चंद्रकांत कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कवीनं अल्पाक्षरी असावं, लेखकानं संवादी असावं, नाटककारानं मितभाषी असावं, नटानं ‘बिटविन द लाइन्स’ व्यक्त करावं, तंत्रज्ञानं शब्दांशिवाय ध्वनी, प्रकाश, रंग, रेषा, पोत, तीव्रतेतून अवकाश भारून टाकावं, प्रेक्षकांनी ‘मौन’ राहून, पण अत्यंत ‘एकाग्र’ होऊन हे सगळं अनुभवावं, समीक्षकांनी नाटय़ानुभवाचं अचूक विश्लेषण आणि रसग्रहण करावं.. नाटकाच्या आदर्श प्रक्रियेत एवढं सगळं अभिप्रेत असतं. पण मग आरंभापासून अंतापर्यंत प्रत्येक क्षणाचा साक्षीदार असलेल्या दिग्दर्शकानं काय करावं? नाटकाची नवीकोरी संहिता हातात आल्यावर आणि अधाशीपणानं ती वाचून काढल्यावर पहिल्यांदा त्याला स्वत:ला आलेला खरा अनुभव आणि त्यावेळची उत्स्फूर्त, प्रामाणिक प्रतिक्रिया एवढा छोटा काळ सोडला, तर पुढे मात्र त्याला नाटकाशी निगडित सगळ्याच घटकांशी अथक बोलावंच लागतं. नाटक वाचल्यावर रचनेविषयी आणि काही बदलांविषयीचं टिपण करेपर्यंतच दिग्दर्शकाचं एकटेपण मर्यादित राहतं. नंतर मात्र त्याला सतत संपर्क, संवाद, चर्चा असं व्यक्त व्हावंच लागतं.

Web Title: Article about chandrakant kulkarni lokrang article journey
First published on: 23-12-2018 at 00:22 IST