राम खांडेकर

१९९१ च्या निवडणुकीत शेवटचे दोन दिवस नरसिंह राव प्रचारासाठी नागपूरला आले होते. शेवटच्या दिवशी प्रचार संपवून ते सर्किट हाऊसला विश्रांतीसाठी आले. तेवढय़ात फोनची घंटी खणखणली. समोरच्या व्यक्तीने दिलेली बातमी जबरदस्त धक्का देणारी होती- ‘राजीव गांधी असॅसिनेटेड!’

Udayanraje Bhosale
“साताऱ्यासाठी एकही चारित्र्यसंपन्न उमेदवार मिळाला नाही”, उदयनराजे भोसलेंची शरद पवार गटावर टीका
congress leader sonia gandhi choose rajya sabha fear of defeat polls says pm narendra modi
पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…

१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत नरसिंह राव भरघोस मतांनी निवडून आले खरे; परंतु निवडणुकीच्या तोंडावर राजीव गांधींनी घेतलेले काही निर्णय कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्याही पचनी पडले नसावेत. त्यात जबरदस्त धक्का दिला तो ‘बोफोर्स’ तोफेच्या खरेदी व्यवहाराच्या गोळ्याने! याबाबतीत विरोधी पक्ष नशिबवान ठरला असे म्हणायला हवे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सत्ताधारी पक्षावर टीका करणारी बाब विरोधी पक्षांना मिळतेच- अगदी कांद्याच्या भाववाढीसारखा विषयही का असे ना! सध्या विद्यमान विरोधी पक्षाच्या हाती ‘राफेल’ विमान खरेदीचा मुद्दा लागला आहे. तीन दशके उलटूनही ‘बोफोर्स’ प्रकरण अजून जिवंत आहे. ‘राफेल’चे आयुष्य किती असेल, या शब्दाचा व्यवहारात कसा उपयोग होऊ शकेल, हे आज तरी सांगणे अवघड आहे.

तर, १९८४ साली ४१४ जागा पटकावलेल्या काँग्रेसला १९८९ च्या निवडणुकीत मात्र अवघ्या १९७ जागा मिळाल्या. योगायोगाची एक गोष्ट आठवली ती सांगावीशी वाटते. १९७७ साली काँग्रेसचा पराभव झाला, त्या वेळी यशवंतराव चव्हाण परराष्ट्रमंत्री होते आणि मी साउथ ब्लॉकमध्ये त्यांचा खासगी सचिव म्हणून खोली क्रमांक- १७१ मध्ये बसत होतो. १९८९ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला, तेव्हाही नरसिंह राव परराष्ट्रमंत्री होते आणि मी त्याच खोलीत, त्याच जागेवर बसत होतो! परंतु यावेळी माझ्याससमोर फार मोठा प्रश्न उभा ठाकला; तो म्हणजे- सत्तेवर असलेल्या मंत्र्यांकडे जावे की नाही, हा! गेली पाच वर्षे नरसिंह रावांनी माझ्यावर अत्यंत विश्वास ठेवून पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे त्यांच्याशी कृतघ्न होण्यास मन धजत नव्हते. शिवाय आठ अपत्ये असूनही ते दिल्लीत एकटेच असल्याने त्यांना सोडून जाणे मला अवघड वाटत होते.

त्या दिवशी रात्री मी घरी गेल्यानंतर माझी पत्नी स्नेहलता आणि मुलगा मुकुल यांच्याशी चर्चा केली. नरसिंह रावांकडे राहायचे असेल, तर बिनपगारी सहा-सात महिन्यांपर्यंत रजा मिळू शकणार होती आणि नंतर पेन्शनवर जावे लागणार होते. तसेही माझी नोकरीची अजून तीन वर्षे शिल्लक होती. दोघांनी नीट विचार करून मला दुसऱ्या दिवशी सांगितले की, ‘‘तुमच्या मनाला पटेल असा निर्णय घ्या, आमची काहीच हरकत नाही.’’ आमच्या कोणत्याही विशेष गरजा नसल्यामुळे आणि अगदी साधी राहणी असल्याने पेन्शनमध्येसुद्धा आनंदाने राहू शकलो असतो. परंतु सहा-सात महिने पगारी-बिनपगारी रजा झाल्यानंतर प्रश्न उद्भवला असता तो सरकारी क्वॉर्टर सोडण्याचा. मी त्याच चिंतेत होतो. मात्र, सत्कर्माच्या पाठीशी देव उभा असतो हेच खरे!

