अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- महात्मा जोतीराव फुले!

नीलकंठ कीर्तने यांनी ग्रांट डफच्या ग्रंथावर टीका लिहून मराठय़ांच्या इतिहासाबद्दल इथल्या समाजाला सजग केले, हे आपण गेल्या आठवडय़ात पाहिले. त्याच काळात मराठीत नव्या इतिहास व समाजदृष्टीचे एक स्वतंत्र ‘स्कूल’ आकारत होते. त्या स्कूलचे प्रणेते होते- महात्मा जोतीराव फुले. १८६५ मध्ये त्यांनी तुकाराम तात्या पडवळ यांचा ‘जातिभेदविवेकसार’ (१८६१) या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली होती व पुढे १८६९ मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहून प्रकाशित केला. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाकडे लक्ष वेधण्याचे कार्य या पोवाडय़ाने केले. पोवाडय़ाची रचना व तो लिहिताना गृहीत धरलेला वाचकवर्ग यांविषयी प्रस्तावनेत जोतीरावांनी लिहिले आहे-

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

‘‘शिवाजीराजाच्या ह्य़ा पवाडय़ाचे आठ भाग केले आहेत. दरएक भागांत विषयांतर होऊं नये ह्य़ा भयास्तव सर्व भाग एकसारखे केले नाहींत. अति जुनाट यवनी व मेसर्स ग्रांडफ, मरी वगैरे इंग्रज लोकांच्या बहुतेक लेखी आधारावरून हा पवाडा केला आहे. कुणबी, माळी, माहार, मांग वगैरे पाताळीं घातलेल्या क्षत्र्यांच्या उपयोगीं हा पवाडा पडावा असा माझा हेतु आहे. लांबच लांब मोठाले संस्कृत शब्द मुळींच घातलें नाहींत. व जेथें माझा उपाय चालेना तेथें मात्र लहानसहान शब्द निर्वाहापुरते घेतले आहेत. माळी कुणब्यांस समजण्याजोगी सोपी भाषा होण्याविषयीं फार श्रम करून त्यांस आवडण्याजोग्या चालीनें रचना केली आहे.’’

या पोवाडय़ात जोतीरावांनी शिवचरित्रातील महत्त्वाचे प्रसंग प्रवाहीपणे सांगितले आहेत, पण ते करताना त्यांचा स्वतंत्र सामाजिक दृष्टिकोनही त्यातून दिसतो. त्याच वर्षी ‘ब्राह्मणांचे कसब’ हा त्यांचा पद्यग्रंथही प्रकाशित झाला. या लिखाणाच्या १४ वर्षे आधी-१८५५ मध्ये- त्यांनी एक नाटकही लिहिले होते. ‘तृतीय रत्न’ हे ते नाटक. या नाटकातून जोतीरावांनी वर्णवर्चस्व व भिक्षुकशाहीवर हल्ला चढवला. ‘महात्मा फुले- समग्र वाङ्मय’च्या य. दि. फडके यांनी संपादित केलेल्या आवृत्तीत ते वाचायला मिळेल. हे नाटक जोतीरावांनी ‘दक्षिणा प्राइझ कमिटी’कडे पुरस्कारासाठी सादर केले होते. परंतु पुरस्कारासाठी या नाटकाला मान्यता मिळू शकली नाही. त्यानंतर जोतीरावांनी लिखाणाऐवजी शिक्षणप्रसार व सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले. १८७३ मध्ये त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. हे काम करत असताना त्यांना इथल्या समाजस्थितीचे जे आकलन झाले ते त्यांच्या १८७३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘गुलामगिरी’ या पुस्तकात विस्ताराने आले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील हा उतारा पाहा-

