आजी-आजोबांकडे जाणं हा लहान असल्यापासून नेहमीच एक जिव्हाळाभरला अनुभव राहिला आहे. याचं एक प्रेमळ कारण म्हणजे- जरी वरचेवर आमचं आजोळी जाणं होत असलं तरी दरवेळी तिथं होणारं  जय्यत आणि जोरदार स्वागत. एखाद्या सेलिब्रेटीचं त्याचे चाहते करतील अगदी तसं. आठवणीत ताजंतवानं राहील असं. आपण किती महत्त्वाचे आहोत हे त्यांच्या बोलक्या डोळ्यांतून आणि मनापासून हसण्यातून, त्यातील ऊर्जेतून, चैतन्यातून सहज जाणवायचं. आणि आजही जाणवतं. कारण  असं स्वागत आजही होत असतं.  हे असं ‘सेलिब्रेटी स्टेटस’  आम्हाला बहाल केल्यावर आजी-आजोबांना आमच्या प्रत्येक घडामोडीबद्दल जाणून घ्यायचं असायचं. त्याबद्दल कुतूहल, कौतुक असायचं. थोडक्यात, माझ्या आयुष्यात काय आणि कसं चाललं आहे, माझं काय नवं लिखाण, संशोधन सुरू आहे, कोणते महत्त्वाचे निर्णय मी घेतलेत, अशा असंख्य गोष्टींबद्दल त्यांना आस्थेपोटी चौकशी करायची असायची. आपल्याला समजून घेणारे असे प्रेमळ श्रोते मिळाल्यावर मलाही मनमोकळेपणी बोलता यायचं, आजही येतं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परंतु निखळ नात्यातून बहाल झालेलं हे ‘सेलिब्रेटी स्टेटस’ आजकालच्या ‘सेलिब्रेटी कल्चर’पेक्षा खूप भिन्न असल्याचं जाणवतं. ‘विशेष’ आणि ‘सामान्य’ या भेदभावामुळे जग आज दोन गटांमध्ये विभागलेलं आहे. ते जे कोणी ‘विशेष’ आहेत आणि ते जे कोणी (फारसे) विशेष नाहीत, अशा दोन्ही गटांतले लोक या जगात नांदतात. यात काही सर्वानुमते, सर्वमान्य ‘विशेष’, तर काही मात्र स्वयंघोषित! ‘सेलिब्रेटी’ या शब्दातच मुळी ‘सेलिब्रेशन’ हा शब्द दडलेला आहे. म्हणजे ही व्यक्ती दिसली, बोलली, आसपास असली की तो प्रत्येक क्षण ‘सेलिब्रेशन’चा.. उत्सवाचाच असतो! (हल्ली प्रत्येक खासगी सेलिब्रेशनमध्येही हे सेलिब्रेटीज् सक्रिय भाग घेतात, गातात, नाचतात- ते निराळं!) या सेलिब्रेटेड जगाची आणि त्यातील (सेलिब्रेटिज्) व्यक्तींची स्वत:ची एक अनोखी मानसिकता असल्याचं जाणवतं. हे चकाचौंद विश्व म्हणजे प्रसिद्धी, लोकप्रियता, प्रकाशझोत, चाहते, नावीन्य, रंजकता, सुबत्ता असा समज आहे.  परंतु  याबरोबरच येते ती अशाश्वतता, अस्थिरता, ‘ओळख’ निर्माण करण्याची चढाओढ, ती जपण्याची आणि टिकवून ठेवण्याची धडपड! ही एक प्रकारची झिंगच. क्वचित व्यसनही! बहुतांश लोकांची आपण लोकप्रिय (फेमस) व्हावं अशी सुप्त इच्छा असते. यात केवळ प्रौढच नव्हे, तर हल्ली लहान मुलांनाही ‘मोठे झाल्यावर काय व्हायचे आहे?’ असं  विचारल्यावर ते डॉक्टर, चित्रकार, वैमानिकअसे व्यवसाय सांगण्याऐवजी ‘मला फेमस व्हायचं आहे’ अशी उत्तरे देतात. ताप-खोकल्याची साथ यावी तसा प्रसिद्धी, लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवण्याचा हा साथीचा रोग म्हणावा का? याला प्रसारमाध्यमांनीही मोलाचा हातभार लावला आहे.

मराठीतील सर्व मनोविष्कार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrities unique mentality
First published on: 04-09-2016 at 01:01 IST