‘धागा’ या शब्दातच संगीत दडलेले आहे. पहिल्या अक्षरात तबल्याचा ‘धा’ आहे आणि दुसरे अक्षर ‘गा’ असे सांगते. तबल्यातला ‘धा’सुद्धा डग्ग्यावर ‘ग’ आणि चाटीवर ‘ना’ वाजवल्यानंतरच मिळतो. आणि सप्तकातल्या ‘ग’ या गंधार स्वराला ‘काना’ दिला तर तो ‘गा’ होतो. म्हणजे एक अक्षर तालाचे व दुसरे अक्षर सुराचे. एक तबल्यातील ‘मात्रा’ होते व दुसरे क्रियापद होते. विख्यात तबलिये व त्यांचे शिष्यगण जेव्हा तबल्यातील कायदे-रेले आपल्या मुखातून एका विशिष्ट लयीत बोलतात तेव्हा ते उत्तम गाणे वाटते. कारण त्यात सूरही असतो आणि लयसुद्धा असते. ते ऐकत राहावेसे वाटते.  नेमके सांगायचे म्हणजे हे सर्वजण तो ‘धा’ गातात. तालातील बोल-मात्रांची ती घट्ट अशी वीण असते. ताल कोणताही असो, तो थाट लाजवाब असा होतो. वाद्य आणि कलाकाराचा हात यांतून ही वीण निर्माण होते. आपण कलाकाराशी हस्तांदोलन करतो तेव्हा त्याच्या कलेला आणि त्याच्या गुरूला तो ‘नमस्कार’ असतो. कारण त्याच्या कारकीर्दीतला पहिला धागा हा त्याचा गुरू असतो. चित्रकाराची पहिली रेघ ही त्याची ओळख असते. गायक-गायिकासुद्धा शब्द-सुरांचा कॅनव्हास निर्माण करतात. मग त्यात आपल्या भावनेचे चित्र काढता येते. गीतकार व संगीतकारसुद्धा शब्द-सुरांचे धागे एकमेकांत गुंफत असतात. गाण्यामुळे गीतकार व वादक हे नाते निर्माण होते. तबल्यातील ‘धा’ हा सुरातील धैवताचा हात धरू शकतो. अशी विविधांगी वीण निर्माण करणारा विणकर कुठेतरी असतो. एका गीतामध्ये जनकवी पी. सावळाराम आपल्या मनातली ही भावना व्यक्त करतात. पंढरीचा विठ्ठल हाच तो विणकर आहे, असे ते सांगतात. म्हणूनच ते म्हणतात – ‘धागा धागा अखंड विणू या, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणू या..’

या देवाशी भक्तांचे सूर जुळायला वेळ लागत नाही. कुणी त्याला पांडुरंग, कुणी विठू, कुणी विठोबा, कुणी विठाई अशी साद घालतात. अगदी तो आपला जवळचा नातलग असावा तशी. आषाढी एकादशीला पंढरपुरास निघालेल्या वारकऱ्यांच्या भक्तिभावाची वीण थक्क करणारी असते. त्यांना ‘विठ्ठल’ या शब्दात ‘ठ’ या अक्षराला जोडलेला ‘ठ’ जन्मत:च समजलेला असतो..

parents stand when it comes to selecting modelling career for their children
चौकट मोडताना : कचाकड्याचे जग
Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!

‘धागा धागा अखंड विणू या

विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणू या।

अक्षांशाचे रेखांशाचे

उभे आडवे गुंफून धागे

विविध रंगी वसुंधरेचे

वस्त्र विणिले पांडुरंगे

विश्वंभर तो विणकर पहिला

कार्यारंभी नित्य स्मरू या।

करचरणांच्या मागावरती

मनामनाचे तंतू टाका

फेकून शेला अंगावरती

अर्धिउघडी लाज राखा

बंधुत्वाचा फिरवित चरखा

एकत्वाचे सूत्र धरू या।’

