.. शब्दांआडचे काही..

शेक्सपीअरचा विषय आलाच आहे वरती तर उदाहरणार्थ, शेक्सपीअर ‘गे’ होता..

कविता असो, लघुकथा असो, दीर्घकथा असो, कादंबरी असो वा ललितेतर साहित्य; ते लिहिणारा लेखक, कवी, लेखिका, कवयित्री प्रत्यक्षात कसे दिसतात, कसे वागतात याचे कुतूहल वाचकांमध्ये असणे अगदी स्वाभाविक. त्या कुतूहलातून मनाशी काहीएक प्रतिमाही उभी राहते वाचकांच्या मनात साहित्यिकांविषयीची. म्हणजे अमुक एका रीतीची कविता लिहिणारा कवी वागायला असा असा असेल.. अमुक एक कादंबरी लिहिणारा लेखक असा असा दिसत असेल, हसत असेल, बोलत असेल, वगरे. आत्ताचा काळ समाजमाध्यमांचा. प्रसार व प्रसिद्धी तंत्रज्ञान खूपच पुढे गेल्याचा. लिहिणारी अनेक मंडळी या समाजमाध्यमांवर सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयीची जुजबी माहिती वाचकांना असतेच असते. लिहिणाऱ्या मंडळींच्या व्यक्त होण्याच्या रीतीवरून.. अगदी समाजमाध्यमांवर ते डकवीत असलेल्या छायाचित्रांवरूनही वाचक त्यांच्या एकंदर स्वभावाविषयी, विचारांविषयी काही ठोकताळे बांधू शकतो. अर्थात हे ठोकताळे अचूकच असतील अशी खात्री नाही. मात्र, ठोकताळे मांडण्यासाठीचे स्रोत वाचकांच्या हाती असतात, एवढे नक्की.

जेव्हा एखाद्या लेखक-कवीविषयीचे ठोकताळे पुरते मोडीत निघतात, किंवा काही माहितीच्या आधारे त्याच्याविषयीच्या आपल्या मनातील कल्पनांना धक्का पोहोचतो तेव्हा वाचकांचे काय होत असेल? मुळात वाचकांनी लेखक-कवींच्या अशा प्रतिमा मनात निर्माण कराव्यात का? तर- त्या तशा निर्माण होणे ही अगदीच नैसर्गिक बाब. मात्र, साहित्याच्या आकलनात, त्याच्या आस्वादात या प्रतिमांचा अडसर येत असेल तर साहित्याचे आकलन होण्यासाठी साहित्यिकाचे खासगी आयुष्य, त्याचे संदर्भ माहीत असणे आवश्यकच असते का? तर- कधी कधी ते आवश्यक असतेही. त्याखेरीज साहित्यातील संदर्भ योग्य रीतीने उलगडत नाहीत आणि त्याचा आस्वादही घेता येत नाही योग्य रीतीने. अगदी आपल्या मराठीतील कितीतरी कवी-लेखकांचे खासगी आयुष्य त्यांच्या साहित्यात आडवळणाने, तरीही अत्यंत सुस्पष्टपणे उतरलेले दिसते. ते ठाऊक असेल तर लेखकाला, कवीला काय म्हणायचे आहे, त्याच्या म्हणण्याला, त्याच्या शब्दांना काय संदर्भ आहेत याचा अदमास येऊ शकतो. त्यामुळे साहित्याचे आकलन थोडे सुलभ होते. अर्थात हे संदर्भ ठाऊक नसतानाही वाचकाला उलगडणारे अर्थाचे विभिन्न पदर ही बाबदेखील देखणीच. पण तो विषय वेगळा.

साहित्यिकांची मते, त्यांचे आग्रह, दुराग्रह हे त्यांच्या लेखनात दिसतात. अगदी ललित लेखनातही दिसतात. साहित्यिकांनी सोसलेले, पाहिलेले त्यांच्या शब्दांतून डोके वर काढतेच. आणि ते काढणारच. लेखक-कवींनी कितीही टाळले तरी ते होणारच. लेखक-कवी हे काही आकाशातून पडलेले नसतात. ते कुणी परग्रहावरचे प्राणीही नव्हेत. त्यामुळे भोवताली जे घडते ते त्यांच्या शब्दांना बिलगून येणारच.

प्रश्न असा की, त्याकडे वाचकांनी कसे बघायचे? हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे- थोर नाटककार शेक्सपीअर याच्याबाबत नुकतीच प्रसिद्ध झालेली बातमी. बातमी नुकतीच प्रसिद्ध झालेली असली तरी त्यातील तपशील तसा नवा नाही. या बातमीचा विषयही तसा नवा नाही. तो गेली अनेक वर्षे चर्चेत आहे. हा विषय शेक्सपीअरच्या अगदी खासगी आयुष्याचा. शेक्सपीअर हा ‘गे’ होता का, अशी प्रश्नात्मक चर्चा ब्रिटनमधील आणि इतरत्रच्यादेखील साहित्य अभ्यासकांत, वाचकांमध्ये अनेक वर्षे चालू आहे. यासंदर्भात नव्याने टिप्पणी केली आहे ती प्रख्यात नाटय़-दिग्दर्शक ग्रेग डोरॅन यांनी. ग्रेग डोरॅन हे रॉयल शेक्सपीअर कंपनीचे दिग्दर्शक. शेक्सपीअरचा त्यांचा गाढा अभ्यास. शेक्सपीअर हा ‘गे’ होता. त्याने लिहिलेल्या १५४ सुनीतांपकी १२६ सुनीते ही स्त्रीसाठी असल्याचे चटकन् वाटत असले तरी ती पुरुषासाठी आहेत, असे डोरॅन यांचे म्हणणे. इतकेच नव्हे, तर या लैंगिकभावामुळे शेक्सपीअर यांना एकंदर नातेसंबंधांकडे, माणसांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळालेली होती आणि त्याचा फायदा त्यांना आपल्या नाटकांतील पात्रांच्या सखोल स्वभावदर्शनात झाला, असेही डोरॅन सांगतात. तर इतर काही अभ्यासक ‘शेक्सपीअर हा ‘बायसेक्शुअल’ होता..’ असा दावा करतात.

