प्रवीण दशरथ बांदेकर – samwadpravin@gmail.com

May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Loksatta sanvidhan bhan Constitution Fundamental rights equal protection
संविधानभान: जनमते मानुस होत सब..
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

कवी आणि कादंबरीकार प्रवीण दशरथ बांदेकर हे मराठी साहित्यातलं एक आघाडीचं नाव. या पाक्षिक सदरात ते व्यक्त होणार आहेत.. भोवतालच्या व्यामिश्र घटना-घडामोडींबद्दल!

‘आकाच्या माडाला रोटा लागलाय. जगेल असं वाटत नाही रे!’ एका संध्याकाळी घरी गेल्या गेल्या बाबांनी माझ्या कानांवर घातलं होतं. बाबांच्या बोलण्यातला चिंतेचा सूर जाणवून मी चरकलो. माडाला रोटा लागला की उभा माड बघता बघता सुकत जातो, डोळ्यांदेखत मरून जातो, हे मला माहीत होतं. माडाचा जीवनरस पोखरून त्याचं अस्तित्व संपवणारी ही न दिसणारी अळी नष्ट करणंही कठीण असतं. त्यामुळेच बाबांचा जीव एवढा चुरचुरत होता. या माडाला आम्ही ‘आकाचा माड’ म्हणायचो. आका म्हणजे बाबांची थोरली बहीण. तिचं लग्न ठरल्यावर तिला आंदण दिलेला माड म्हणून हा ‘आकाचा माड’! आमच्याकडची ही एक जुनी प्रथा. लेकीचं लग्न ठरलं की माहेरच्या माडा- झाडांपैकी नारळाचं एखादं लागतं झाड तोंडी करारानं तिच्या नावे करायचं. लेक माहेरी आली की त्याचे नारळ तिच्या हवाली करायचे. याशिवाय लेक लग्नानंतर सासरी जातानाही  माडाचं एक रोपटं तिला दिलं जायचं. तिच्या संसारात माहेरचेही नारळ असावेत म्हणून. किंवा तसाच काही बरावाईट प्रसंग तिच्यावर गुदरला तर अडीअडचणीला तिचं म्हणून काहीतरी असावं असाही हेतू त्यामागे असू शकतो. काहीही असलं तरी एक खरं होतं.. लेक परक्या गावी- सासरी गेली तरी या नारळाच्या झाडांमुळे ती सासर आणि माहेरशी आपसूकच जोडलेली राहायची. सासरी असली तरी माहेरचं तिच्या हक्काचं एक झाड तिच्यासोबत असे. अनेकदा तर तेच तिच्या संसारातली सुखदु:खं निमूट ऐकून घेणारं- तिची माय, बहीण, सखी सगळं काही बनून गेलेलं असे. माहेरी आली की तिथल्या जिवाभावाच्या मैतरणींच्या गळ्यात पडून गाठीभेटी घ्यायला ती जितकी उत्सुक असायची, तितकीच या माडाची खबरबात घ्यायची ओढ तिला लागलेली असायची. माहेरून माघारी सासरला जाताना बाकी काही नेणं शक्य नाही झालं तरी हरकत नसायची; या माडाच्या नारळांची एक मोटली तरी तिला नक्की सोबत नेता यायची. साहजिकच सासरच्या मंडळींची वाकडी तोंडं बघायची नामुष्की टळायची.

