सोशल मिडियातून प्रचाराची तयारी
सोशल मीडीयाच्या जबरदस्त प्रभावामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने आता या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली असून लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याआधीच विधानसभाही काबीज करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
विधानसभाजिंकण्यासाठी ‘सोशल मीडीया सेकंड इनिंग’ ची सुरूवात करण्यात आली असून त्यांच्या सुकाणू समितीच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची शनिवारी प्रदेश कार्यालयात बैठकही झाली. सोशल मीडीयाचा एवढा प्रभावी वापर लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रथमच करण्यात आला. त्याचा खूपच राजकीय फायदा होतो आणि लोकांपर्यंत कमी खर्चात अतिशय जलदपणे पोचता येते व परिणामकारक संवाद साधता येतो, हे दिसून आले. ज्येष्ठ नागरिकांची संगणकाशी फारशी मैत्री नसते. त्यांना नवीन तंत्रज्ञान शिकणे थोडे कठीण वाटते. त्यासाठी सोशल मीडीयाचे गावागावातील कार्यकर्ते आता पुढाकार घेणार आहेत. ‘मॉनिंग वॉक’ ला जाणारे ज्येष्ठ नागरिक, बगीचे, उद्याने येथे पार पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन भेटीगाठी व बैठका येथे जाऊन भाजपचे कार्यकर्ते आजी-आजोबांशी संवाद साधणार आहेत. त्यांना संगणकाचा वापर कसा करायचा हे दाखवून ई-मेल, फेसबुक खाती उघडून दिली जातील. छोटय़ा गावांमधील तरूणांशी सोशल मीडीयाच्या माध्यमातून बऱ्यापैकी संपर्क प्रस्थापित झाला आहे. मात्र त्या तुलनेत मुलींकडून याचा वापर कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता त्यांनाही संगणक साक्षर करून सोशल मीडीयाच्या संपर्क कक्षेत आणले जाईल.  भाजपबद्दल जवळीक निर्माण करण्यासाठी राज्यभरातील सुमारे एक कोटी मोबाईलधारकांची ‘डेटा बँक’ तयार करण्यात येत आहे. पुढील काळात त्यांच्याशी संपर्क साधला जाईल. भाजपच्या सोशल मीडीयाचे राज्यभरात सुमारे साडेतीन-चार हजार कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून पुढील चार महिन्यांत लाखो कुटुंबांपर्यंत पोचण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

विधानसभेच्या निवडणुका चार-पाच महिन्यांनी पार पडणार असून त्याची तयारी भाजपच्या सोशल मीडीया विभागाने लगेच सुरू केली आहे.
-श्रीकांत भारतीय ,भाजप नेते