‘‘अनेक संकटें भोगितां भोगितां ते फार त्रासून गेले व केव्हां यापासून सुटका होईल याची वाट, जसा एखादा फार दिवस तुरंगांत टाकिलेला कैदी आपले इष्टमित्रांस, मुलांबाळांस व भावांबंधांस भेटण्याविषयीं अथवा स्वतंत्रतेनें इकडे तिकडे फिरण्याविषयीं मोठे उत्सुकतेनें सुटकेचे दिवसाची वाट पाहातो, त्याप्रमाणें पहात आहेत, इतक्यांत दैववशांत ईश्वरास त्यांची करुणा येऊन या देशांत इंग्रज लोकांचें राज्य झालें व त्यांच्याकडून ते भट लोकांचे कायीक दास्यत्वापासून मुक्त झाले. ते इंग्रज सरकारचे त्याजबद्दल फार फार आभार मानितात व सर्वस्वी त्यांचे ते ॠणी आहेत. त्यांचे उपकार ते कधीं विसरणार नाहींत. त्यांनी त्यांस आज शेंकडों वर्षांचे भटलोकांचे कैदखान्यांतून मुक्त करून त्यांचे मुलांबाळांस सुखाचे दिवस दाखविले. ते नसते तर भटलोकांनीं त्यांस केव्हांच धुळीस मिळविलें असतें. याजवर कोणी अशी शंका घेतील कीं, आज भट लोकांपेक्षां शूद्रादि अतिशूद्र लोकांचा भरणा सुमारें दसपट अधिक असून भट लोकांनीं शूद्रादि अतिशूद्र लोकांस कसें धुळीस मिळविलें असतें? याचें उत्तर असें आहे कीं, एक शाहाणा मनुष्य दाहा अज्ञानी मनुष्यांचें आपणाकडेस मन वळऊन त्यांस तो आपले ताब्यांत ठेऊं  शकतो. आणखी दुसरें असें कीं, तीं दाहा अज्ञानी मनुष्यें जर एकाच मताचीं असतीं तर त्यांनीं त्या शहाण्या मनुष्याचें कांहीं चालू दिलें नसतें; परंतु ते दाहा जण निरनिराळे दाहा मतांचे असल्यामुळें शहाण्या मनुष्यास त्यांस फसविण्यास कांहींच आडचण पडत नाहीं. त्याप्रमाणें शूद्रादि अतिशूद्रांचीं मते एकमेकांस मिळूं नये म्हणोन पूर्वी भट लोकांनीं एक मोठा धूर्त कावेबाज विचार शोधून काढिला. त्या लोकांचा समाज जसा जसा वाढत चालला त्याप्रमाणें भट लोकांस भिती वाटूं लागली आणि त्यांनीं त्यांच्यामध्यें परस्पर वाकडेपणा राहील अशी कांहीं तजवीज योजली, तरच आपला येथें राहाण्याचा टिकाव लागून सदासर्वदां ते लोक वंशपरंपरेने आपले व आपले वंशजांचे गुलामगिरींत राहून आपणास कांहीं श्रम न करितां त्यांचे निढळ्याचे घामानें मिळविलेले उत्पन्नांवर बिनधास्त मौजा मारितां येतील, हा त्यांचा विचार सिद्धीस जाण्याकरितां जातिभेदाचें थोतांड उपस्थित करून, त्यांजवर अनेक स्वहितसाधक ग्रंथ केले. व ते त्या अज्ञानी लोकांचे मनांत भरविले.’’

पुढे १८८३ मध्ये शेतकऱ्यांच्या स्थितीगतीवर भाष्य करणारे ‘शेतकऱ्याचा असूड’ हे पुस्तक त्यांनी लिहिले, परंतु ते त्यांच्या हयातीत प्रसिद्ध होऊ शकले नाही. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील हा भाग पाहा-