झाले असे की, नरसिंह राव दिल्लीतील ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स’चे अध्यक्ष होते. तिथे त्यांना खासगी सचिव मिळू शकतो हे त्या केंद्राच्या सचिवांनी माझा त्याग व अडचण पाहून सुचवले. मी नरसिंह रावांना याची कल्पना देताच माझी नियुक्ती तिथे झाली. त्या केंद्राचा सर्व खर्च सरकारी तिजोरीतूनच होत असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना सरकारी क्वॉर्टर्स मिळत असे. अशा रीतीने माझा मोठा प्रश्न सोडवला गेला होता आणि मी निश्चिंत मनाने आपल्या कामात रमलो.

निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले नसले तरी अपयश पदरी पडले होते. १९७ सदस्य निवडून आलेल्या काँग्रेसने सरकार बनवणे शक्य नव्हते. भाजप आणि डाव्यांच्या पाठिंब्याने जनता दलाच्या व्ही. पी. सिंगांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. मोठय़ा पक्षाच्या टेकूने उभे असलेल्या लहान पक्षाच्या सरकारची जी अवस्था होण्याची शक्यता असते तीच या सरकारची झाली. जेमतेम ११ महिन्यांच्या कालावधीनंतर पंतप्रधान व्ही. पी. सिंगांना राजीनामा द्यावा लागला. या अवधीत काम तर फारसे झाले नाही, परंतु मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करून देशात खळबळ निर्माण केली. दिल्लीत तर याविरोधात जवळपास सात-आठ हजार मुला-मुलींनी रहदारीला अडथळा येणार नाही अशा रीतीने रस्त्याचा एक भाग अडवून चार-पाच दिवस धरणे दिले. आश्चर्य म्हणजे, या धरणेकऱ्यांना सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंतची व्यवस्था करण्यासाठी लोकांमध्ये जणू स्पर्धाच सुरू झाली. या मुलांच्या पालकांनी रात्री मेणबत्त्या घेऊन शांततेने मोर्चे काढले. हे आंदोलन स्वयंस्फूर्त व अगदी निरुपद्रवी तर होतेच; शिवाय एकाही राजकीय पुढाऱ्याला तिथे येऊ दिले गेले नाही. थोडक्यात, या निर्णयामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली होती. दरम्यान, भाजपने लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या रामरथयात्रेनेही अशीच खळबळ निर्माण झाली होती. ही रथयात्रा बिहारच्या समस्तीपूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवली आणि अडवाणींना अटक केली. यामुळे व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा भाजपने काढून घेतला.

त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने १९९० च्या नोव्हेंबरमध्ये चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार अस्तित्वात आले. परंतु या सरकारच्या काळात तिजोरीत ठणठणाट होता. सोने गहाण ठेवून पैसे आणण्याशिवाय गत्यंतर नव्हते आणि तेच पाऊल उचलले गेले. अशा पैशांत राज्य कसे व किती दिवस चालवायचे, योजना कशा आखाव्यात, हेच कळत नव्हते. थोडक्यात, या सरकारचे वर्णन निर्जीव सरकार म्हणूनच करावे लागेल. याचा फार भयंकर परिणाम प्रशासन आणि उद्योगजगतावर झाला. त्यांच्यात कोणताही उत्साह राहिला नव्हता. अखेर सरकार राजीव गांधींवर पाळत ठेवत असल्याच्या काँग्रेसच्या आरोपानंतर ६ मार्च १९९१ रोजी चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला.