झाडांशी असलेल्या बाईच्या या पारंपरिक नात्याला अनेक भावनिक नि मानसिक पदर असू शकतात. माझ्या या आकाआत्याचं बारा-तेराव्या वर्षी लग्न झालं होतं. पण लग्नानंतर दोनेक वर्षांतच विधवा झाल्यानंतर ती माहेरी येऊन राहिली होती. लग्नात तिला दिलेला माड तेव्हापासून कायमचाच तिचा सखासोबती होऊन गेला होता. ती म्हणायची, ‘मी बोललेलं त्याला कळतं. न बोललेलंही समजून घेतो तो.’ आत्या असं सांगू लागली की लहानपणी मला नवल वाटायचं. पण आत्याचं खरोखरच अजब नातं होतं त्याच्याशी. या माडाचे कोंबावलेले नारळ रुजवून तिनं अनेक कवाथे मोठे केले. घराच्या चारी दिशांना लावले. त्यांनाही तिनं जीव लावला होता. जणू त्या तिच्या माडाची ही नवी पिढी म्हणजेच तिची नातवंडं-पतवंडं होती. तिला कधीच लाभू न शकलेल्या सांसारिक प्रेमाची भरपाई कदाचित ती अशा प्रकारे करत असावी. रोटा लागलेला आत्याचा हा माड मरून गेला तेव्हा आत्यानं कित्येक दिवस अंथरुण धरलं होतं. पुढेही कितीतरी दिवस त्याच्या आठवणी काढून ती घरातलंच कुणीतरी गेल्यासारखी रडत असायची. आत्याचं त्या माडाशी जुळलेलं हे नातं आठवलं की आजही गलबलायला होतं.

आत्यासारखं आजीचंही परडय़ातल्या एका फणसाच्या झाडाशी भावनिक नातं होतं. आजीचं माहेर शिरोडय़ाजवळचं आरवली. लेखक जयवंत दळवींचं गाव. इथला वेतोबा प्रसिद्ध. वेतोबाचं प्राचीन मंदिर आहे तिथं. अलीकडे काही वर्षांपूर्वी तिथं नवी पंचधातूंची मूर्ती बसवली आहे. पण त्याआधीची जुनी मूर्ती फणसाच्या लाकडाची बनवलेली होती. वेतोबाच्या त्या भव्य मूर्तीसाठी वापरलेलं भलंमोठं फणसाचं झाड आमच्याच डोंगरातलं होतं. आजी हे काहीशा आस्थेवाईकपणे आल्या-गेलेल्याला ऐकवायची. त्यामुळेच की काय, आमच्या परडय़ात असलेल्या फणसाच्या झाडाविषयीही आजीला विशेष ममत्व वाटायचं. तो तिला तिच्या माहेरच्या देवाशी जोडणारा दुवा वाटत असावा. अनेकदा घरावर काही संकट आलं की पाठीमागच्या परडय़ात जाऊन ती त्या फणसाशी बोलायची, भांडायची, गाऱ्हाणं घालायची. तो फणस जणू तिच्यासाठी तिचा तारणहार वेतोबाच होता. तिच्या माहेरचं हक्काचं माणूस. आता विचार करताना मनात येतं- प्रेमाच्या, आपुलकीच्या दोन शब्दांनाही वंचित असलेल्या, क्वचित लैंगिक आणि मानसिक घुसमट सहन करणाऱ्या अशा कैक बायांसाठी त्यांच्या मनातलं ऐकून घेणारी, आधार देणारी आणि असं करताना कुणी कसला संशयही घेणार नाही अशी नाही तरी दुसरी कुठली व्यवस्था त्या काळात अस्तित्वात होती?

