scorecardresearch

Premium

प्रेम

जन्मल्यापासून आपल्या आजूबाजूचे वातावरण आपली प्रेम करण्याची क्षमता घडवत असते.

प्रेम

प्रेम ही एक सामथ्र्यवान भावना, कला व कौशल्य आहेच; तसेच ती एक बौद्धिक, भावनिक व सामाजिक गरजही आहे. प्रेम हा सशक्त नात्याचा पाया होय. प्रेम ही भावना भिन्न व्यक्तींना भिन्न स्वरूपात भासते. काही त्यात सुखरूपता, सुरक्षितता मानतात, तर काहींसाठी ती त्यांचा श्वास, विश्वास असतो. प्रेमभावनेपासून वंचित राहिलेल्यांना ही पोकळी सतावते. आपल्याला प्रेम मिळावं ही तान्ह्य़ा बाळापासून वृद्धांपर्यंत सर्वाचीच तीव्र निकड असते. जीवनगाथा रंगवणारी, गतिमान करणारी, लयबद्ध करणारी ही भावना! प्रेमाची व्याप्ती  केवळ प्रियकर-प्रेयसीपुरतीच सीमित नसून पालक आणि मुलं, आपला देश, पाळीव प्राणी, कला, कुटुंब, व्यवसाय, घर, घरातील वस्तू अशी सर्वव्यापी आहे. ही प्रेमभावना कायम टिकावी हे मनोमन वाटत रहातं.

जन्मल्यापासून आपल्या आजूबाजूचे वातावरण आपली प्रेम करण्याची क्षमता घडवत असते. त्यामुळे विविध नात्यांची वीण आपण कशी सांभाळतो हे या घडणीतील अनुभवांवर आधारलेले असते. मूल म्हणून आपल्याला प्रेम, उत्तेजन, कौतुक, आपुलकी, सुरक्षितता लाभली तर आपण सहिष्णु, प्रेमळ, प्रगल्भ, कारुण्यपूर्ण तसंच समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेत शिरून तिची वैचारिक, भावनिक स्थिती समजून घेण्याची क्षमता असणारी व्यक्ती बनण्याचा संभव अधिक असतो. बालपणी आपल्यावर निखळ, भरभरून प्रेम करणारी माणसं लाभली तर आपली प्रेम करण्याची, अनुभवण्याची इच्छा व क्षमताही वृद्धिंगत होते. पण ही गोष्ट प्रेम देण्याची आणि मिळवण्याची व्यक्तीची इच्छाशक्ती सीमित करते असे समजणे मात्र अनुचित ठरेल.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!

प्रेम करणे आणि इतरांनी आपल्यावर कसे प्रेम करावे याबद्दल आपल्या काही इच्छा-अपेक्षा असतात. कधी आपण त्या मोकळेपणाने व्यक्त करतो, तर कधी त्या मनात ठेवून समोरच्याने ते ओळखून त्यानुसार वागावे अशी अपेक्षा करतो. आपल्या दर्शवण्यात (व्यक्त करण्यात) आणि समोरच्या व्यक्तीच्या स्वीकारण्यात (अपेक्षेत) गल्लत झाली तर मग पंचाईत होते. आणि सुरू होतात- कुरबुरी, तक्रारी. त्यातून असमाधानाची भावना वाढीस लागते. आपणा प्रत्येकाला व्यक्ती म्हणून भावणारी विशिष्ट अशी प्रेमभाषा असते, असे ‘नातेसंबंध’ या विषयातील तज्ज्ञ  गॅरी चॅपमन यांचे मानणे आहे. नात्यातील प्रेमाचे तळे  जितके भरलेले, तितके ते अधिक पूरक व पोषक- ही त्यांची संकल्पना. त्यांच्या मते, प्रेमाच्या पाच भाषा आहेत. प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यातून त्या व्यक्त होत असतात. परंतु यातील कोणत्या तरी एका भाषेचा प्रभाव अधिक असतो. नात्यातील संबंधिताची (मग ते नाते पती-पत्नीचे असो, पालक-अपत्याचे असो, वा इतरही!) भाषा ओळखून त्यानुरूप प्रेम व्यक्त केले तर त्या व्यक्तीस आपल्याला हवे असलेले प्रेम मिळाल्याचे समाधान मिळू शकते.  तसे ते मिळाल्यास व्यक्तीची सकारात्मकता सामोरी येते. आणि दोन्ही व्यक्तींच्या ‘प्रेम’गरजा हव्या तशा भागल्या तर ते नाते बहरते. अशा नात्यातील व्यक्ती मग आपली भूमिका व जबाबदारी सक्रियपणे पार पाडतात. ही झाली शब्दजडित (सकारात्मक, कौतुकाचे, आपुलकीचे) प्रेमभाषा. दुसरी म्हणजे गुणात्मक वेळ (द४ं’्र३८ ३्रेी) एकत्रित घालविण्याची भाषा. तिसरी भाषा म्हणजे जोडीदाराचे स्मरण ठेवून आठवणीने व रस घेऊन त्या व्यक्तीस भेटवस्तू देणे. चौथी- जोडीदारास त्याच्या/तिच्या कामात मदत करणे, हातभार लावणे. किंवा त्याच्या कामाचा भार कमी करण्यासाठी ती जबाबदारी आपण घेणे. (उदा. दैनंदिन घरकामांतील एखादे काम!) आणि पाचवी- स्पर्शाची भाषा.

आपल्या साथीदाराशी मोकळेपणाने याबाबत चर्चा करून, आपल्या निरीक्षणांतून, अनुभवातून किंवा चॅपमन यांनी सांगितलेल्या प्रेमभाषांचा वापर करून प्रेमाचा आढावा घ्यावा. प्रेमभाषा ही संकल्पना प्रत्येकाला पटेल, रुचेल, जमेलच असे ठामपणे सांगणे कठीण आहे. आणि प्रेमासंबंधी केवळ हाच दृष्टिकोन समर्पक, हे गृहीत धरणेही अयोग्य. प्रत्येक नातं त्यातील व्यक्तींच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. एकमेकांप्रती प्रेम दर्शवणे हे काहींना गरजेचे, महत्त्वाचे वाटते; तर काही जण अव्यक्त प्रेमही समजून घेतात. आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमाचे साथीदार आहोत, त्याच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतो आहोत  आणि तिला आपल्याबाबत आत्मीयता, आपुलकी, आदर वाटतो- या भावनेने एखादं नातं जगणं हे किती समाधानकारक व मनमोहक असू शकतं, हे प्रेम अनुभवलेल्या व्यक्तीच सांगू जाणोत. नातेसंबंध हे महत्त्वाचे, गरजेचे, आयुष्य सशक्त करणारे असतात असे न मानणारे लोक प्रेमसंबंध व नातं ही एक नकारात्मक बांधिलकी मानतात. आपल्या स्वातंत्र्यात आडकाठी निर्माण करणारी गोष्ट मानतात. त्यामुळे आत्मीयता वगैरे गोष्टी ते टाळतात/ नाकारतात. पण आपण इथे चर्चा करतो आहोत ती ‘प्रेम’संकल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्या व ती जोपासणाऱ्यांबद्दल!

कुणी मान्य करो वा न करो, परंतु आपल्या साथीदाराचं आपल्यावर प्रेम आहे, हे ऐकण्यासाठी आपले कान आतूर असतात. प्रेम हे बराच काळ व्यक्त न करता नुसतं गृहीत धरलं गेलं, किंवा समोरचा ते समजून घेईल, त्यात वेगळं सांगायचं काय?, इतकी र्वष नातं जपलं ते प्रेम असणार म्हणूनच ना! आम्हाला नाही बाबा ते फिल्मी ‘क ’५ी ८४’ म्हणणं पटत.. या  वृत्तीमुळे नात्यातले तेज, ऊर्जा, मोहकता ओसरत जाऊन ते केवळ औपचारिकता व कर्तव्य म्हणून रेटलं जाण्याचा संभव असतो. नातं गृहीत धरून वा गौण लेखून चालत नाही. म्हणूनच नात्याची अपरिहार्यता ओळखून प्रेम, आपुलकी जपणे, टिकवणे, बहरवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते. ती पार पाडण्याकडे केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर अटरहित स्वाभाविक बाब म्हणून पाहिले तर त्याचे ओझे न वाटता ते सहजगत्या निभावणे शक्य होईल.

प्रेम व्यक्त करण्यासाठी चित्रपटात दाखवतात तसे चाँद-तारे तोडून आणण्याची आवश्यकता नसते. फक्त नात्यातील त्या व्यक्तीला रुचतील, भावतील, हव्याहव्याशा वाटतील, कायम स्मरणात राहतील, स्वागतार्ह असतील अशा गोष्टी अंगीकारल्या/ केल्या तरी त्या पुरेशा असतात.

