नीरजा

२००३ मध्ये डॉ. प्रतिभा कणेकर यांचा पहिला कथासंग्रह आला आणि आता १८-२० वर्षांनंतर ‘कौलं उडालेलं घर’ हा दुसरा कथासंग्रह आला आहे. या संग्रहात आठ कथा आहेत. स्त्रीचं भावविश्व, तिचे विविध स्तरांवरील प्रश्न या कथांच्या केंद्रस्थानी असले तरी या कथा प्रामुख्याने बोलतात त्या मध्यमवर्गीय स्त्रीच्या भावविश्वाबद्दल! खरं तर स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षित झालेली आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर पडलेली या वर्गातील स्त्री स्वातंत्र्य, समतेच्या चळवळीत ओढली गेली होती. मुक्त अवकाश मिळवण्याचा प्रयत्न करीत होती. पण आज ७५ वर्षांनंतर तिनं काय मिळवलं, या प्रश्नाचं उत्तर जर या कथांत शोधलं तर दिसतं की तिचे प्रश्न फारसे बदललेले नाहीत. या कथांतील स्त्रिया चर्चा करतात, स्वातंत्र्यावर बोलतात. त्यांना नव्या पिढीच्या जगण्याविषयीचं प्रचंड कुतूहल आहे. आधुनिक विचारांविषयी आस्था आहे. मुक्त जगण्याविषयी ओढ आहे. पण  लिव्ह इन रिलेशनशिप असो की विवाहबा संबंध असो.. या सगळ्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही. स्वातंत्र्याची आस असलेल्या आणि स्वत:ला आधुनिक समजणाऱ्या अनेक स्त्रिया आजही परंपरांच्या जोखडात अडकलेल्या आहेत. त्यामुळे जुन्या गोष्टी पटत नसल्या तरी सोडवतही नाहीत आणि अनेक नव्या गोष्टी तत्त्वत: पटताहेत, पण सामाजिक चौकटींमुळे स्वीकारता येत नाहीत असा काहीसा पेच यातील अनेक पात्रांमध्ये दिसतो. त्यामुळेच ‘आजी आणि जेनेट’ या कथेतील जेनेटचं इतर भुकांसारखीच शरीराची भूक भागवणं आणि कोणत्याही जबाबदारीशिवाय मोकळं राहणं शमाला स्वीकारता येत नाही. तिचं जेनेटवर प्रेम आहे. तिला ती आवडते. तिला समजून घेण्याचा ती प्रयत्नही करते, पण आत कुठंतरी लपलेल्या, समाजानं लादलेल्या पारंपरिक मानसिकतेमुळे जेनेटचा हा सडेतोडपणा तिला स्वीकारता येत नाही. जेनेटला तिचं सुख मिळू देत असं शमाला वाटत असलं तरी हे सुख संसार, मुलं किंवा तिचा पुरुष म्हणजे नवरा यांच्यातून मिळू देत असं तिला वाटत असतं. त्यापलीकडे सुखी होण्याचे अनंत मार्ग बाईकडे आहेत हे आजही आपल्या समाजानं स्वीकारलेलं नाही. त्यामुळे ‘कौलं उडालेलं घर’ या कथेतला चिनूचा बोल्ड विचार पटला तरी सगळ्या बहिणी तो सहजासहजी स्वीकारू शकत नाहीत. आणि ‘रेणूच्या आई’ या कथेतील रेणूनं आपल्या स्वातंत्र्याची चुकवलेली किंमत रेणूच्या आईला अस्वस्थ करत राहते. 