संगीतकार वसंत प्रभू यांनी या गाण्याची स्वररचना करताना शुद्ध धैवताच्या ‘बिभास’ रागातील स्वरांचा प्रामुख्याने वापर केला आहे. हार्मोनियमवर सहज बोटे फिरवून बघा.. ‘धागा’ या दोन अक्षरांसाठी ‘सा’ व ‘ध’ हे दोन स्वर आहेत. दुसरा शब्द ‘धागा’ यासाठी संगीतकाराने संगीतातल्या हरकतींची वीण गुंफली आहे. जसे दुसऱ्या ओळीतील ‘विठ्ठल’ या दुसऱ्या शब्दासाठी गुंफले आहे. मध्यम व शुद्ध निषाद हे स्वर वज्र्य आहेत, तर कोमल रिषभाचा रचनेमध्ये सणसणीत आधार दिसतो. त्यामुळेच संपूर्ण गाण्यात ‘बिभास’ रागाचा माहौल दिसतो. दुसऱ्या ओळीतील दुसऱ्या ‘विठ्ठल’ या शब्दाच्या स्वररचनेत कर्नाटकी गायकीचा बाज डोकावतो. अंतऱ्यामध्ये ‘विश्वंभर तो विणकर पहिला’ ही अफाट कल्पना संगीतकाराने खुबीने वरच्या सुरांवर ठेवली आहे. तेच स्वर ‘बंधुत्वाचा फिरवित चरखा’  या शब्दांसाठी आहेत. हे वसुंधरेचे वस्त्र असल्याने त्यात अक्षांश-रेखांशाचे धागे आहेत, या कविकल्पनेला सलाम! अक्षांश-रेखांश हे शब्द भूगोलाच्या शालेय पुस्तकाव्यतिरिक्त अन्य कोठेच मी यापूर्वी वाचले नाहीत. पी. सावळारामांनी हे शब्द गीतात आणून कमाल केली आहे. दुसऱ्या अंतऱ्यामध्ये कवी म्हणतात, हे वस्त्र विणले आहे ते करचरणांच्या मागावरती. माणसामाणसांतील नात्यांचे हे वस्त्र असल्यामुळे तो ‘माग’सुद्धा करचरणांचा आहे आणि त्यात मनामनाचे तंतू टाका, असे कवी सांगतो. म्हणजे तंतू जितके शुद्ध व सात्त्विक, तितकी वस्त्रामधील नात्याची वीण घट्ट, असा संदेश दिसतो. म्हणूनच हा चरखासुद्धा बंधुत्वाचा आहे. एकता-महानता हा आग्रह आहे, असे कवी सांगतात. या सर्वाचे कारण ‘विठ्ठल’ आहे. ‘विठ्ठल-विठ्ठल’ असे मुखाने म्हणताना भक्तिभावनेने भरलेले हे वस्त्र आपोआप विणले जाईल अशी त्यामागची भावना आहे. त्यासाठी हा धागा खंड न पडता.. म्हणजे अखंड विणावा, असा प्रामाणिक हट्टही आहे.

गीतकार पी. सावळाराम व संगीतकार वसंत प्रभू या जोडीच्या शेकडो लोकप्रिय गीतांपैकी हे एक गीत. हे गीत गाण्यासाठी गायिका आशा भोसले यांचा स्वर मिळावा हे आपले सर्वाचे भाग्यच. ‘अक्षांश-रेखांश, विश्वंभर, बंधुत्व, तंतू’ या शब्दांचे त्यांचे अप्रतिम उच्चार पुन:पुन्हा ऐकावे असे आहेत. तालाने सुरू होणारे हे गीत जेव्हा गायिकेच्या स्वरात येते तेव्हा ते कान देऊन ऐकावे अशी आपल्याला तीव्र इच्छा होते. बारकाईने ऐकल्यावर कळते, की हे गीत अतिमधुर हरकती व मुरक्यांसह रचले गेले आहे. वरवर साधे, सोपे वाटणारे हे गीत प्रत्यक्षात गायनातील विचार समजून गायले तरच गाता येईल. यातला आशा भोसले यांचा भावनेने ओथंबलेला रियाजी आवाज पुन:पुन्हा ऐकावा असे वाटते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे कवी पी. सावळाराम यांना एका पत्रात लिहितात : ‘‘आपल्या मधुर आणि सौंदर्यश्रीमंत काव्यामुळे आपणास कमीत कमी बारा वर्षे ओळखत होतो. श्री. ग. रा. कामत यांनी जेव्हा ‘हे श्री. पी. सावळाराम’ म्हणून आपला परिचय करून दिला तेव्हा तर मी अत्यंत कुतूहलाने आणि आदराने आपणाकडे बघतच राहिलो. ‘हे हे हे हे ते पी. सावळाराम? ज्यांची पद्यरचना आम्ही तृषार्त कानाने आणि अतृप्त मनाने ऐकतो.. ते.. ते हे पी. सावळाराम?’ असा भाव माझ्या मनामध्ये उचंबळून आला.’’

