|| मकरंद देशपांडे

सर्जकाला प्रेरणा कुठून मिळते हे सांगणं कठीण आहे. अगदी तो स्वत:सुद्धा आपल्या रचनेचा अचूक/ नेमका एक बिंदू सांगू शकणार नाही. कारण रचना निर्माण करायला एकाहून अधिक कारणं किंवा प्रेरणास्थानं लागतात. पृथ्वीच्या रचनेसाठीसुद्धा सृष्टीकर्त्यांला पंचमहाभूते लागलीच की!

एक दिवस एक प्रेरणास्थान पृथ्वी थिएटरच्या आवारात आलं. त्यांचं वय साधारण सत्तरीतलं. संजना कपूरने पृथ्वी थिएटरच्या बाहेरच्या बंदिस्त जागेत आर्ट गॅलरी सुरू केली. त्याचे प्रमुख म्हणून आले तिलक राज. ते काय आहेत? कुठून आले? आर्ट गॅलरीचे प्रमुख का? नाटकवाल्या मकरंदशी त्यांचा काय संबंध? आणि आता ‘नाटकवाला’ या सदरातल्या लेखात त्यांचा उल्लेख का?

तिलक राज हे अतिशय उत्कृष्ट चित्रकार. पृथ्वी थिएटरला पृथ्वीराज कपूरांची नाटकाच्या पोस्टर्सची रेखाचित्र बनवून त्याचं एक प्रदर्शन आर्ट गॅलरीत लावलं. ते नेमके किती मोठे चित्रकार होते हे माहीत नव्हतं. म्हणजे त्यांच्याबद्दल सांगणारं कोणी भेटलं नाही, पण हळूहळू लक्षात आलं की जुने स्क्रीनप्ले लेखक प्रयागराज- जे पृथ्वी थिएटरवाल्या कंपनीच्या नाटकात अभिनय करायचे, त्यांचे हे स्नेही. म्हणजे फिल्म्सशी यांचा संबंध असावा.

तिलक राज हे फार मितभाषी. दुसऱ्याबद्दल फार बोलायचे नाहीत, तर स्वत:बद्दल स्वत:हून का बोलतील? मी नाटक लिहायला पृथ्वी थिएटरच्या आवारात बसायचो. हे सकाळी दहा वाजता यायचे. पृथ्वीच्या आवारातील बदामाच्या झाडाखाली उभे राहायचे- जे जे डोळ्यांना दिसेल ते सगळं पाहायचे. मग गॅलरीत एक चक्कर, मग नोटीसबोर्डवर नाटकाची लागलेली पोस्टर्स पाहायचे आणि कॅफेकडे वळायचे. एखादा चहा घ्यायचे. लिहिताना माझे लक्ष त्यांच्याकडे जायचे आणि ते काहीही संवाद न साधता, नजरेने इशारा न करता सांगायचे की, तू लिही!

एक दिवस त्यांनी एका छोटय़ा कागदाच्या तुकडय़ावर काढलेलं एक रेखाचित्र समोर ठेवलं. कॅफेमध्ये बसलेला मी (नाटक लिहिताना)- त्यानंतर आमच्यात संवाद सुरू झाला आणि मीसुद्धा त्यांना तेही पृथ्वीच्या आवारात आल्यावर काय काय करतात ते सांगितलं. त्यावर ते दिलखुलास हसले, कारण चित्रकार तिलक राज कॅफेला पाहत होते तेव्हा कॅफेतला एक लेखकही त्यांना पाहत होता. नाटककार आणि चित्रकारातला संवाद काही वर्षे चालला.

तिलक राज चित्रपटांची होर्डिग्ज् रंगवायचे. त्यांच्या बोलण्यातून जे कळलं त्यावरून वाटायचं की, ते साठ-सत्तरच्या दशकातले एक हिप्पी होते. शक्यतो फिरतीवर असायचे. मोठमोठय़ा अ‍ॅक्टर्सना त्यांच्या पात्रांचे स्केचेस बनवून द्यायचे. दिलीपकुमारकडेही ते राहिले होते. ते सगळ्यांचे असून कुणाचेच नव्हते. ते त्यांचे त्यांचे होते. आता त्यांच्यात तो वेडेपणा (एका जिनीअसचा) राहिला नव्हता, पण त्यांच्या विचारांना खाद्य लागायचं. दिवसातनं एखादा तासभर संवाद व्हायचाच. ज्यात देश-विदेशातलं नवं निर्माण किंवा जुन्या आठवणींना जोडणारा आजचा क्षण.. अशा गप्पा व्हायच्या. संवादाशेवटी ते विचारायचे, ‘‘मकरंद, नवीन काय लिहितोयस?’’ त्यांना नवीन नाटकाविषयी सांगितलं की म्हणायचे, ‘‘थॅंक्स, माय माईंड इज ट्रिगर्ड.’’ त्यांना त्या वयात विचारांना चालना हवी असायची. माणूस म्हातारा होतो, पण जुना होत नाही. तिलक राज त्याचं जिवंत उदाहरण.

