देशभक्त गृहरचना संस्थेत काल आम्ही सर्व परत एकदा देशाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यासाठी जमलो होतो. नागरिकांमध्ये देशप्रेम कसे वाढवता येईल ह्य़ाचा ऊहापोह झाला. जाणते सभासद म्हणाले, देश म्हणजे देशाची भूमी, वास्तू. त्यावर प्रेम करा. माणसे काय- असतील, नसतील; देश तसाच राहील. तरुण सभासद म्हणाले, मुळात देशप्रेम म्हणजे देशाच्या नागरिकांवर प्रेम. विशेषत: महिला नागरिकांवर प्रेम. कारण तरुणीच आपली पुढली देशभक्त पिढी उत्पन्न करतात. त्यावर थोडा वादविवाद झाल्यावर काहींनी तत्काळ मधला मार्ग सुचवला, की तरुणींना घेऊन देशाच्या प्राचीन वास्तूंमध्ये जावे व प्रेम करावे! सभा अंतर्मुख झाली. काहीतरी गफलत होते आहे हे कळत होते; पण नक्की काय, ते समजत नव्हते. कारण वाक्यात घटक तर सर्व देशप्रेम व्यक्त करणारेच होते!
बाजूच्या विश्वशांती कॉलनीतसुद्धा सेमिनार भरले होते. देश, राज्य इत्यादींच्या सीमा पुसून पृथ्वी म्हणजेच एक देश करता येईल का, ह्य़ावर नकाशा विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करीत होते. देशच राहिले नाहीत तर शत्रुत्वच राहणार नाही व युद्धे होणार नाहीत, असे ठरले. त्याप्रमाणे त्यांनी विविध देशांना पत्रे लिहून एकाच पृथ्वीदेशात सामील होण्याचे आवाहन केले. पुढील पत्रव्यवहारात धर्माचा मुद्दा निघाला. देश गेले तर ठीक, पण धर्माचे काय? त्यावर पुरोगामी विश्वशांती कॉलनी म्हणाली की, धार्मिक स्वातंत्र्य राहू देत; पण अल्पसंख्याकांचे रक्षण झाले पाहिजे. आणि मग.. अचानक त्यांच्या लक्षात आले की, ह्य़ा नव्या पृथ्वीदेशात खिश्चन, मुस्लीम, बौद्ध हे बहुसंख्य होणार व हिंदू अल्पसंख्य होणार! म्हणजे आजवर ज्यांच्याविरोधात लढलो त्यांचा कैवार घ्यावा लागणार आणि इतरधर्मीयांच्या विरोधात आंदोलने करावी लागणार. जिथे गोवऱ्या वेचल्या तिथे कमळे वेचावी लागणार. मोठीच अडचण होणार.
त्यांची अशी अडचण झाल्याचे कळल्यावर आमच्या देशभक्त संस्थेने तात्काळ पृथ्वीदेश योजना उचलून धरली; आज कोणाला ‘अल्पसंख्य’ हे टायटल नकोय! अशा तऱ्हेने स्वत:च्या विचारांच्या विरुद्ध पवित्रे घेतले गेल्याने काही काळ दोन्ही सोसायटय़ांमध्ये गोंधळ उडाला. अखेर दोन्ही वसाहतींमधील जुन्या जाणत्यांनी तो विषयच बरखास्त केला. परत एकदा आम्ही देश व त्याबद्दलचे प्रेम ह्य़ा विषयाकडे आमचे आमचेच वळलो. आमच्या देशबांधवांचे स्पष्ट ठरले आहे की, राष्ट्रगीत, पुतळे, स्मारके, राष्ट्रध्वज इत्यादी गोष्टींचे कौतुक-सन्मान म्हणजे देशप्रेम. आता ध्वज आणि गीत काय, सर्वच पक्ष, धर्म, जाती वापरतात. त्या राष्ट्रप्रेमात तुमचे असे वेगळे वैशिष्टय़ राहत नाही. मात्र, पुतळे-स्मारके ह्य़ांचे तसे नसते.
