‘बाकी संचित’ हे कविवर्य बा. भ. बोरकर यांना कला व सांस्कृतिक क्षेत्रांतील महानुभावांनी प्रसंगोपात लिहिलेल्या पत्रांचे पुस्तक गोवा मराठी अकादमीतर्फे  प्रकाशित करण्यात आले आहे. परेश वासुदेव प्रभू संपादित या पुस्तकातील हे  संकलित प्रकरण..

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्याशी बोरकरांचा पहिला परिचय झाला तो पुलंच्या लहानपणी. पुलंचे वय तेव्हा पंधरा वष्रे होते. बोरकर १९३४ साली बडोद्याच्या मराठी साहित्य संमेलनासाठी जाताना मुंबईत पुलंचे आजोबा वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ‘ऋग्वेदी’ यांचे आशीर्वाद घ्यायला त्यांच्या घरी गेले होते व त्यांच्या आग्रहामुळे एक रात्र त्यांच्याकडे मुक्काम केला होता. त्या बालवयातही पुलं पेटी वाजवत गात असत. ‘ऋग्वेदींचा नातू म्हणून मला त्यांचे विशेष कौतुक. पुढे त्यांच्या चुरचुरीत लेखनाकडे मी आकृष्ट झालो आणि त्यांचा चाहता झालो..’ असे बोरकरांनी पुलंवरील एका लेखात लिहिले आहे. त्यात ते पुढे लिहितात, ‘पुणे आकाशवाणीच्या एकाच खोलीत आमची टेबले लागली आणि आम्ही केव्हा एकमेकांचे मित्र झालो हे माझ्या लक्षातच आले नाही.’

Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

बोरकर पुलंपेक्षा ज्येष्ठ असले तरी पुलंच्या खेळकर वृत्तीचे, कोटीबाजपणाचे चाहते होते. फ्रान्स आणि भारत यांच्या संस्कृतीतील फरक सांगताना ‘त्यांची ती द्राक्ष संस्कृती आणि आपली रुद्राक्ष संस्कृती’असे पुलंनी बोरकरांना पॅरिसहून लिहिलेल्या एका पत्रात लिहिले होते तो किस्सा सर्वज्ञात आहेच. बोरकरांनी आपल्या व त्यांच्या मत्रीत वयाचा भेद कधीच येऊ दिला नाही. त्यांच्या अष्टपलुत्वाचे बोरकरांना कौतुक होते.

पुलंवरील लेखात बोरकरांनी त्यांच्या सहवासातील अनेक किस्से कौतुकाने सांगितले आहेत. बोरकरांचे जावई वज्रम हे एकदा तापाने आजारी असताना पुलंनी त्यांचे नाव आठवत नसल्याचा लटका बहाणा केला तेव्हा ‘तुमचा त्यांचा इतका घरोबा असताना त्यांचे नाव विसरलात?’ असा प्रश्न स्वाभाविकपणे बोरकरांनी पुलंना विचारला. त्यावर पुलंनी कोटी केली- ‘‘ते सारखे आजारी पडतात हे कळल्यापासून मला संभ्रम झाला. म्हटले नाव वज्रम आहे की ज्वरम?’’

पुलंही बोरकरांच्या कवितांचे निस्सीम चाहते होते. त्यांचा ‘आनंदयात्री बाकीबाब’ हा बोरकरांवरील लेख त्याची सर्वतोपरी साक्ष देतो. बोरकर आपल्या घरी आले त्या प्रसंगाविषयी पुलंनी लिहिले आहे.. ‘‘बोरकर त्या संध्याकाळी निळावंतीच्या दीपकळीसारखे माझ्या आजोळी आले आणि आपल्या काव्यगायनाने ओसरी कायमची रंगवून गेले. मनावर उमटलेले ते चित्र आणि त्याचे रंग आजही तितकेच ताजे आहेत. माझ्या आयुष्यातली ती संध्याकाळ आता माझ्याबरोबरच मावळेल.’’ बोरकरांवरील त्या दीर्घलेखामध्ये पुलंच्या लेखणीला नुसता बहर आला आहे.