माझ्या प्रत्येक नाटकाच्या फायनल ड्रेस रिहर्सलला ते यायचे. नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना पाहून त्यावर बोलायचे. क्रिटीसीझम हा शब्द कदाचित त्यांना माहीत नव्हता. ते फक्त काय चांगलं आहे आणि आणखीन काय चांगलं करता येईल याबद्दल बोलायचे. एका चित्रकाराच्या आखीव-रेखीव मुक्त विचारांच्या कॅनव्हासवर ते आपलं, पण माझ्या नाटकाचं चित्र मांडायचे. मला असं वाटायचं की मी किती नशीबवान आहे! ते मला म्हणायचे, ‘तुझ्या नाटकांनी मला जगण्याचा हुरूप येतो.’

एक दिवस त्यांना कॅन्सरचे निदान झाले. अशा कलाकाराला कॅन्सर म्हणजे वडाच्या झाडाला कीड लागण्यासारखं! पण मायेची आणि सवयीची सावली कमी झाली नाही किंवा हरवलीही नाही. फक्त त्यांचं पृथ्वीला येणं बंद झालं. संजय दधीचला मी म्हटलं, त्यांच्या घरी एक टीव्ही लाव. माझ्या घरचाच पाठवला. त्यांनी केबलवाल्याकडनं फक्त नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कवरी ही दोनच चॅनेल्स घेतली. त्यांना आणखीन काही माहिती नकोशी होती. त्यांना भेटणं कमी झालं, कारण आपलं कितीही प्रेम असलं तरी आपण आपल्या सवयी काही मोडत नाही आणि पृथ्वी सोडून मी कुठेही आणि कोणालाही भेटायला जात नसे. पण ते संजयला विचारायचे, ‘नवीन काय लिहितोय मकरंद?’

मी ‘सम्मान’ नावाचं नाटक लिहीत होतो. सन्मानाचा नेमका अधिकारी कोण? दोन राजांमधलं एक युद्ध. एका राजाचा सेनापती एका बाणाने मरतो आणि दुसरा राजा युद्ध जिंकतो. जेत्या राज्यात आता त्या वीराला सन्मान मिळणार असतो- ज्याच्या बाणाने सेनापती मेलेला असतो. पण त्या सन्मानावर तीन वीर आपला हक्क असल्याचं सांगतात. आता विजयी राजापुढे प्रश्न पडतो की, यांच्यामध्ये खरं कोण बोलतोय? तिघंही म्हणतात की आमचा घोडा त्याच्या रथासमोर आला. आधी आम्ही त्याचे घोडे मारले, मग सारथी मारला, मग सेनापतीला मारलं!

तिघांच्याही वीरकथा खऱ्या वाटणाऱ्या. सन्मान जिंकणाऱ्याचा विवाह राजकुमारीबरोबर होणार असतो आणि अर्ध राज्यही मिळणार असतं. आता हे कोडं सोडवायचं कसं? सगळ्या बाजुंनी विचार केला गेला, पण सत्य ठरवता येत नव्हतं. राजकुमारीचा तिघांशी विवाह करावा असा एक मार्ग होता, पण र्अध राज्य तिघांत वाटून घ्यायला तिघं तयार नव्हते.

राजकुमारीला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. ती विवाहास नकार देते. पण आता प्रजेसमोर आपण घोषित केलेला सन्मान द्यायलाच हवा असं राजाला वाटतं. शेवटचा उपाय म्हणून तो एका मांत्रिकाला बोलावतो. तो मांत्रिक मेलेल्या सेनापतीच्या भुताला बोलावतो. भूत येतं. त्याच्यासमोर तिघा वीरांना उभं केलं जातं आणि विचारलं जातं की- यातला कोण खरा लढला तुझ्याशी? कोणाच्या बाणाने तू मेलास? भूत फक्त हसतं, पण उत्तर देत नाही. कारण त्याला मरणोत्तर सूड घ्यायची संधी मिळालेली असते.