शेक्सपीअर जन्मला सन १५६४ मध्ये आणि निवर्तला सन १६१६ मध्ये. म्हणजे आता ४०० वर्षे उलटली आहेत तो जाऊन. त्यामुळे त्याच्या लैंगिकभावाविषयी आत्ता नेमके काही सांगणे, हे तसे कठीणच. हाती असलेल्या त्याच्या साहित्यावरून आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या तपशिलांवरूनच काही निष्कर्ष काढता येतात. ते काढायलाही हरकत नाही. त्यावर चर्चा करायलाही हरकत नाही. शब्दांआडच्या अशा गोष्टींबाबत कुतूहल असणे यालाही हरकत नाही. हरकत कशाला? तर हे निष्कर्ष, ही चर्चा शेक्सपीअरच्या साहित्याचा आस्वाद घेण्याआड येण्याला! हे असे होते का?

तर- होते. जेथे लेखक-कवीच्या.. एकंदरच माणसाच्या खासगी आयुष्याबाबत नको इतके चोरटे कुतूहल असते त्या समाजात हे असे नक्की होते. हे कुतूहल एका पातळीपर्यंत असणे ठीकच. पण त्यापल्याड जाऊन त्या कुतूहलास कर्मठपणा आणि सोवळेपणा चिकटला, की लेखकाचे लेखन राहते बाजूला, लेखनाच्या गुणवत्तेची चर्चा जाऊन पडते एका कोपऱ्यात, आणि सुरू होते त्याच्या खासगी आयुष्याचे चिवडणे. त्यात एक विकृत कुतूहल दडलेले असते. लेखक, कवी जे लिहितात त्याच्याशी त्याने प्रत्यक्ष आयुष्यात प्रामाणिक असणे, ही वाचकांची अपेक्षा एका मर्यादेपर्यंत योग्यच. म्हणजे एखादा लेखक मारे आपल्या लेखनातून नीतितत्त्वांवर बोधप्रद प्रवचने देत असेल आणि प्रत्यक्ष आयुष्यात भ्रष्ट असेल, तर ते चूकच. एखादा लेखक मारे आपल्या लेखनातून सौंदर्यवादी भूमिका घेत असेल आणि प्रत्यक्षातील त्याचे वागणे, जगणे कुरूप असेल, तर तेही आक्षेप घेता येईल असेच. पण लेखकाचे अगदीच खासगी आयुष्य आणि त्याचे लिखाण यांत गल्लत करता कामा नये वाचकांनी. मुख्य म्हणजे त्याच्या खासगी आयुष्यावरून त्याच्या लेखनाचे मोजमाप करता कामा नये वाचकांनी. शेक्सपीअरचा विषय आलाच आहे वरती तर उदाहरणार्थ, शेक्सपीअर ‘गे’ होता.. म्हणून मग त्याचे साहित्य ‘तसले’च असणार, अशा चष्म्यातून पाहू नये लेखकाच्या लेखनाकडे. प्रत्येक लेखनाचा स्वतचा म्हणून एक आत्मा असतोच असतो. त्याकडे उघडय़ा डोळ्यांनी, स्वच्छ  नजरेने बघायला हवे. खरे तर लेखनाकडे लेखकउणे असेच बघायला हवे. पण ती फारच आदर्श दृष्टी झाली. तेवढी नसेल शक्य होत, तरी निदान स्वच्छ  दृष्टी बाळगणे तरी आहेच शक्य आपल्याला.. वाचकांना.

लेखक- विशेषत: ललित लेखक- आणि त्याचे लिखाण याकडे कसे बघायचे, त्या बघण्यात त्याच्या खासगी आयुष्याचे संदर्भ किती आड येऊ द्यायचे, हा मुद्दा अतिशय सूक्ष्म पातळीवरचा आहे. जरा इकडे तिकडे झाले, की वाचकाचे वाचक म्हणून असलेले इमान ढळले म्हणून समजा. हे इमान राखण्याचे काम आपले.. वाचकांचे. हे इमान ढळले तर त्या साहित्यिकावर एका अर्थाने अन्याय होणार. पण त्यातून अंतिम नुकसान होणारे ते आपलेच.. वाचकांचे.

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व समासातून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shakespeare was gay as par artistic director greg doran

ताज्या बातम्या