कोणत्याही देशाच्या आयुष्यात काही महापुरुष होऊन गेलेले असतात. महास्त्रियाही होऊन गेलेल्या असतात. प्रथा अशी आहे की, जनता त्यांचे पुतळे उभारते व येता-जाता किंवा भेळ खाता खाता त्या पुतळ्यांकडे पाहून प्रेरित होते. नक्की काय प्रेरणा मिळते, यावर आमच्या सभेला नीट उत्तर सुचले नाही. पण कधी कधी पुतळ्याच्या आवेशानुसार त्याजवळच्या गाडीवर कधी तिखट मिसळ, तर कधी फालुदा ह्य़ांचा खप वाढतो. तेव्हा पुतळ्यांचा उपयोग देशभूक वाढण्यासाठी होतो, हे नक्की! शिवाय पक्षी ह्य़ा जमातीला एक आश्रयस्थान मिळते व आपली भूतदया दिसते, ते वेगळे. बऱ्याच वेळा आपल्या सहृदयतेचा गैरफायदा घेऊन ते त्या पुतळ्याचा वापर शारीरिक स्वच्छतेसाठी करतात. पण ज्या थोर लोकांनी देश स्वच्छ व्हावा म्हणून कष्ट उपसले त्यांचे पुतळेही त्यासाठी कामी आल्यास फार वाईट घडणार नाही असे आमचे मत पडले.
‘आधी केले, मग सांगितले’ ह्य़ा उक्तीप्रमाणे आम्ही अत्यंत वेगाने एका महापुरुषाचा पुतळा उभारला. वाजतगाजत त्याचे अनावरण झाले व जनतेचा दिनक्रम सुरू झाला. प्रथेप्रमाणे लवकरच कुणीतरी त्या पुतळ्याला चपलेचा हार घातला. लोकांनी ताबडतोब हातातली कामे बाजूला ठेवून वातावरण तणावपूर्ण केले. लवकरच दंगल झाली. ज्या दंगलखोरांना अटक झाली त्यापैकी एकाने मान्य केले की त्यानेच तो चपलाहार घातला होता. त्याची चौकशी करता असे कळले की त्याचे विविध मालाचे दुकान होते. दंगल झाली की सर्व बंद होत असे. त्याचा पडून राहिलेला माल मागील दाराने आणि उंची दराने तो विकत असे आणि बऱ्यापैकी नफा कमवत असे. शिवाय राजकीय पक्ष दंगलीत हात धुऊन घेत व पुढील निवडणुकीत योग्य ती मतविभागणी होऊन विविध पक्षांचे उमेदवार त्या त्या भागात निवडून येत. तर पुतळा ते दंगल अशी ही व्यवस्थित बसलेली घडी कोण विस्कटणार? म्हणून मग पोलीसही फार गुंतत नाहीत व काळाच्या ओघात सर्व विसरले जाते.
मात्र ह्य़ावेळी पुतळ्याचा अपमान करणाऱ्यानेच आमच्यावर केस ठोकली- की आमची चूक झाली! पाहा, ज्यांनी पुतळा उभारला ती माणसे कमी पडली म्हणण्यात त्या दंगलखोराला काहीच अन्यायाचे वाटले नाही. पण त्याने त्याचा मुद्दा ठासून सांगितला की, तो हार त्याने दंगलीच्या आधी एक महिना घातला होता. जवळजवळ महिनाभर कोणाचेच लक्ष नव्हते पुतळ्याकडे. म्हणून जी दंगल एक महिना आधी होऊन त्याला आधीच नफा व्हायचा, तो नफा एक महिना उशिरा झाला. पुरावा म्हणून त्याने छायाचित्रही दाखवले त्या रात्रीचे. त्यात स्पष्ट दिसत होते की, रात्री दहा वाजता तो माणूस पुतळ्याला चपलांचा हार घालत असता बाजूच्या विविध सोसायटय़ा व झोपडपट्टय़ांमधील जनता पुतळ्याभोवतीच्या गाडय़ांवर काय काय खात होती! लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने एक गाणेही गायले मोठय़ाने; पण तोंडांच्या ‘मचक मचक’ अशा आवाजात कोणाला ते ऐकू गेले नव्हते.
पुढे ती केस बरीच गाजली. पण शेवटी सामान्य जनता एक झाली. त्यांनी परस्परांना साहाय्य केले आणि एकमुखाने साक्ष दिली की, आम्ही सर्व त्या पुतळ्याभोवती खात होतो, कारण त्या महापुरुषाच्या पुतळ्याला आम्हाला दाखवून द्यायचे होते, की आता आपल्या देशात भूक नाही! ज्या गोष्टीसाठी ते लढले ती गोष्ट आपल्या कह्यत आली आहे हे पाहून त्या महापुरुषाला स्वर्गात कोण आनंद मिळाला असेल! त्या दंगलखोराला मोठी शिक्षा झाली. जनतेची शक्ती काय समजला तो समाजविघातक? जनता पेटून उठली की काहीही करू शकते.