पुलंनी बोरकरांना लिहिलेल्या पत्रांपकी तीनच पत्रे सध्या बोरकर कुटुंबीयांपाशी उपलब्ध आहेत. पहिले पत्र १९४० मधले- म्हणजे पुलंच्या उमेदवारीच्या काळातले आहे. दुसरे ६० साली दिल्लीहून लिहिलेले आहे, तर तिसरे ८० सालचे बाकीबाब यांच्या अंतिम पर्वातले आहे. वीस- वीस वर्षांच्या अंतराने लिहिलेल्या या पत्रांतून पुलं आणि बाकीबाब यांच्यातील नाते ‘आपला.. पुरुषोत्तम देशपांडे’पासून ‘पी. एल.’पर्यंत कसे गेले ते दिसेल..

श्री

दुभाषी निवास,

विलेपाल्रे.

६-१-४०

 

श्री. बा. भ. बोरकर यांसी,

कृ. सा. न. वि. वि.

ता. ११ जानेवारी रोजी संध्याकाळी रेडिओवर माझ्या गाण्याचा प्रोग्राम आहे. त्या प्रसंगी आपल्या दोन कविता म्हणाव्या अशी माझी इच्छा आहे- ‘नादांत गुंगसी जे शब्दांत सांग बाले’ ही एक आणि ‘तुझी माझी गं प्रीत सजणी’ ही दुसरी. शिवाय कविवर्य तांबे यांची ‘कोणीकडे जादुगारिणि आज सांग धावा’ ही कविताही म्हणणार आहे. आपण बऱ्याच दिवसांत ती. अण्णांच्याकडे आला नाही. प्रत्यक्ष गाठ पडली असती तर आणखीही काही आपण केलेल्यापकी कविता म्हणून दाखवल्या असत्या. ता. ११ ला आपण रेडिओवर या दोन कविता ऐकू शकाल तर चांगलं होईल. दोन्ही कवितांना मीच चाली लावलेल्या आहेत. त्या ऐकल्या असता आपणास आवडल्या किंवा काय हेही कळेल.

गेल्या खेपेस आपण पाल्र्याला आला होता तेव्हा काही नवीन कविता मला दाखवल्या होत्या. शिवाय ‘मी राजा अन् मी राणी’ अशा टेक्स्टची मला वाटतं एक कविता- त्यावेळी ती अपूर्ण होती- ती मला आपण गाऊन दाखविली होती आणि ती पूर्ण झाल्यावर आपण मला लिहून देणार होता. कदाचित कार्यबाहुल्यामुळे आपणास सवड मिळाली नसेल. ती कविता इतरत्र प्रसिद्ध झाली असल्यास मला कळवाल काय? आपणास सवड असल्यास लिहून पाठविण्याची कृपा करावी. सुरुवाती सुरुवातीचे काही गोड शब्द माझ्या कानांत अजून आहेत. रेडिओवर कविता जरूर ऐका.

मुंबईस आल्यास पाल्र्यास येण्याची तसदी घ्यावी. ती. अण्णांची प्रकृती अत्यंत अशक्त झाली आहे. आपल्या घरापासून आमच्या घरापर्यंत जेमतेम येऊ शकत. आपण सहवासाचा लाभ दिल्यास आम्हा सर्वाना अत्यंत आनंद होईल.

ती. अण्णांनी व ती. सौ. बायेने (आजीने) आपणांस आशीर्वाद सांगितला आहे.

कळावे. नमस्कार.

आपला

पुरुषोत्तम देशपांडे

पु. ल. देशपांडे

डी २/५२, पंडारा रोड,

नवी दिल्ली- ११.