त्याच दिवशी नरसिंह राव हैदराबादच्या भेटीवरून दिल्लीत परतले होते. मोटारीत बसल्यानंतर मी त्यांना चंद्रशेखर यांच्या राजीनाम्याची बातमी सांगितली. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या तोंडून आपसुक शब्द निघाले, ‘‘असं व्हायला नको होते..’’ प्रणव मुखर्जीनी काँग्रेस सोडली तेव्हा आणि आताही नरसिंह राव दिल्लीबाहेर होते. मग ते ताबडतोब राजीवजींना भेटण्यास गेले. राजीवजी नरसिंह रावांची वाटच पाहात होते. सिंग यांचे सरकार २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९०, तर चंद्रशेखर यांचे १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ पर्यंत राहिले. हा पायंडा देशाच्या प्रगतीस बाधक ठरू शकतो, असे मत उभयतांनी व्यक्त केले होते. शिवाय दोनच वर्षांत सार्वत्रिक निवडणुकीचा खर्च प्रशासनाला अजिबात झेपणारा नव्हता. परंतु दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता. चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला असला, तरी नवीन पंतप्रधानांची निवड होईपर्यंत ते काळजीवाहू सरकारचे पंतप्रधान राहणार होते.

१९९१ च्या मेमध्ये लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्या आधीच्या दोन वर्षांत नरसिंह रावांच्या जीवनात आणखी एक गोष्ट घडली होती. त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाली होती. महत्त्वाचे म्हणजे, नरसिंह रावांना त्यांची काँग्रेस कुठेच दिसत नव्हती. बहुतेकांमध्ये स्वार्थासाठी वाटेल ते करण्याची प्रवृत्ती, हेवेदावे, सत्तासंघर्ष हेच प्रामुख्याने दिसत होते. यामुळे नरसिंह राव कष्टी होतेच; आता तर त्यांना प्रकृती अस्वास्थ्याचे कारणही मिळाले होते. १९९१ च्या निवडणुका न लढवण्याचा आपला निर्णय नरसिंह रावांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्याने राजवजींनी तो मान्यही केला. तरीही राजवजींच्या इच्छेनुसार नरसिंह रावांनी दिल्लीच्या मुख्यालयात प्रचार यंत्रणेसाठी उघडलेल्या विभागाची जबाबदारी मात्र स्वीकारली होती. आणखी एक गोष्ट म्हणजे, या काळात त्यांनी हळूहळू आपली पुस्तके वगैरे हैदराबादला पाठवण्यास सुरुवात केली होती. अर्थात, पुढील आयुष्यासंबंधी निश्चित विचार मात्र केलेला नव्हता हेही तितकेच खरे!

नरसिंह रावांनी आधी ज्या रामटेक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते, तिथल्या उमेदवाराने नरसिंह रावांची लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांनी दोन दिवसांसाठी तरी मतदारसंघात प्रचारासाठी यावे असा आग्रह धरला होता. तो त्यांनी मान्य केला आणि दिल्लीतील काम संपवून शेवटचे दोन दिवस (२० व २१ मे) ते त्यासाठी रामटेकला गेलेसुद्धा! २१ मे हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रचारसभा आटोपून नरसिंह राव नागपूरला परतले. यावेळी आम्ही दोघेच गाडीत होतो. नरसिंह रावांच्या मनात नेहमीप्रमाणे पक्षाबद्दलचे काहीतरी विचार चालू असल्याचे भासत होते. त्यामुळे प्रवास न बोलताच झाला. येताना मात्र मौदा येथे त्यांच्याच सूचनेनुसार सुरू करण्यात आलेल्या डीसीएल पॉलिस्टर कारखान्यात जाऊन त्याची प्रगती पाहिली. नागपूरला पोहोचलो तर नऊ वाजले होते. तेवढय़ात नागपूरच्या एका वर्तमानपत्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या संपादकांचा भोजनाचे निमंत्रण देणारा फोन आला. नरसिंह राव अशाच व्यक्तीच्या शोधात असावेत. त्यांनी पटकन होकार दिला व आम्ही त्यांच्याकडे गेलो.