आम्ही ह्य सर्व घटनेकडे खूप सकारात्मक दृष्टीने पाहतो. वरकरणी जरी ती आमच्या- म्हणजे सामान्य जनतेच्या विरोधात वाटली, तरी! शेवटी जनतेत एकी झाली ती ह्य घटनेनेच. जेव्हा जेव्हा समाजाला शांतिरूपी ग्लानी येते तेव्हा तेव्हा कुणीतरी एखाद्या पुतळ्याला घाण फासून जनतेत दंगल घडवतो! पुढे त्या दंगलीचे चळवळीत व चळवळीचे जागृतीत रूपांतर होते.
अस्मिता, भावना ह्य दोघी भगिनी आम्हाला फार प्रिय. एक वेळ खायला नसेल तरी चालेल, पण आपल्याला आपापल्या जाती-धर्माच्या महान माणसांची स्मारके मात्र हवीच असतात. स्वत:च्या प्राथमिक गरजांपलीकडे जाणे म्हणजे हेच ते! आजच्या मटेरियलिस्ट जगात, खाण्यापिण्यासाठी आसुसलेल्या, चंगळवादाने बोकाळलेल्या जगात असे आध्यात्मिक होणे खूप दुर्मीळ व सुखदायक आहे.
एखाद्या महापुरुषाचे स्मारक झाले की त्याच्या जातवाल्यांचा भावनिक विकास होतोच. हे अगदी सोपे गणित आहे. त्यामुळे एकूण समाजाच्या विकासासाठी काहीच विशेष व वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. फक्त स्मारके उभारावी लागतात. अर्थात त्याआधी जात आणि महापुरुष ह्यंच्या जोडय़ा जुळवाव्या लागतात, की काम संपले! कोणीही सत्तेवर असो, हे तक्ते त्या पक्षांकडे तयार असतातच. आणि त्याच तक्त्यांच्या आधारे राज्य केले जाते. इतकी सोपी पद्धत आपल्या जनतेनेच ठरवलेली असताना आमचे विरोधक त्याला का विरोध करतात कोणास ठाऊक? आपल्याकडे तर जो महापुरुषांचे पुतळे उभारतो तोसुद्धा महापुरुष बनतो! ही गोष्ट वेगळी, की त्या सर्व जुन्या महापुरुषांनी जिवंत असताना त्यांच्या आधीच्यांचे पुतळे उभारलेले नव्हते; तरीही ते महापुरुष कसे बनले, हे शोधून काढावयास हवे. कारण आमच्या बाजूच्या गल्लीतच सहा-सात महापुरुष व महास्त्रिया राहतात. त्यांनी इतरांच्या स्मारकाचे वाद काढून किंवा ते बांधण्याचे ठरवूनच ‘महा’ हे पद प्राप्त केले आहे.
अनेक महापुरुषांच्या स्मारकांचे वाद आज उकरून काढले जात आहेत. पण वादापेक्षा अधिक स्मारके मार्गी लागत आहेत ही चांगली गोष्ट आहे. आम्ही सिद्ध केलेच आहे की स्मारके, पुतळे समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असतात. त्यामुळे त्यांच्यावर हजारो कोटी खर्च व्हावे हे ओघाने आलेच. पण त्या हजारो कोटींच्या बदल्यात बऱ्याच गोष्टी मिळतातही, हे आमचे विरोधक विसरतात.
मुख्य म्हणजे शिल्पकाराला किंवा बांधकाम व्यावसायिकाला काम मिळते. म्हणजेच अनेक कामगारांनाही. त्यानंतर अंतर्गत सजावट करणाऱ्यांना काम मिळते. उत्कृष्ट प्रतीच्या वस्तूंनी ते स्मारक सजते. किंवा भव्य पुतळा बनतो- आजूबाजूच्या उद्यानासकट. राजकीय पक्षांना उद्घाटन वगैरेंचे काम मिळते. उद्घाटनापर्यंत खर्च दुप्पट झालेला असतो. नेमकी त्याच काळात लोकप्रतिनिधींच्या घरचीही सजावटीची, रंगाची कामे निघतात. काही तर नवीन घरे विकत घेतात. हा निव्वळ योगायोग! पुढे त्या घरांची कामे सामान्य माणसांनाच मिळतात. अशा तऱ्हेने मेलेल्या माणसाच्या एका पुतळा-स्मारकावर अनेक जिवंत माणसे गुजराण करतात! आणि विरोधक फक्त त्या पुतळ्याला झालेला खर्च घेऊन बसतात!
परेश मोकाशी lokrang@expressindia.com

शुद्धिपत्र- लेखाचे शीर्षक ‘स्मारक’ असे वाचावे. काय ही चूक छापणाऱ्यांची!