विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजीत लिहिणाऱ्या भारतीय लेखकांत मुल्कराज आनंद, राजा राव आणि आर. के. नारायण हे आपापल्या गुणवैशिष्टय़ांमुळे प्रसिद्धीस आले. मुल्कराज आनंद पुरोगामी लेखक, तर आर. के. नारायण हे भारतीय मिथकांचा चपखल वापर करत आपलं लेखन व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून भारतीय (खरं तर पारंपरिक!) बनवीत. त्यांच्या या भारतीयतेची (आजच्या भाषेत सांगायचं तर देशीवादाची!) मोहिनी ब्रिटिश कादंबरीकार हेन्री ग्रॅहम ग्रीनवर एवढी होती, की त्यांनी आर. के. नारायण यांच्या ‘द बॅचलर ऑफ आर्ट्स’ या कादंबरीला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांची तुलना लियो टॉलस्टॉय, तुर्गनेव्ह, चेकॉव्ह, हेन्री जेम्स, किपलिंग यांच्यासारख्या जगप्रसिद्ध साहित्यकारांशी केली होती. अशा प्रख्यात इंग्रजी कादंबरीकार आर. के. नारायण यांच्या चार कादंबऱ्याचे मराठी अनुवाद रोहन प्रकाशनाने मराठी वाचकांसाठी नुकतेच उपलब्ध करून दिले आहेत.
आर. के. नारायण यांनी प्रारंभीच्या काळात सलग तीन कादंबऱ्यांतून अंशत: आपलं आत्मचरित्रच लिहिलं आहे. ‘स्वामी अँड फ्रेंड्स’ (१९३५), ‘द बॅचलर ऑफ आर्ट्स’ (१९३७) आणि ‘द इंग्लिश टीचर’ (१९४५) ही ती कादंबरीत्रयी होय. पैकी दोनची भाषांतरे सध्याच्या मालिकेत प्रकाशित झाली आहेत.
अशोक जैन यांनी भाषांतरित केलेल्या ‘द बॅचलर ऑफ आर्ट्स’मध्ये हेन्री ग्रॅहम ग्रीनची मूळ प्रस्तावना असती तर या भाषांतराचे मूल्य वाढले असते असे वाटून जाते. मूळ कादंबरी अशोक जैन यांनी समरसून अनुवादित केली आहे. ही कादंबरी म्हणजे आर. के. नारायण यांच्या महाविद्यालयीन जीवनाच्या अविस्मरणीय स्मृती होत. चंद्रन हा महाविद्यालयीन युवक या कादंबरीचा नायक. तो महाविद्यालयीन काळात पट्टीचा वक्ता म्हणून प्रसिद्ध असल्याने विद्यार्थी संघटनेचं चर्चासत्र असो वा महाविद्यालयाच्या एखाद्या विषय मंडळाची स्थापना वा उद्घाटनाचा सोहळा- चंद्रनशिवाय पान नाही हलायचं. ‘सर्व इतिहासकारांची कत्तल केली पाहिजे’ विषयावरील वादविवादात बाजी मारून अनुकूल ठराव करून घेतलेल्या चंद्रनच्या वक्तृत्वाची मोहिनी इतिहास विभागाचे प्रमुख असलेल्या प्रा. राघवाचार यांच्यावर इतकी पडते (खरं तर ते त्याचा धसकाच घेतलेले असतात!), की ते आपल्या इतिहास मंडळाच्या उद्घाटनाची सारी जबाबदारी चंद्रनवर सोपवून मोकळे होतात. (बहुधा त्यांना पूर्वकत्तलीचं पापक्षालन करून घ्यायचं असावं.) असा चंद्रन पदवीधर होऊन नोकरीऐवजी छोकरी मालतीच्या प्रेमात पडतो. पत्रिका न जमल्याने विरहव्याकुल चंद्रन संन्यासी बनतो. पुढे उपरती होते व तो पत्रकार होतो. अशा टिपिकल ‘देवदास’ छापाच्या या कथेत आर. के. नारायण यांनी तत्कालीन शिक्षण, शिक्षक, समाज, विवाहप्रथा, पश्चात्तापदग्ध सामान्य माणसाचं गृहस्थजीवन चित्रित करून तत्कालीन भारतीय युवकांची प्रातिनिधिक कथा आपल्यासमोर ठेवली आहे.