संगीतकार अशोक पत्की हे वसंत प्रभूंना गुरुस्थानी मानतात. ते सांगतात, ‘शास्त्रीय संगीत व भावगीत यांतील समन्वय वसंत प्रभू साधत असत.’

विठ्ठलभक्तीचे दर्शन घडवणारे याच त्रयीचे आणखी एक गीत आहे –

‘मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे

पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे।

धुंडीत शोधित सख्या पांडुरंगा

भक्ति होऊनिया आली चंद्रभागा

तीर्थ रोज घेता देव चरणांचे

उजळे पावित्र्य जिच्या जीवनाचे।

मायपित्याच्या प्रेमाचा पाईक

पंढरीला येता पुत्र पुंडलिक

वेड लागोनि त्या भक्तदर्शनाचे

विटेवरी उभे द्वैत विठ्ठलाचे।

आषाढीला होता वैष्णवांची दाटी

नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी

युगे अठ्ठावीस बाळ देवकीचे

जोजवीत जेथे पान पिंपळाचे।’

विठ्ठलभक्तीने रसरसलेले हे गीत. पंढरीच्या पांडुरंगासाठी उच्च प्रतीचा भक्तिभाव त्यात दिसतो. ‘भक्ति होऊनिया आली चंद्रभागा’ आणि ‘नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी’ या आनंद व्यक्त करणाऱ्या भावना आहेत.

‘धागा धागा..’ या गीतामागे एक छान आठवण आहे. आकाशवाणीच्या ‘भावसरगम’ या मासिक गीतांच्या कार्यक्रमासाठी एक गाणे हवे होते. ‘हातमाग दिन’ हे निमित्त होते. आकाशवाणीचे अधिकारी मधुसूदन कानेटकर यांनी पी. सावळारामांना त्यावर गीत लिहिण्यास सांगितले असता त्यांनी हे गीत लिहिले. काही अडचणींमुळे हे गीत आकाशवाणीवरून सादर झाले नाही. पुढे हेच गीत पी. सावळाराम यांनी एच. एम. व्ही.कडे दिले. खरे म्हणजे हातमाग हा तसा रूक्ष विषय. असे असूनही कवीने त्याला अध्यात्माची जोड दिली. अन् गाणे ध्वनिमुद्रित झाले.. घरोघरी गेले.

याच भावनेतील ‘मूर्त रूप जेथे..’, ‘कशाला जाऊ मी पंढरपुरी..’, ‘पंढरीनाथा, झडकरी आता..’ ही अजरामर गीते आहेत. विठ्ठलभक्तीसह या गीतांमध्ये विठ्ठलाला काही प्रश्न विचारले गेले आहेत, काही मागण्या केल्या गेल्या आहेत, काही प्रेमळ हट्ट आहेत, काही पुरावे आहेत. पण या सर्वातील समान धागा ‘विठ्ठल’ हाच आहे.

‘धागा’ या शब्दात संगीत दडले आहे हे खरेच. त्याचे खरे कारण ‘विठ्ठल’ या शब्दात दडलेले संगीत हे आहे. मग ‘विठ्ठल’ या शब्दाचा उच्चार करताना एकदा ऱ्हस्व ‘वि’ व नंतर त्याचा दीर्घ उच्चार असे चालते. त्यातली स्वरांची बांधणी महत्त्वाची आहे.

अठ्ठावीस युगे विटेवरी उभे राहून हा विठ्ठलरूपातील विश्वंभर विणकर कर कटीवर ठेवून मानवी नात्यांचे हे रेशमी बंध कसे विणतो, हे न उलगडणारे कोडे आहे.

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com