भाषेची मुळाक्षरे डोळ्यांनी, तर संगीताची मुळाक्षरे कानांनी वाचायची असे म्हटले जाते. रसिकतेने गीत ऐकण्यासाठी ‘कान तयार होणे’ ही संकल्पना प्रचलित आहे. जितके अधिकाधिक गाणे ऐकणे होत जाईल तसतसा कान ‘तयार’ होत जातो. भरपूर गाणे ऐका, पण डोळसपणे ऐका असेही म्हटले जाते. या म्हणण्यातही खूप मोठा अर्थ दडलेला आहे. खूप गाणे ऐकले की ते डोळसपणे ऐकण्याची स्थिती येते. त्यानंतर ऐकण्याचा क्षण हा बुद्धिप्रधान होतो. इतर गायकांचे गाणे ऐकणे व स्वत:चे गाणे ऐकणे या दोन्हीसाठी हे लागू आहे. भावगीत गायनाच्या प्रारंभीच्या काळात शास्त्रीय गायनाचा पगडा असलेली, शब्दप्रधान, सुमधुर चालीत स्वरबद्ध केलेली भावगीते ऐकायला मिळत. गायक-संगीतकार जी. एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांनी आपल्या समृद्ध गायकीने व गायनशैलीने भावगीताचा राजरस्ता निर्माण केला. गजाननराव वाटवे यांनी स्त्रीभावनेची गीते स्वत: तर गायलीच; शिवाय इतर गायिकांकडूनसुद्धा ती गाऊन घेतली. वाटवे यांची गायनशैली रसिकांनी पसंत पडली आणि त्यांच्या गायनमैफली यशस्वी होत गेल्या. त्यांनी एखादे नवे गीत स्वरबद्ध केले की ते आपण ऐकायला हवेच अशी उत्सुकता श्रोत्यांच्या मनात निर्माण होई. मग ते गीत ऐकल्यानंतर त्या गीताची रसिकांकडून पुन: पुन्हा मागणी होई. त्यावेळच्या  गायकांनी भावगीताशी समरस होऊन ते ऐकण्यासाठी श्रोत्यांचे ‘कान’ तयार केले. उत्तम गीत म्हणजे काय, याचा आदर्श त्यांनी घालून दिला. अशा तऱ्हेने अनेक गाणी येत राहिली व रसिक त्यांनी तृप्त होत राहिले. अनेक गायिकांनी संगीतकार गजानन वाटवे यांची गीते गायली आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे.. सरोज वेलिंगकर.

गायिका सरोज वेलिंगकर यांनी गायलेल्या आठ-दहा भावगीतांपैकी एका गीताने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. कवी मनमोहन नातू यांनी लिहिलेले हे गीत, वाटवेंची चाल आणि शब्द आहेत..

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
annual session of china s top political advisory body
सगळे आलबेल असल्याची बतावणी?
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”

‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला..’

नववधूला स्त्रीसुलभ भावनेमुळे मैत्रिणींच्या गराडय़ात पतीचे नाव घेताना वाटणारा लज्जायुक्त संकोच या गीतात आढळतो. ही संकोचाची भावना कवी मनमोहनांच्या शब्दांत पुरेपूर दिसून येते. या गीतातल्या नानाविध प्रश्नांतून ती अभिव्यक्त झाली आहे. ही नववधू शालीन आहे. सुसंस्कृत घरातली आहे. हे गाणे म्हणजे तिने मैत्रिणींशी केलेले हितगूजच आहे..

‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला

नका विचारू स्वारी कशी?

दिसे कशी अन् हासे कशी?

कसं पाडलं मला फशी?

कशी जाहले राजीखुशी?

नजीक येता मुहूर्तवेळा, काय बोललो पहिल्या भेटी

कसे रंगले स्वप्न पहाटी? कशी रंगली लाली ओठी?

कसा जाहला जीव खुळा? मैत्रिणींनो..

अर्थ उलगडे समरसतेचा, सुटे उखाणा संसाराचा

छंद लागला मजला त्यांचा,

धुंद बने बुलबुल जिवाचा

घरी यायची झाली वेळां, मैत्रिणींनो..’