ज्यांना कुणाला आर. के. नारायण यांच्या लेखणीच्या वर्णनसामर्थ्यांचा आणि चित्रात्मक शैलीतून दक्षिण भारतीय समाजजीवन समजून घ्यायचं आहे त्यांना ‘द बॅचलर ऑफ आर्ट्स’चा अनुवाद हा आरसा ठरावा. अशोक जैन यांनी मूळ इंग्रजी संहितेतील आशय मराठी वाचकांपुढे ज्या सुलभ पद्धतीने या भाषांतरात सादर केला आहे, तो अनुवाद नसून मूळ इंग्रजी कादंबरीचे मराठी रूपांतरण होय. उँंल्ल१िंल्ल ६ं२ ३ँ१४ॠँ’८ े८२३्रऋ्रीह्णि या वाक्याचं अशोक जैन ‘चंद्रन बुचकळ्यात पडला’ असं भाषांतर करतात, तेव्हा हे लक्षात आल्यावाचून राहत नाही.
‘द बॅचलर ऑफ आर्ट्स’ कादंबरीचा उत्तरार्ध म्हणून ‘द इंग्लिश टीचर’कडे पाहिलं जातं. या कादंबरीचा प्रारंभ इंग्रजी विभागाची भूमिका विशद करत होतो. महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे विषयदृष्टीचा विकास. भाषा विषय साहित्य-अभिरुची जागवतात. समाजशास्त्रे समाजशील बनवतात. तसा महाविद्यालयातला प्रत्येक विभाग हा एक ब्रीद घेऊन कार्यरत असतो. इंग्रजी विभागापुरतं बोलायचं झालं तर ‘्र’ वरती डॉट द्यायला व ‘३’ क्रॉस करायला शिकवणारा विभाग (ऊ३३्रल्लॠ ३ँी ्रह्ण२ ंल्ल िू१२२्रल्लॠ ३ँी ३ह्ण२) ही कादंबरी प्रत्येक वाचकास त्याच्या महाविद्यालयीन दिवसांचं गारुड उभं करत त्याच्या भूतकाळात कधी घेऊन जाते ते कळत नाही. कोणत्याही महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग ऑक्सफर्ड, केंब्रिजपेक्षा कमी नसतो. प्रत्येक इंग्रजी प्राध्यापकापुढे शेक्सपीअर, मिल्टन, कांट कसे हात जोडून उभे. कॉलेजच्या प्रत्येक विषयाचा विभागप्रमुख ‘फादर’ असतो. त्यात इंग्रजी विभागप्रमुख दस्तुरखुद्द प्राचार्य असतील तर ते ‘पोप’च समजले जातात. यातल्या प्राचार्य ब्राऊन यांचं चरित्र याची प्रचीती देतं. या इंग्रजी विभागातला सर्वात कनिष्ठ प्रा. कृष्णा. ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकता, तिथंच तुम्हाला शिकवलेल्या प्राध्यापकांचे सहकारी म्हणून तुम्ही नोकरीस लागता तेव्हा तिथं तुमचं जिणं दुहेरी गुलामीचं कसं असतं, हे आर. के. नारायण यांनी चपखलपणे उभं केलं आहे. नारायण कादंबरीकार म्हणून सूक्ष्म निरीक्षक असतात.
‘द इंग्लिश टीचर’ असं शीर्षक असलं तरी ही कादंबरी आपणापुढे जीवन आणि मृत्यूचं तांडव उभं करते व त्यांचं तत्त्वज्ञानही समजावते. नारायण आपल्या अनेक कादंबऱ्यांतून जन्मपत्रिका, कुंडली, मुहूर्त, मृत्यूनंतरचे जीवन, इ. (पुनर्जन्म, भूत, प्रेत, आत्मा, इ.) भारतीय समाजजीवनाची व्यवच्छेदक अंगे चित्रित करतात. नायक प्रा. कृष्णाचं पत्नी सुशीला आणि कन्या लीला हिला घेऊन मध्यमवर्गीय जीवन भाडय़ाच्या घरात कंठत राहणं वडिलांना पसंत नसतं. आपलं सारं आयुष्य भाडय़ाच्या घरात गेलं. मुलानं तरी स्वत:चं घर घ्यावं म्हणून ते मदतीचा हात पुढे करतात. गृहशोध मोहिमेत सुशीला एका प्रसाधनगृहात जायचं निमित्त काय होतं, नि तिचा आजार टॉयफाइड ठरून तिला मृत्यू ओढवतो. कन्येस आजीकडे ठेवून एकांत जीवन जगणाऱ्या कृष्णाच्या जीवनात एक अज्ञात व्यक्ती येऊन सुशीलेचा संदेश पोहोचवणारं पत्र देते. त्यात लिहिलेलं असतं- ‘तुमची पत्नी सुशीला मृत्यूनंतर तुमच्याशी संपर्क साधण्याच्या योग्य अशा माध्यमाच्या शोधात होती. मी तिला मिळालो. तिचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.’ यातून एका गूढ प्रवासाची कथा गुंफून नारायण यांनी ही कादंबरी मोठ्ठी जिज्ञासावर्धक बनवली आहे. ती मुळातूनच वाचली पाहिजे. अनुवादक उल्का राऊत यांनी इंग्रजी भाषेतलं गूढ मात्र अत्यंत सहज संवादी बनवत हे भाषांतर वाचनीय बनलं आहे. ळँी ँ४२ी २ीेी ि४ल्लुीं१ु’८ ४ि’’ह्णचं भाषांतर उल्का राऊत जेव्हा ‘घर खायला उठलं’ असं करतात, तेव्हा त्या अनुवादात सारसंक्षेपाबरोबरच आशयसमृद्धीही प्रतिबिंबित होत राहते. म्हणूनच हा अनुवाद सुलभ व सुबोध वाटतो. पूर्वकादंबरीच्या तुलनेत मात्र इथे नारायण पुरोगामी होताना आढळतात. हा नायकाचा विचारविकास तशीच लेखकाची प्रगल्भताही!