३० नोव्हेंबर १९६०

 

प्रिय बाकीबाब,

तुम्हाला एकावन्नावे वर्ष लागल्याचे वृत्त कळले. त्यानिमित्त ‘मौज’, ‘साधना’, ‘पॉप्युलर’ या  तिघांनी योजिलेल्या सुंदर समारंभाची निमंत्रण पत्रिका मिळाली.

फार दूर पडलो- नाहीतर धावत आलो असतो. या योजनेत अजाणती सूचकता आहे. जीवनात ‘मौज’ केलेले- त्याच्या जोडीला ‘साधना’ केलेले आणि ‘पॉप्युलर’ असे तुमच्यासारखे वाङ्मयसेवक हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहेत. शारदेच्या दरबारात नुसतीच मौज आणि नुसतीच साधना मंजूर नाही.

तुम्ही एकावन्न वर्षांचे झालात हे खरेच वाटत नाही. आणि पुढे अनेक वष्रे वाटणारही नाही. काही माणसे दरवर्षी वयातीत होत जातात. काही दरवर्षी वयात येतात. भगवंताने तुम्हाला दुसऱ्या कोटीत टाकले आहे. नव्या कवितांनादेखील तोच तजेला आहे.. तीच टवटवी आहे. या वाढदिवसाच्या प्रसंगी मी तुम्हाला आशीर्वाद देण्याची ऐट कशी आणू? मराठीच्या सेवेबद्दल आणि कोकणीच्या बोटाला धरून तिला चालती केल्याबद्दल धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.

तुमचा कृपालोभ बालपणापासून मला लाभला आहे. सदैव आशीर्वाद पाठीशी असावा अशी उभयतांची प्रार्थना आहे.

तुमच्या जीवनातल्या कडू-गोड प्रसंगांना आनंदाने निभावून नेणाऱ्या- आणि आली वेळ साजरी करणाऱ्या सौ. वहिनींना धन्यवाद आणि त्यांचे अभिनंदनही!

तुमचे जावई व लेक अधूनमधून भेटतात.

आपला,

पुरुषोत्तम

ता. क. :  तुमच्याप्रमाणेच माझाही जन्म नोव्हेंबरातलाच आहे हे कळविण्यास मला आनंद होत आहे. आणि नेहरूंचाही.

४/१२/८०

पुणे- ४.

 

प्रिय बाकीबाब,

इंदूरहून परत आल्यावर तुमचे पत्र मिळाले. गोव्याच्या मुक्कामात तुमचा सहवास लाभला. इष्टमित्रांबरोबर मफिली झडल्या. त्यामुळे मनाला ताजेपणा आला तरी शरीराने मात्र र्निबध प्रकट करायला सुरुवात केली. तिथून मी इंदूरला गेलो. तिथेही कुमार वगरे सखेसोबती. परिणामी पुण्यात परतल्यावर छत्रपतींच्या व्याधीने काटा काढायला सुरुवात केली. त्यात पुण्याची थंडी. एका बाजूने मफिलबाजांची ओढ आणि दुसरीकडून शरीराचा असहकार. बरे, शरीराची तक्रार दुर्लक्षून चालत नाही. वाद्य ठणठणीत हवे. त्याखेरीज आनंद धर्मसाधन शक्य नाही. आता तुमची आमची भेट २५ ला मुंबईत ग्रंथाली कार्यक्रमात होणार. त्यावेळी तुमच्या ध्वनिमुद्रिकांच्या संदर्भात बोलू. तुमची गीते गायला सध्याच्या काळात मला रवींद्र साठे हा गायक योग्य वाटतो. गायनाचा बडेजाव न ठेवता ती गायला हवीत. त्यासंबंधी मी तुमच्याशी प्रत्यक्ष बोलेन. ३० नोव्हेंबरला मी आणि सुनीताने इथूनच ‘तेथे कर माझे जुळती..’ म्हटले होते ते ऐकू आले ना?

तुमचा

पी. एल.