भारतात रांगेत उभे राहण्यापेक्षा रांगा मोडण्याचीच सवय अधिक. त्यातून एकदा मंत्रिपद मिळाले की रांगेत उभे राहण्याची सवय मोडणे हे ओघाने आलेच. शिवाय अशी रांग मोडल्याबद्दल एखाद्या मंत्र्यालाच देशाच्या जनतेकडून चार शब्द सुनावले जाण्याची शक्यताही तशी दुरापास्तच. मात्र मावळते केंद्रीय मंत्री आणि अभिनेते चिरंजीवी यांच्यावर असे खडे बोल ऐकण्याची वेळ आली. रांगत उभे न राहता मतदानासाठी पुढे येऊ पाहणाऱ्या चिरंजीवी यांना एका तरुण मतदाराने रांगेत उभे राहण्यास फर्मावले आणि केंद्रीय मंत्र्यांना माघार घ्यावी लागली.
झाले असे की, चिरंजीवी आपल्या कुटुंबीयांसह मतदान करण्यासाठी आले. त्या वेळी मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांग होती. अशा वेळी रांगेत उभे न राहता चिरंजीवी यांनी थेट मतदानाच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या एका नवमतदाराने मात्र, त्यांचा निषेध केला. ‘आम्ही येथे दीड-दीड तास रांगेत उभे आहोत. मतदानासाठी रांगेत उभे राहण्यास तुम्हाला काय होते, आजच्या दिवशी तरी विशेष वागणुकीची अपेक्षा ठेवू नका’, अशा कठोर शब्दांत या तरुणाने चिरंजीवींना फटकारले. त्यावर ‘हा कठोर अन्याय आहे’, अशा भावना एका ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केल्या.
यानंतर मात्र, चिरंजीवी यांनी सपशेल माघार घेत रांगेत जाऊन उभे राहणेच पसंत केले. कायदेभंग करण्याची इच्छा नव्हती असेही त्यांनी सांगितले.