lokmanas
लोकमानस: ‘काजव्यां’ना यापुढेही जागे राहावे लागेल..
Gandhis idea of ​​equality between men and women
गांधींचा स्त्रीपुरुष समता विचार
A record of winning more than 400 seats in the Lok Sabha In the name of Rajiv Gandhi himself
‘४०० पार’नंतरची कारकीर्द…
Shashi Tharoor Exit polls Congress Opposition performance loksabha elextion 2024
एक्झिट पोल्स फारच हास्यास्पद! आमच्या कामगिरीत किमान सुधारणा तरी होईलच : शशी थरूर
pandharpur-vitthal-mandir-vishnu-ancient-idols-myths-and-facts
विठ्ठल मंदिरात सापडलेल्या तळघरातील मूर्तींबद्दल दावे-प्रतिदावे; वास्तव आणि मिथक काय?
meditation, Kanyakumari rock memorial, prime minister narendra modi
मोदींच्या नव्या ध्यानमग्न छायाचित्राच्या प्रतीक्षेत…
nick bostrom points out risk arises from ai
कुतूहल : निक बॉस्त्रॉम्
Hindu marriage- legal rights
विवाह अवैध ठरला तर पोटगीसारखे कायदेशीर हक्क गमवावे लागणार का?

या संग्रहात आपल्याला पुरुष पात्रं बॅकग्राऊंडला दिसतात. जी ताकदवान पात्रं आहेत ती सगळीच स्त्रियांची आहेत. मेहरू, नजमा, विभा किंवा ‘कौलं उडालेल्या घरा’तल्या सगळ्या स्त्रियांच्या जगण्यातल्या छोटय़ा छोटय़ा कहाण्या या बाईच्या जगण्याचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. त्यामुळे मेहरू म्हणते तसं या स्त्रीधर्माच्या कथा होत जातात. स्त्रीवादानं मांडलेला भगिनीभावाचा विचार या कथांतील अनेक पात्रांच्या मनात झिरपलेला दिसतो. जेनेट, रेणू, मेहरू, नजमा, शिल्पा, चिनू यांसारख्या मुली वेगळा विचार करताना दिसतात. लेखिकेला हा स्त्रीवाद पटलेला आहे, त्यामुळे काही पात्रं तो विचार मांडताना दिसतात. पण जुन्या-नव्या विचारांच्या संघर्षांतून नवा विचार ठामपणे मांडण्यापेक्षा यातील निवेदक सतत नव्याबरोबर पारंपरिक विचारांचा पगडा असलेल्या स्त्रियांना समजून घेण्याची भाषा करताना दिसतो. त्यामुळे या कथांत अनेकदा प्रौढ आणि आजच्या नव्या विचारांच्या मुलींमध्ये एक कनेक्ट सतत दिसत राहतो. तो आई आणि विभामध्ये आहे. मेहरू आणि तिच्या अम्मीमध्ये आहे. आजी आणि जेनेटमध्ये आहे. पण तो वेगवेगळ्या पातळीवरचा आहे. म्हणजे थेट आई-मुलीच्या नात्यात मुलीच्या स्वातंत्र्याची जाण, त्याची तिला मोजावी लागणारी किंमत यामुळे रेणूची आई अस्वस्थ आहे, तर मुलीला शिकायला मिळतंय या भावनेनं अम्मी खूश होते. विभाची आई स्वत:चा अवकाश शोधण्याचा प्रयत्न करतेय; जो मिळवताना या पिढीची असूनही विभाला खूप कसरत करावी लागते. ‘आजी आणि जेनेट’मधली आजी जेनेटला समजू शकते, पण शमा मात्र जेनेटची मतं स्वीकारू शकत नाही. रेणूच्या आईला जशी रेणूची काळजी वाटायची, तशीच शमाला जेनेटविषयी वाटत राहते. स्त्रीच्या चारित्र्य-पावित्र्याच्या काही कल्पना आणि तिच्या लैंगिक संबंधांविषयीचे टाबूज् आपल्या समाजात असल्यानं तिला जेनेटविषयी प्रेम असलं तरी या गोष्टी तिला अगदी पारंपरिक स्त्रीला जसं हादरवतात तशाच हादरवतात. त्यामुळेच लेखिकाही जेनेट कंडोम विकत घेऊन पर्समध्ये टाकते तेव्हा कंडोमसाठी थेट ‘कंडोम’ हा शब्द न वापरता ‘वस्तू’ हा शब्द वापरते आणि त्याबद्दल अप्रत्यक्षपणे सुचवते.