आपल्या आयुष्यात ‘त्या’ व्यक्तीने केलेल्या योगदानासाठीत्या व्यक्तीप्रती वेळोवेळी कृतज्ञता व्यक्त करणे, ही अशीच एक गोष्ट. आपल्या नात्यात राग, तिरस्कार, द्वेषासारख्या विषारी गोष्टींचा शिरकाव होताना दिसताच लगेचच सजग व्हावे. सतर्कतेने या गोष्टी टाळता येतात. प्रेम व आत्मीयतेने नात्याचे स्वास्थ्य सशक्त राखता येते. आणि अशा नात्यात वेळप्रसंगी नकारात्मकतेला सामोरे जावे लागले तरी त्याचा तडाखा कमी बसतो. परिस्थिती नियंत्रणात ठेवता येऊ शकते.

याकरता जवळच्या व्यक्तींना कौतुकपर, हाती पत्रं लिहावीत, व्यस्त जीवनातून त्यांच्यासाठी काही क्षण राखून ठेवावेत, त्यांचं ऐकावं, त्या व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांप्रती आस्थासदृश कुतूहल बाळगावे, त्यांत रस घ्यावा, त्यात योगदान द्यावे. आपली चूक झाल्यास अहंकार बाजूला ठेवून विनाअट माफी मागावी. त्या व्यक्तीच्या खटपटी, प्रयत्नांकडे  दयाळूपणे व उत्तेजनाच्या दृष्टीने पाहावे. फुलं, ग्रीटिंग कार्ड्स, भेटवस्तू, सुखद गोष्टींचं सरप्राइझ, पाठीवर थाप, हवीशी वाटणारी ‘जादूची झप्पी’, बोलताना आदरपूर्वक स्वर, चेहऱ्यावर स्मितहास्य या गोष्टींमुळे नात्यातले ताजेपण टिकवता येते. नात्याचा कार्डिओग्राम अस्वाभाविकरीत्या वर-खाली होताना जाणवताच (उदा. सततचे तंटे, संघर्ष, अनबन, अबोला, तिरस्कार, उपेक्षा, उपहास, अटींवर आधारित स्वीकार, अवास्तव अपेक्षा, शोषण, सक्ती यांसारख्या ताणतणाव निर्माण करणाऱ्या बाबी घडल्यास) नात्यातील प्रेमाचा झरा आटत चालला आहे असे समजावे. हा झरा जादूने आपोआप भरेल/ नशिबात असेल तर भरेल/ तो समोरच्या व्यक्तीने आटवला आहे, त्यामुळे तिनेच तो भरावा- अशा फोल आशेवर राहणे टाळावे. याकामी स्वत:च पुढाकार घ्यावा आणि नात्याचे महत्त्व ओळखून ते टिकवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत.

प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीवर, तिच्या हेतूंवर, भूमिकेवर, दृष्टिकोनावर असलेला डोळस विश्वास. प्रेम सिद्ध करण्यासाठी स्वत्वाची आहुती द्यावी लागणे, शोषण/ सक्ती सहन करणे, अवाजवी त्याग करणे- या चुकीच्या कल्पना आहेत. कारण प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेबद्दल, स्वत्वाबद्दलचा आदर होय. प्रेम म्हणजे गुणांचा पुरस्कार आणि मतभेद/ कमतरतांचा स्वीकार होय. त्या व्यक्तीच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यासाठी पुढाकार घेणे, तिचे आयुष्य सुखमय करण्यासाठी प्रयत्न करणे, तिच्या शारीरिक, भावनिक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैयक्तिक गरजा ओळखून त्यांची वस्तुस्थितीनिष्ठ पूर्तता करणे आणि त्यायोग्य वर्तणूक करणे यात अपेक्षित आहे.

प्रेम ही सक्ती नाही, तर शक्ती आहे. पारतंत्र्य नाही, तर पारदर्शकता आहे. हुकूमशाही नाही, तर हवीहवीशी वाटणारी निर्मळ, निखळ भावना आहे. अन्याय नव्हे, तर अनुरूपतेकडे वाटचाल करण्याचे माध्यम आहे. थोडक्यात, प्रेम करणं म्हणजे क्षणोक्षणीची मेहनत आहे, शिस्त आहे, रतीब आहे. आणि त्याचा आपल्या जीवलगावर आणि पर्यायाने आपल्यावर व आपल्या नात्यावर होणारा परिणामही! स्वत:वर प्रेम जरूर करावं; पण स्वकेंद्री बनू नये. आणि इतरांवर प्रेम करताना स्वत्वही ढळू देऊ नये. असा समतोल प्रेमाची वाटचाल प्रसन्न करेल यात शंका नाही.

डॉ. केतकी गद्रे ketki.gadre@yahoo.com

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोविष्कार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2016 at 00:43 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×