मूळ ‘मॅनइटर ऑफ मालगुडी’चा (१९६१) अनुवाद आहे ‘मालगुडीचा नरभक्षक.’ तो सरोज देशपांडे यांनी केला आहे. नटराजनचा मालगुडीत एक छोटा प्रेस असतो. तिथं वासू हा टॅक्सिडर्मिस्ट असलेला गृहस्थ छपाईचं काम घेऊन येतो. त्याच्या उपजत आक्रमक वृत्तीमुळे तो प्रेसच्या पोटमाळ्यात भाडेकरू म्हणून राहू लागतो. प्राण्यांची शिकार, त्यांचं कातडं कमावणं, शिकार केलेल्या प्राण्यांची पेंढा भरून विक्री करणं हा त्याचा उद्योग. शिकलासवरलेला वासू उमेदीच्या काळात एका पहिलवानाच्या हाताखाली शिकून, शरीर कमावून फरशी फोडणे, साखळदंड तोडणे, नरडय़ाने लोखंडी गज वाकवणे, इ. कौशल्ये शिकून घेऊन आपल्या गुरूलाच बेदखल करतो. त्यातून त्याच्यात शक्तीचा अहंकार व मान मुरगळायची वृत्ती विकसित होते. ही पूर्ण कादंबरी म्हणजे समाजातील सुष्ट नि दुष्टामधील पारंपरिक संघर्ष व द्वंद्वाचं चित्रण असून नरभक्षक वृत्ती धारण केलेल्या नटराजनचा मृत्यू भस्मासुराप्रमाणे स्वत:च्याच शक्तीने झाल्याचे चित्रण करून पूर्वमिथकाची द्विरुक्ती होते.
संपूर्ण कादंबरीभर नरभक्षक वृत्तीचा उच्छाद, दर्प चित्रित करून त्यापुढे सामान्यांचं जीवन, कायदा, पोलीस, शासन यंत्रणाही अनेकदा हतबल होते, याचं विदारक चित्र ही कादंबरी जिवंत करते. ही चरित्रप्रधान कादंबरी नारायण यांच्या चरित्रचित्रणाचं कौशल्य अधोरेखित करते. कादंबरी वाचत असताना वाचक कादंबरीतील पात्रांप्रमाणे नरभक्षकाच्या भयाच्या छायेत जीव मुठीत धरून, श्वास रोखून शेवटपर्यंत वाचत राहतो, याचं रहस्य नारायण यांच्या गूढ व जिज्ञासावर्धक कथानकाला द्यावं लागतं. हा अनुवाद वाचताना मराठी वाचकांना बाबुराव अर्नाळकरांचा नायक झुंझार न आठवला तरच आश्चर्य!
