भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने कमालीचे नाराज झालेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमोर नमते घेत भाजपने ‘अडवाणींनीच त्यांना हवा तो मतदारसंघ निवडावा’ असा पर्याय त्यांच्यासमोर ठेवला. मात्र, मागील दाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत अडवाणींची समजूत काढण्यात पक्षाला यश आले व अडवाणींनी गांधीनगरमधूनच लढण्याची तयारी दाखवली. त्यामुळे भाजपने सुटकेचा निश्वास सोडला असला तरी, अडवाणी पक्षाच्या प्रचारात उतरणार नाहीत, असे संकेत त्यांच्या गोटातून मिळत आहेत.
नरेंद्र मोदींकडून ‘दगाफटका’ होण्याच्या भीतीने गुजरातमधील आपला पारंपरिक मतदारसंघ टाळून यंदा भोपाळमधून उमेदवारी द्यावी, असा आग्रह अडवाणींनी भाजपकडे धरला होता. मात्र, याला मोदींनी विरोध केल्यानंतर अडवाणींना गांधीनगरमधूनच उमेदवारी देण्याचे भाजपने जाहीर केले. यामुळे अडवाणी प्रचंड नाराज झाले होते. त्यामुळे बुधवारी रात्रीपासूनच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन त्यांची समजूत काढण्यास सुरुवात केली होती. खुद्द नरेंद्र मोदी यांनीही गुरुवारी अडवाणींची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही यश आले नाही. या पाश्र्वभूमीवर, चेन्नईत बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी अडवाणींना गांधीनगर किंवा भोपाळ यांपैकी एकाची निवड करण्याची मुभा असल्याचे संकेत दिले. ‘गुजरात प्रदेश भाजपने अडवाणींना गांधीनगरमधून उमेदवारी देण्याचा आग्रह धरला तर मध्य प्रदेश भाजपने अडवाणींसाठी भोपाळ मतदारसंघाचा आग्रह धरला होता. त्यामुळे मी यांपैकी एकाचा निर्णय घेण्याची जबाबदारी अडवाणींवर सोपवली आहे,’ असे राजनाथ म्हणाले.
भाजपने अडवाणींसमोर नमते घेतल्याचे वृत्त एकीकडे प्रसारमाध्यमांत झळकत असतानाच, भाजपने मागील दाराने अडवाणींना समजवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रयत्न चालवले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी अडवाणींशी चर्चा केली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या चर्चेत, ‘तुम्हाला गांधीनगरमधूनच लढावे लागेल,’ अशी ‘समज’ भागवत यांनी अडवाणींना दिल्याचे समजते. त्यानंतर अडवाणींनी गांधीनगरमधून लढण्याचे मान्य केले. मात्र, पक्षात डावलले गेल्याची भावना कायम असल्याने अडवाणी निवडणुकीत प्रचारापासून लांब राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.