या गीतातली गायिका व नायिका गाण्यामध्ये जेव्हा जेव्हा जेव्हा ‘नका विचारू..’ म्हणत प्रश्न विचारते तेव्हा तेव्हा ‘खरं म्हणजे विचारा’ हाच भाव त्यात लपलेला आहे. ‘कसे रंगले’ किंवा ‘कसा जाहला’ या प्रश्नांमध्येसुद्धा तिच्या मनीचे गूज तेच आहे. या ‘नाव’ घेण्यामध्येसुद्धा गंमत असते. नाव घेण्यासाठी आग्रह हा व्हावा लागतोच. नववधूची पतीचं नाव घेण्याची इच्छा असतेच. पण त्याकरताचा निकटवर्तीयांचा आग्रह ही पूर्वनियोजित अपरिहार्य क्रिया आहे. त्यामुळे त्या ‘नाव’ घेण्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. आणि मग तिने ‘नाव’ घेतल्यावर सर्वानाच अतिशय आनंद होतो. कधी कधी ‘ते’ फक्त नाव असते, तर कधी उखाण्यातले ‘नाव’ असते. या लज्जायुक्त संकोचाचेच कवी मनमोहन यांनी गाणे लिहिले आणि गजाननराव वाटवे यांनी ते स्वरबद्ध केले.

या गाण्याने भावगीतांमध्ये आणखी एका लोकप्रिय गीताची भर पडली. ठिकठिकाणी हे गीत आवर्जून वाजू लागले. अनेक गायिका हे गीत मैफलीत गाऊ लागल्या. हे गाणे ऐकताना त्यातल्या शब्दांमध्ये आपण गुंगून जातो. या गाण्यातील सुरुवातीचा म्युझिक पीस लक्षवेधी आहे. बऱ्याचदा ‘सुरुवातीचा म्युझिक पीस ऐका आणि गाणे ओळखा’ असे सांगितले जाते. या गाण्याच्या बाबतीत म्युझिक पीस सुरू होताक्षणी गाणे कोणते, हे समजते आणि आपण ते गाऊ लागतो. या गाण्याने गायिका सरोज वेलिंगकर हे नाव घराघरात पोहोचले. या गाण्यात अंतऱ्यासाठी फॉलो म्युझिक योजले आहे. तसेच अंतऱ्यामध्ये छोटे फीलर्स आहेत. संपूर्ण गीत झाल्यानंतर मुखडा पुन्हा गायला गेला आहे. सरोज वेलिंगकर यांनी कवी मनमोहन यांची आणखीनही दोन गीते गायली आहेत.

‘उंबरठय़ावर माप ठेविले

मी पायाने उलथूनी आले

आले तुझिया घरी कराया, तुझीच रे चाकरी।

माहेरची माया सोडूनी, इकडे आले स्वत: पाहूनी

दृष्टीच हो बावरी कराया, तुझीच रे चाकरी।’

आणि मनमोहन नातूंचेच दुसरे गीत..

‘सोन्याची अंगठी लिहायला, गव्हाच्या पातीला

नको नवे, माहेराचे नांव राहू दे, पतिदेवा हो२२२।’

कवी मनमोहनांची ही तिन्ही लग्नगीते सरोज वेलिंगकर या गायिकेनेच गायली. सासर-माहेरच्या भावनेत गुंतलेले श्रीनिवास खारकर यांचेही एक गीत वेलिंगकर यांनीच गायले आहे..

‘गाडीवान दादा

आज मला जायचे रे माझ्या माहेरा।

सोडायाचे घर आज पहिल्यानी

चटकन् डोळ्याला आलं रे पाणी

डोळे पुसायला आला

माहेराचा ओळखीचा वारा।’

या गीतांसह ‘डोलत डोलत गं..’, ‘आली दिवाळी..’, ‘चंचल श्याममुरारी..’, ‘कृष्णदर्शना मन आतुरले’  ही श्रीधर पार्सेकरांनी स्वरबद्ध केलेली गीते सरोज वेलिंगकर यांनीच गायली आहेत.