पण झाडांशी बोलणारी फक्त आत्या किंवा आजीच नव्हती. माझ्याच घरातली, आवाठातली, परिसरातली अशी अनेक माणसं मला माहीत आहेत. आजोबाही त्यांच्यापैकीच एक. माझ्या आजोबांना मी पाहिलं नव्हतं. माझ्या जन्माआधीच बारकंसं काय तरी निमित्त होऊन त्यांचा मृत्यू झालेला. कळायला लागल्यापासून मी त्यांच्याविषयीच्या खऱ्या-खोटय़ा कैक गजाली ऐकत आलो आहे. दशक्रोशीत भजनीबुवा म्हणून ते विख्यात होते. तुकोबाचे शेकडो अभंग त्यांना तोंडपाठ होते. पण भयंकर सणकी होते म्हणे ते. घरात, भावकीत फारसं कुणाशी त्यांचं पटत नसे. मग डोक्यात राख घालून कुठंतरी तोंड घेऊन जायचे. बऱ्याचदा घरापाठीमागच्या डोंगरातल्या गुहेत जाऊन बसायचे. या डोंगरात वाघबिळ आहे. म्हणजे एक लांबलचक गुहा. कधीकाळी तिथं वाघबिघ राहत होते असतील. आजोबा तिथं जाऊन बसत. डोंगरात भलीमोठी पुराणी झाडं. आज्याच्या काळातही ती होतीच असतील. तिथं गेलं की माझ्या डोक्यात हमखास येतं- या झाडांनी माझ्या आज्याला पाहिलं असावं. तो त्यांच्याशी बोलला असावा. आपलं सुखदु:ख त्यांना ऐकवत असताना ती सळसळली असतील. या गुहेच्या तोंडाशीच एक भलामोठा आंबा आहे. त्याचं वय किती असावं, नक्की सांगता नाही यायचं. पण मला खात्री आहे, आजोबाच काय, पण पणजोबांच्याही आधीपासून तो तिथं असला पाहिजे. डोकं सैरभैर झालं की अनेकदा मीही बाघबिळाच्या तोंडावरच्या या आंब्याला भेटायला जातो. त्याच्याशी गजाली मारतो. आपल्या कृती-उक्तीची चिरफाड करत जगाबरोबर स्वत:लाही चार शिव्या देतो. मन असं मोकळं केलं की खूप हलकं वाटतं. ही आपली मी माझ्यापुरती शोधून काढलेली कॅथॉर्सिस थिअरी.

पण हे सुखही आता फार काळ लाभेल असं वाटत नाही. ज्या वेगाने झाडं तोडली जातायत- वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी, हायवेसाठी, खाणींसाठी, होळीसाठी परंपरेच्या नावाखाली झाडं नष्ट केली जातायत- ते पाहता आपल्या पूर्वजांना भेटलेल्या, त्यांचे श्वास, त्यांचे आवाज आणि त्यांची कैक गुपितं उरीपोटी दडवून ठेवलेल्या या आपल्या सोयऱ्यांना भेटून दुधाची तहान ताकावर भागवणंही यापुढे अवघड होत जाणार आहे, अशी एक जाणीव सतत अस्वस्थ करू लागली आहे. लहानपणी कधी थोडा अगोचरपणा केला की आजी करवादायची, ‘उन्मत्त झालात काय रे मेल्यांनो? तुमकां सगळां आयतां मिळाला हां आता. आम्ही काय वनवास काढले तां आमचा आमकां म्हाईत. तेव्हा दुस्काळाच्या दिवसांत, लडाया-झगडय़ांत, उनापावसांत टिकान ऱ्हंवलंव आणि बीज राखलंव म्हणान् व्हयतें तुमच्ये गमजां चल्लेंहत..’ आज तर आम्ही उन्मत्तपणाच्या सगळ्याच मर्यादा पार करून कडेलोटाच्या टोकापर्यंत आलो आहोत. आजीच्या पिढीने प्रतिकूल परिस्थितीशी झगडून टिकवलेलं माणूसपणाच्या जातीचं बियाणं आम्ही आमच्याच हातानं नष्ट करू पाहतो आहोत. कोकणात काजऱ्याची झाडं गावोगाव आढळतात. त्याची फळं भयंकर कडू जहर. असं म्हणतात की, चुकून जरा जरी त्यांचा अंश पोटात गेला तरी माणूस असो की जनावर- तोंडात फेस येऊन, उलटय़ा होऊन तडफडून मरून जातात. पण अलीकडे काय चमत्कार झालाय कोण जाणे! काजऱ्याच्या फळांचं कडूपण कमी कमी होऊ लागलंय. पोटात मळमळतं, उलटय़ा होतात, पण माणसं मरतबिरत नाहीत. हे असं कसं, म्हणून आजीला विचारल्यावर म्हणाली असती, ‘अरे मेल्या, हल्लीच्या दिसांनी माण्साच जास्त कडू आणि विखारी झाली आसंत, त्येका आता काजरो तरी बापडो काय करतलो?’

आजीचं खरंही असू शकतं. माडाला आतून पोखरणारी ती अदृश्य कीड आजकाल माणसाच्याच मनाला डसली असेल तर संवेदनांचा जीवनरस आटत जाऊन मरून जाणं आता अटळ बनलं असावं!