‘‘वाचकहो, सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्यें तीन भेद आहेत. शुद्ध शेतकरी अथवा कुणबी, माळी व धनगर. आतां हे तीन भेद होण्याचीं कारणें पाहिलीं असतां, मूळचे जे लोक शुद्ध शेतकीवर आपला निर्वाह करूं लागले, ते कुळवाडी अथवा कुणबी, जे लोक आपलें शेतकीचें काम सांभाळून बागाइती करूं लागले, ते माळी व जे हीं दोन्हीही करून मेंढरें, बकरीं वगैरेचे कळप बाळगूं लागले, ते धनगर. असे निरनिराळ्या कामावरून प्रथम हे भेद उपस्थित झाले असावेत. परंतु आतां या तीन पृथक जातीच मानतात. याचा सांप्रत आपसांत फक्त बेटी व्यवहार मात्र होत नाहीं. बाकी अन्नव्यवहारादि सर्व कांहीं होतें. यावरून हे (कुणबी, माळी व धनगर) पूर्वी एकाच शूद्र शेतकरी जातीचे असावेत. आतां पुढें या तिन्ही जातींतले लोक आपला मूळचा शेतकीचा धंदा निरुपायानें सोडून उदरनिर्वाहास्तव नाना तऱ्हेचे धंदे करूं लागले. ज्यांजवळ थोडेंबहुत अवसान आहे ते आपली शेती संभाळून रहातात व बहुतेक अक्षरशून्य देवभोळे, उघडे नागडे व भुकेबंगाल जरी आहेत तथापि शेतकरीच कायम आहेत व ज्यांस बिलकुल थारा उरला नाहीं, ते देश सोडून जिकडे जिकडे चरितार्थ चालला तिकडे तिकडे जाऊन कोणी गवताचा व्यापार करूं लागले, कोणी लाकडांचा व कोणी कापडाचा. तसेंच कोणी कंत्राटे व कोणी रायटरीची वगैरे नोकऱ्या करून शेवटीं पेनशनें घेऊन डौल मारीत असतात. अशा रीतीनें पैसा मिळवून इस्टेटी करून ठेवितात, परंतु त्यांच्या पाठीमागें गुलहौशी मुलें, ज्यांस विद्येची गोडीच नाहीं अशीं, त्यांची थोडय़ाच काळांत बाबूके भाई दरवेशी होऊन वडिलांचे नांवानें पोटासाठीं दोम दोम करीत फिरतात. कित्येकांच्या पूर्वजांनीं शिपायगिरीच्या व शहाणपणाच्या जोरावर जहागिरी, इनामें वगैरे कमाविलीं, व कित्येक तर शिंदेहोळकरासारखे प्रतिराजेच बनून गेले होते. परंतु हल्लीं त्यांचे वंशज अज्ञानी अक्षरशून्य असल्यामुळें आपआपल्या जहागिरी, इनामें गहाण टाकून अथवा खरेदी देऊन हल्लीं कर्जबाजारी होत्साते कित्येक तर अन्नासही मोताद झाले आहेत.’’

१८८५ मध्ये जोतीरावांनी ‘सत्सार’ हे नियतकालिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांची ‘इशारा’ ही पुस्तिकाही प्रकाशित झाली. पुढे त्यांच्या मृत्युपश्चात १८९१ मध्ये त्यांचा ‘सार्वजनिक सत्यधर्मपुस्तक’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. उदार आणि व्यापक मानवधर्माचा आग्रह त्यांनी या ग्रंथातून केला आहे. त्यातील हा उतारा पाहा-

‘‘गणपतराव दर्याजी थोरात. प्र.- सत्यवर्तन करणारे कोणास म्हणावें?

जोतीराव गोविंदराव फुले. उ.- सत्यवर्तन करणाऱ्यांविषयीं नियम देतों, ते येणेंप्रमाणें-

..६. आपल्या सर्वाच्या निर्मीकानें एकंदर सर्व स्त्रीपुरुषांस, एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहेत. त्यांतून एखाद्या मानव अथवा कांहीं मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करूं शकत नाहीं व त्याप्रमाणें जबरी न करणारांस, त्यांस सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.

७. आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्यांनें एकंदर सर्व मानव स्त्रीपुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे, ज्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याहि तऱ्हेचें नुकसान करितां येत नाहीं, अथवा जे कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवाचे हक्क समजून इतरांस पीडा देत नाहींत, त्यांस सत्यवर्तन करणारे ह्मणावेत

..९. आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्यांनें एकंदर सर्व स्त्रियांस अथवा पुरुषांस एकंदर सर्व मानवी हक्कांविषयीं आपले पाहिजेल तसे विचार, आपलीं पाहिजेल तशीं मतें बोलून दाखविण्यास, लिहिण्यास आणि प्रसिद्ध करण्यास स्वतंत्रता दिली आहे; परंतु ज्या विचारांपासून व मतांपासून कोणत्याहि व्यक्तींचें कोणत्याच तऱ्हेचें नुकसान मात्र होऊं नये ह्मणून जे खबरदारी ठेवितात, त्यांस सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.

१०. आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्यांच्या व्यवस्थेवरून एकंदर जे सर्व स्त्रीपुरुष दुसऱ्याच्या धर्मसंबंधी मतांवरून अथवा राजकीयसंबंधीं मतांवरून त्यांस कोणत्याहि प्रकारें नीच मानून त्यांचा छळ करीत नाहींत, त्यांस सत्यवर्तन करणारे ह्मणावेत.’’

जोतीरावांनी तत्कालीन शहरी व बुद्धिजीवी वर्गाच्या मराठी भाषेला खेडय़ातील शेतकरी व श्रमजीवी वर्गाच्या जीवनाशी आणून भिडवले. हे त्यांचे महत्त्वाचे कार्य आहे. मराठी वळण समजून घेण्यासाठी त्यांचे लिखाण आपण सर्वानी वाचायलाच हवे.

संकलन  प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com