एकूणच आजही आपली मानसिकता फारशी बदललेली नाही, हे या कथांतून सतत जाणवत राहते. मेहरू तिच्या समाजाबद्दल म्हणताना म्हणते की, ‘आमचा समाज आजारी आहे.’ पण केवळ तिचाच समाज नाही, तर सर्वधर्मीय, सर्वजातीय समाज आजारी होत चालला आहे. शिक्षित झालेले सारेच लोक स्वातंत्र्य, समानता ही मूल्यं मानतात असं नाही. तसं असतं तर ‘तर एकूण हे असं आहे’ या पहिल्या कथेतील लेखिका सामाजिक न्यायाचा मूलभूत विचार करताना दिसली असती. संवेदनशील आणि सर्जनशील असलेली ही लेखिका जास्त गोंधळलेली वाटते. कथालेखनासाठी कोणकोणते विषय डोक्यात आहेत याची यादी या कथेत देताना ती स्त्रीच्या रोजच्या जगण्यातले अनेक प्रश्न, त्यांच्या अनेक कहाण्या सांगते. पण तीच लेखिका आरक्षणामागच्या सामाजिक न्यायाचा विचार किंवा गांधीहत्येमागचा विखारी विचार लेखिका म्हणूनही व्यापक पातळीवर करताना दिसत नाही. आपल्या मुलाला चांगले मार्क्‍स मिळूनही प्रवेश मिळाला नाही तो आरक्षणामुळे आणि त्यावर एक कथा लिहायला हवी असा विचार त्या कथेतील सर्जनशील आणि सामाजिक भान असलेली लेखिका कशी काय करू शकते, हा प्रश्न ही कथा वाचताना पडतोच. एक विचारी स्त्री म्हणून तिच्या डोळ्यांसमोर हजारो वर्षांचा शूद्रांचा इतिहास येत नाही का? बाईला शूद्र मानल्यानं आणि तिला व्यक्ती म्हणून जगणं नाकारल्यानं बाईचं जे झालं, तेच सारं जगणंच नाकारल्या गेलेल्या दलित समाजाचंही झालं, हा विचार या सर्जनशील लेखिकेच्या मनात का येत नाही? कोणी केवळ जातीनं ब्राह्मण आहे म्हणून त्याला गांधीहत्येला जबाबदार धरणं चूकच आहे. पण ज्या विचारसरणीमुळे हा खून केला गेला, त्या विचारसरणीच्या माणसाच्या हेतूंविषयी संवेदनशील लेखिकेला प्रश्न पडू नयेत याचं आश्चर्य वाटतं.

जगण्याचा आणि विचारांचा गोंधळ उडालेल्या आणि धर्माच्या आधारावर माणसातलं माणूसपण विसरण्याच्या या काळात म्हणूनच जेव्हा मेहरू नव्या स्त्रीधर्माची भाषा बोलते तेव्हा एक आशा वाटते. ‘साऱ्या धर्माच्या, जातींच्या पलीकडे जाणारा स्त्रीधर्म स्थापू या..’ असं मेहरू म्हणते तेव्हा ती निर्मितीबरोबरच वेगळ्या समाजाच्या बांधणीचाही विचार मांडते. त्या अर्थानं ‘कौलं उडालेलं घर’ हा कथासंग्रह काही उद्ध्वस्त करण्यापेक्षा सारा समाज बांधण्याविषयी आणि स्त्रियांच्या कम्युनविषयी अप्रत्यक्षपणे बोलत राहतो.

‘कौलं उडालेलं घर’- प्रतिभा कणेकर,

सृजनसंवाद प्रकाशन, पाने- १९२, किंमत-३०० रुपये