वेळेचा सदुपयोग करून घेणे ही तर नरसिंह रावांची हातोटी होती. जेवणानंतर वेळकाढू गप्पा करण्याऐवजी नरसिंह रावांनी संपादकांना थेट प्रश्न विचारला. ते राजकारणातही असल्यामुळे त्यांच्या उत्तराला महत्त्व होते. प्रश्न होता- ‘‘काँग्रेसला १८०-२१०, २१०-२५० जागा मिळाल्या, तर काय भूमिका घ्यावी? मी दिल्लीत गेल्यानंतर राजीवजींशी चर्चा करताना याचा मला उपयोग होणार आहे.’’ इतर काँग्रसेजनांच्या मनातही विचार आला नसेल, परंतु नरसिंह राव नेहमी दूरचा विचार करायचे. तसेच नरसिंह रावांनी त्यांना स्पष्ट सांगितले, की काही झाले तरी राजीवजींचे नेतृत्व कायम राहणार आहे. नंतर विकास महामंडळाबाबत चर्चा झाली आणि  आंध्रमधील अशाच बोर्डाच्या कार्याची माहितीही त्यांनी संपादकांस दिली.

साडेदहा वाजता आम्ही रविभवनला (सर्किट हाऊस) परतलो. ते थकले होते म्हणून ताबडतोब झोपण्यास गेले. माझी बेडरूम त्यांच्याच शेजारी होती. मी दुसऱ्या दिवशीची तयारी करत होतो. विमानाची तिकिटे काढून नीट ठेवली आणि झोपणार, एवढय़ात फोनची घंटी खणखणली. तिथे सहसा फोन येत नसे – आला तर फक्त दिल्लीवरून – तरीही मी उचलला. तिकडून आवाज होता त्याच संपादकांचा आणि बातमी होती जबरदस्त धक्का देणारी- ‘राजीव गांधी असॅसिनेटेड’! केवळ एवढीच बातमी वारंवार सर्व न्यूज एजन्सीच्या टेलिप्रिंटरवर येत होती. बातमी पूर्णपणे खरी असल्याचेही त्यांनी सांगितले. नरसिंह रावांना उठवून ही बातमी सांगणे अवघड होते, पण पर्याय नव्हता. कसेतरी धाडस केले- ‘‘साहेब, उठता का?’’ ते म्हणाले, ‘‘सकाळ झाली का?’’ मी म्हणालो, ‘‘नाही. एक दु:खद बातमी सांगायची आहे. राजीवजींच्या हत्येची..’’ कधी नव्हे असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले, ‘‘मूर्ख आहात का?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘पटकन आवरून बाहेर या. १५-२० मिनिटांत लोक यायला लागतील, मग बोलू.’’

त्यांची अवस्था पाहून मी तर घाबरलोच. काहीच सुचेना. ते तयार होऊन येईपर्यंत मी सिव्हिल सर्जनला फोन करून सर्व परिस्थितीची कल्पना देऊन डॉक्टर व रुग्णवाहिका पाठवून देण्यास सांगितले. तसेच हैदराबादला फोन करून त्यांच्या मोठय़ा मुलाला सर्व परिस्थिती समजावून सांगून काहीही करून पत्नीसह सकाळच्याच विमानाने दिल्लीस येण्यास सुचवले. कारण रात्री त्यांच्याजवळ कोणीतरी असण्याची आवश्यकता होती. अर्थात कोणीच आले नाही ही गोष्ट निराळी! मात्र, नंतर वडील काँग्रेसचे अध्यक्ष होणार हे समजताच हैदराबादमधील सर्व मुले-मुली सहकुटुंब दिल्लीत हजर, केवढी ही पितृभक्ती! तर, नरसिंह राव आवरून बाहेर आले आणि म्हणाले, ‘‘आता सविस्तर सांगा काय झाले ते.’’ तेवढय़ात, संपादकांचाच पुन्हा फोन आला. तो मी नरसिंह रावांनाच दिला आणि संपादकांनी तोपर्यंत आलेली सविस्तर बातमी त्यांना सांगितली. ते ऐकून त्यांच्या तोंडून केवळ इतकेच शब्द निघाले- ‘‘देशाचे फार नुकसान झाले आहे.’’