कवी मनमोहन यांचे पुस्तक वा पुस्तिकारूपाने प्रसिद्ध झालेले अनेक काव्यसंग्रह आहेत. त्यातले ‘ताई तेलीण’, ‘सुनीतगंगा’, ‘कॉलेजियन’, ‘शंखध्वनी’, ‘अफूच्या गोळ्या’, ‘दर्यातील खसखस’, ‘कुहू-कुहू’, ‘शिव शिल्पांजली’ हे संग्रह प्रसिद्ध आहेत. ‘दर्यातील खसखस’ या पुस्तकाचे प्रकाशक आर. बी. समुद्र लिहितात- ‘उदयोन्मुख कविपंचकात मनमोहन या तरुण व प्रतिभासंपन्न कवीचे स्थान फार वरचे आहे. आपल्या प्रखर बुद्धीने आणि विशिष्ट मनोवृत्तीने काव्यरचना करून त्यांनी प्रचलित काव्यपद्धतीला विजेचे धक्के दिले आहेत. त्यांच्याइतकी सुंदर प्रेमगीते मराठीत दुसऱ्या कोणत्याही कवीला लिहिता आली नाहीत.’ कवी ज. के. उपाध्ये यांना गुरुस्थानी मानणाऱ्या कवी मनमोहनांची कविता स्वतंत्र होती. त्यांच्या कविता तर उत्तम होत्याच; परंतु ध्वनिमुद्रिकांमधील भावगीतांतून त्यांना जास्त नाव मिळालं. वाटवे यांनी त्यांच्या काही कविता स्वरबद्ध केल्या आणि ती गाणी लोकप्रिय झाली. स्वत: वाटवे आपल्या स्वररचनांबद्दल म्हणतात, ‘स्वरांच्या कोलांटय़ा नाहीत, आशयावर कुरघोडी होईल अशी स्वररचना नाही.. अर्थ लोकांपर्यंत पोहोचवणं हा मूळ हेतू असल्यानं लोकांना सहज कळणारी चाल- यामुळेच रसिकांना माझं गाणं आवडलं असावं.’ यातूनच पुढे गजाननराव वाटवे आणि भावगीत हे समीकरण रूढ झालं.

गायिका सरोज वेलिंगकर यांच्या निवडक गीतांमध्ये ‘मैत्रिणींनो सांगू नका..’ या गीताची लोकप्रियता अफाट आहे. संगीतकार गजानन वाटवे यांच्या जन्मशताब्दी वर्षांत हे गीत आठवणे यापरता आनंद नाही.

गजानन वाटवे यांच्या ध्वनिमुद्रिकांवर कधी त्यांचे नाव असे, तर कधी ‘जी. जे. वाटवे’, तर कधी ‘वाटवे ऑफ पुणे’ असा उल्लेख केलेला असे. अमुक एक गायक किंवा गायिका कोठून आली आहे हे समजण्यासाठी अशी पद्धत तेव्हा रूढ झाली असावी. ‘वाटवे ऑफ पुणे’ या नावावरून अनेकांचे संदर्भ मिळाले. ‘बी. एम. दाभाडे ऑफ औंध, लक्ष्मीबाई ऑफ बडोदा, मेहबूबजान ऑफ सोलापूर, के. एच. वाकणकर ऑफ भोर, ताराजान ऑफ  गदग, श्यामाबाई ऑफ कोल्हापूर, डी. यू. कुलकर्णी ऑफ मोमिनाबाद, मिस गोहर ऑफ बिजापूर’ अशी नावे त्यावेळच्या ध्वनिमुद्रिकांवर दिसतात ती यामुळेच.

सरोज वेलिंगकर यांनी भावगीतांच्या दुनियेत आठ-दहा गीते तर नक्कीच गायली आहेत. त्याकाळी केवळ दोन-चार भावगीते गाणाऱ्या गायिकांनीसुद्धा आपला ठसा उमटवलेला दिसतो. ध्वनिमुद्रिकेतील गाणे एकदा का लोकप्रिय झाले की आपण विचारतोच- ‘कुणाचे गाणे? कोणी गायलंय?’ म्हणूनच ‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला’ या गाण्याने अनेक पिढय़ा बांधून ठेवल्या. कोणत्याही गीतातला भाव हा रसिकांच्याही मनातला असला की असं घडणारच.

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com