नारायण यांनी आपल्या आरंभीच्या कादंबरीत्रयीचा अपवाद सोडला तर प्रत्येक कादंबरीत विषयवैविध्य, शैलीवैचित्र्य जसं जपलं तसं कथाविकासाचे नवनवे प्रयोगही केलेत. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक कादंबरीची वाचकाला ओढ असते. आणि मोहिनी पण. ‘वेटिंग फॉर द महात्मा’ (१९५५) चा अनुवाद सरोज देशपांडे यांनी ‘महात्म्याच्या प्रतीक्षेत’ या नावाने केलेला असला तरी ती कादंबरीच आहे. तिचा मूळ उद्देश महात्मा गांधींची थोरवी चित्रित करणे हा आहे. श्रीराम व भारतीची प्रेमकथा असलेली ही कादंबरी मुख्यत: महात्मा गांधी, चले जाव चळवळ, गांधीवादी कार्यकर्ते, स्वयंसेवकांची तळमळ, देशप्रेम, तुरुंगवास चित्रित करत गांधीहत्येनं संपते. ही वातावरणप्रधान कादंबरी होय. १९४२ ते १९४८ असा सुमारे सहा-सात वर्षांचा काळ म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनाचे मंतरलेले दिवस! त्यात सुभाषचंद्र बोस, त्यांची आझाद हिंद सेना, जपानहून भारतीयांना उद्देशून केलेलं रेडिओवरचे भाषण, भूमिगत चळवळ यांतून ही कादंबरी स्वातंत्र्यलढा चित्रपटासारखा चित्रित करते. यातून नारायण यांची गांधीवादी विचारांप्रती असलेली आस्था व्यक्त होते.
या भाषांतरित साहित्यकृतींतून मराठी वाचक इंग्रजी भाषा व साहित्यविश्वाशी परिचित होतात. नारायण यांच्या अनेक कादंबऱ्या म्हणजे दक्षिण भारताचं समाजदर्शन असतं. नारायण यांनी या कादंबरीतून ‘मालगुडी’ हे काल्पनिक गाव उभं केलं आहे. ते काल्पनिक असलं तरी दूरदर्शन मालिका, चित्रपट, आत्मकथा इत्यादीमुळे त्याला आगळं महत्त्व व अस्तित्व लाभलं आहे.
काही वेळा कल्पना ही वास्तवापेक्षा प्रत्ययकारी बनते याचं मालगुडी हे उदाहरण. आख्यायिका सत्यकथा बनल्यासारखं वैभव! विदेशी वाचक भारतात येतात, कर्नाटक- तामिळनाडूला जातात अन् फर्माईश करतात की, आम्हाला मालगुडीला जायचंय.. ती गावं, तिथली माणसं, संस्कृती अनुभवायची आहे. हे सारं साहित्यिकाला किमयागार बनवणारं असतं.
इंग्रजी कादंबऱ्यांच्या मराठी अवतारामुळे जी सांस्कृतिक देवाणघेवाण होते, ती जागतिकीकरणाच्या निमित्ताने जग एक होण्याच्या, ते जवळ येण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा दुवा वाटतो. अनुवादक मराठीभाषी असल्याने इंग्रजी तपशिलांचा मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, परंपरांच्या संदर्भाने अनुवाद करतात तेव्हा ते अनुवाद असले तरी त्यांचं होणारं मराठीकरण भाषाविकास व समृद्धीच्या दिशेनं उचललेलं महत्त्वाचं पाऊल ठरतं. प्रांत, भाषा, परंपरा, संस्कृतीतील दरी नष्ट करण्याच्या संदर्भात असे अनुवाद नवं सामाजिक अभिसरण घडवून आणतात. मराठीतील ‘बनगरवाडी’,  ‘गारंबीचा बापू’, ‘तुंबाडचे खोत’ इत्यादी कादंबऱ्यांनाही मालगुडीचं वैभव प्राप्त होईल.. जर त्या इंग्रजीत जातील. नारायण इंग्रजीभाषी लेखक असले तरी तमिळ, कन्नडशीच त्यांचे मूळ भावबंध आहेत. भाषा कुठलीही असली तरी त्याचा पीळ सुटत नाही. नारायण यांच्या प्रारंभिक अकरा कादंबऱ्या हेन्री ग्रॅहम ग्रीन यांनी सलग वाचून म्हटलं होतं की, या कादंबऱ्यांमुळे मला मिळालेलं दुसरं घर म्हणजे भारत. तीच स्थिती मराठी वाचकांचीही. या कादंबऱ्या वाचून त्यांना कर्नाटक दुसरं घरं वाटलं तर नवल नाही.
१) ‘द बॅचलर ऑफ आर्ट्स’, अनुवाद : अशोक जैन, पृष्ठे – १६७, मूल्य – १६० रुपये.
२) ‘द इंग्लिश टीचर’ – अनुवाद- उल्का राऊत, पृष्ठे – २२४, मूल्य – १६० रुपये.
३) ‘मालगुडीचा नरभक्षक’, अनुवाद- सरोज देशपांडे, पृष्ठे – १८६, मूल्य – १६० रुपये.
४) ‘महात्म्याच्या प्रतीक्षेत’, अनुवाद- सरोज देशपांडे, पृष्ठे – १८७, मूल्य – १६० रुपये.
सर्व अनुवादांचे प्रकाशक- रोहन प्रकाशन, पुणे.