महिला, मागासवर्गाच्या प्रतिनिधींना प्रतिनिधित्व देत चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आंध्र प्रदेशच्या १९ जणांच्या मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्षाच्या दोघा जणांसह तीन महिला आणि मागासवर्गातील सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. येथून जवळच असलेल्या नागार्जुन नगरात हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. नव्या मंत्रिमंडळापैकी दोघांचा अपवाद वगळता १७ जणांनी तेलगू भाषेत शपथ घेतली.
सहकार्याचे आश्वासन
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना शुभेच्छा देत असतानाच, ‘आंध्र प्रदेश राज्याला सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल’, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. तसेच, नायडू यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि विकासाप्रति असलेल्या बांधीलकीचा राज्यास निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती
या शपथविधी सोहळ्यास ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, गुजरात, पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, ओदिशा आणि गोवा या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. मात्र,तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष वाय.एस. जगनमोहन रेड्डी अनुपस्थित राहिले.
आंध्रला केंद्राचे आर्थिक साहाय्य
विभाजनामुळे आंध्र प्रदेशासमोर वित्तीय संकट उभे राहिले आहे. त्यामुळे राज्यास सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही केंद्रीय संसदीय कामकाज आणि नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली.