणून त्याला इतरांपासून थोडं अंतर ठेवून राहावं लागतं, पण बुद्धिबळाच्या पटावर बसला की तो एक सामान्य खेळाडू होऊन जातो. कतार स्पर्धेत प्रणेशनं त्याला बरोबरीत सोडल्यावर त्यानं ट्वीट केलं, ‘‘प्रणेश- माझा एक मित्र.’’ तसेच अभिमन्यू पुराणिकविरुद्ध बरोबरी मान्य केल्यावर अभिमन्यूची अपेक्षा होती की मॅग्नस रागानं उठून निघून जाईल. पण मॅग्नसनं दिलखुलास हास्य केलं आणि हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. असा हा बुद्धिबळाचा सम्राट – त्याच्या प्रतिस्पध्र्यानाही आपल्या लोभस व्यक्तिमत्त्वानं जिंकून घेणारा!

gokhale.chess@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta lokrang magnus carlsen football play magnus chess amy

First published on: 03-12-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×