अनेक कार्यकर्ते, आमदार हळूहळू जमा झाले. जवळपास तासभर चर्चा सुरू होती. नरसिंह राव बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. रात्री त्यांना अतिशय घरोबा असलेल्या साळवे यांच्याकडे मुक्कामासाठी पाठवले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ७.४० च्या विमानाने दिल्लीला जायचे असल्याने विशेष विमानाचा विचार सोडून दिला होता. विमान रायपूरमार्गे असल्यामुळे साडेअकरा वाजता दिल्लीला पोहचलो. तिथून नरसिंह राव सरळ सोनियाजींना भेटण्यास गेले. तिथे पक्षाचे अनेक नेतेसुद्धा अगोदरच पोहोचले होते. राजीवजींचे पार्थिवही दिल्लीत पोहोचले होते. ते तीन मूर्ती इथे लोकांच्या दर्शनासाठी ठेवल्यानंतर नरसिंह राव घरी आले. त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख, उदासी स्पष्ट दिसत होती. नवीन पक्षाध्यक्ष निवडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या, परंतु त्यात गती नव्हती. चर्चा सुरू झाल्या. पक्षाध्यक्ष नेमण्याची घाई यासाठी की, राजीवजींच्या मृत्यूमुळे पुढे ढकलल्या गेलेल्या काही लोकसभेच्या जागांसाठी प्रचाराची रूपरेषा तातडीने आखण्याची गरज होती. २२ व  २३ मे रोजी राजीवजींचे पार्थिव लोकांच्या दर्शनासाठी ठेवून २४ मे रोजी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजीवजींच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या काही परदेशी प्रतिनिधींनी परत जाण्यापूर्वी २५ तारखेला सकाळी नरसिंह रावांची भेट घेऊन सहवेदना व्यक्त केलीच; परंतु इतर गोष्टींबाबतही चर्चा केली. तोवर अध्यक्षपदी त्यांची निवडही झाली नव्हती, पण अध्यक्ष नरसिंह रावच होतील अशी त्या परदेशी प्रतिनिधींची खात्री असावी.

देशाची आर्थिकच नव्हे, तर सर्व क्षेत्रांतील परिस्थिती गंभीर, चिंताजनक होती. त्यातून बाहेर येण्यासाठी सक्षम आणि खंबीर व्यक्तीची निवड होण्याची गरज होती. या पदासाठी काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून अध्यक्षपदाच्या घोडय़ावर आरूढ होण्यास सज्ज होते. मात्र, नरसिंह राव यात नव्हते. ते स्थितप्रज्ञ राहून चर्चा ऐकत होते. सत्तेचा त्यांना मोह नव्हता. बहुतेक कार्यकारिणीच्या सदस्यांनी या पदासाठी आज तरी नरसिंह रावांपेक्षा दुसरी योग्य व्यक्ती नाही, असे मत नोंदवल्याने त्यांची निवड करण्याचे ठरले. ‘आज नहीं तो कभी नहीं’ याची खात्री असल्यामुळे पद न मिळालेल्या काही सदस्यांनी हुकमाचा एक्का पुढे केला. या पदासाठी सोनियाजींना विचारणा करण्यात यावी अशी सूचना या सदस्यांनी केली. मात्र, त्या कधीही राजकारणात वावरल्या नव्हत्या, तसेच प्रशासनाचाही त्यांना अनुभव नव्हता. शिवाय नरसिंह राव राजीवजींचे विश्वासू सल्लागार होते हेही त्यांना ठाऊक होते. त्यामुळे सोनियाजींनी स्पष्ट नकार देऊन नरसिंह रावांच्या निवडीला सहमती दिली. पं. नेहरूंच्या निधनानंतरही अगदी अशीच परिस्थिती उद्भवली होती. परंतु तेव्हाचे काँग्रेसजन सुज्ञ, अनुभवी होते. मुख्य म्हणजे ते पदासाठी हपापलेले नव्हते. इंदिराजी दु:खात असताना त्यांना याबाबत विचारणे त्यांना योग्य वाटले नव्हते. पण नव्वदच्या दशकापर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.

शेवटी २९ मे १९९१ रोजी सायंकाळी झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये नरसिंह रावांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले.

ram.k.khandekar@gmail.com