ही बातमी जेव्हा राजकुमारीला कळते तेव्हा ती वडिलांना सांगते की, मला त्या भुताला सत्य विचारू द्या. वडील मुलीचं म्हणणं ऐकतात. मांत्रिकाला पुन्हा बोलावून त्या भुताला या वेळी राजवाडय़ात बोलावलं जातं. राजकुमारीला पाहून भूत तिच्यावर मोहित होतं. ते हसत नाही हे बघून राजा मुलीला सांगतो की, ‘तूच विचार, सत्य काय आहे?’ राजकुमारीच्या प्रश्नावर भूत काहीच बोलत नाही. तेव्हा राजकुमारी म्हणते, ‘‘सेनापती, तू सत्य जाणतोस. तू खरा वीर आहेस, ज्यानं आपल्या राजासाठी युद्धात मानाने मरण पत्करलं. तू जर सत्य सांगितलंस तर माझ्या वडिलांनी घोषित केलेला सन्मान एका खऱ्या वीराला मिळेल. त्यामुळे प्रजेत आणि सन्यात राजावरचा विश्वास कायम राहील.’’ तेव्हा भूत विचारतं, ‘‘मला काय मिळणार?’’ त्यावर राजवाडय़ात स्मशानशांतता पसरते. राजा उत्तर देतो, ‘‘तुला पाहिजे ते.’’ भूत म्हणतं, ‘‘ मला राजकुमारी हवी.’’ राजा ओरडतो, ‘‘हे कसं शक्य आहे?’’

त्यावर राजकुमारी म्हणते ‘‘माझ्या मृत्यूनंतर शक्य आहे, पण आधी सत्य सांग.’’ भूत पटकन खरं सांगतो की- ‘‘मला त्या तिघांनी बाण मारले, पण तो जेव्हा रथातून खाली पडला तेव्हा मेलेल्या सनिकाच्या तलवारीनं त्याला मरण आलं.’’ भुताचं सत्य खरं नाहीये आणि तो सेनापती भूतच नाहीये असं तिघे वीर म्हणतात. राजा पेचात पडतो. भुताचं म्हणणं खरं मानावं तर आपल्या पोरीचं लग्न एका भुताशी करण्यासाठी तिला मारावं लागणार! राजकुमारी हा प्रश्न सोडवते. ती तलवारीनं स्वत:चं मुंडकं कापते! अंधार होतो. भूत ओरडते!! कारण त्याला मुंडकं कापलेली राजकुमारी नको असते.

हे नाटक मी तिलकांना ऐकवलं. त्यावेळी त्यांनी स्वत:ला तसं घरात बंद करून घेतलं होतं कारण त्यांची प्रकृती खूपच ढासळली होती. ते खूप बारीक झाले होते. ते मला म्हणाले, ‘‘थँक यू फॉर न्यू थॉट्स, माय माईंड इज वर्किंग, बट हेल्थ इज नॉट हेल्पिंग.’’

मी ‘सम्मान’ची तालीम सुरू केली. ते तब्येत खूपच खराब झाल्यामुळे आपल्या बहिणीकडे दिल्लीला गेले. इथे काही कारणास्तव तालीम थांबली. काही दिवसांनी कामांनी भरगच्च भरलेल्या दिवसांत मला तिलकांची आठवण आली. मी संजूकडे विचारपूस केली, कारण तो अधूनमधून फोन करायचा त्यांच्या बहिणीला. नेमक्या त्याच दिवशी बहिणीचा फोन आला होता की तिलक गेले. भरगच्च दिवसातनं जागा काढत त्यांनी आठवण करून दिली की मी जातोय!!

थँक यू तिलकजी! तुम्ही गेलात, पण तुमच्याबरोबर बोलून-ऐकून खूप काही मिळालं. आता तुम्ही जिथे असाल तिथे तुमच्यापर्यंत पोहोचलोच की. फक्त सॉरी, ‘सम्मान’ नाटक करायचं राहून गेलं. नंतर अलीकडे करावंसं वाटलं तेव्हा स्क्रिप्ट मिळालं नाही. खूप शोधलं, पण मिळालंच नाही. कुठेतरी हरवलं! पण आज त्यातलं खूपसं आठवलं कारण.. तुम्ही आठवलात..! असेच आठवत राहा, कारण तुमची आठवणसुद्धा एक प्रेरणाच आहे.

जय तिलक! जय प्रेरणास्थान!

जय नाटककार! जय चित्रकार!

mvd248@gmail.com