07 July 2020

News Flash

काँग्रेस शंभरीही गाठणार नाही

काँग्रेसला १६ मेनंतर १०० जागाही टिकवणे कठीण होणार आहे. आणीबाणीनंतर प्रथमच असे होणार आहे. पराभव समोर दिसत असल्याने गर्भगळीत झालेल्या काँग्रेसने त्यामुळेच आता विकासाच्या मुद्दय़ाला

| April 28, 2014 12:36 pm

काँग्रेसला १६ मेनंतर १०० जागाही टिकवणे कठीण होणार आहे. आणीबाणीनंतर प्रथमच असे होणार आहे. पराभव समोर दिसत असल्याने गर्भगळीत झालेल्या काँग्रेसने त्यामुळेच आता विकासाच्या मुद्दय़ाला बगल देत निधर्मीवादाचा बुरखा पांघरायला सुरुवात केली आहे. आपले अपयश झाकण्यासाठीच ते त्याचा पुरेपूर वापर करत आहेत, अशा कठोर शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या धोरणांवर टीका केली. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी हा घणाघात केला आहे.
काँग्रेसने सातत्याने मोदींच्या गुजरात ‘प्रारूपा’चा बागुलबुवा मतदारांसमोर उभा करण्यास सुरुवात केली आहे. मोदी पंतप्रधानपदी आल्यास निधर्मीवादाला थारा उरणार नसल्याची टीकाही काँग्रेसच्या गोटातून होत आहे. या सगळ्याचा समाचार मोदींनी या मुलाखतीत घेतला. ‘भारतासमोर असलेल्या प्रत्येक समस्येवर माझ्याकडे उपाय आहे, असा दावा मी कधीच केलेला नाही; किंबहुना लोकांची तशी अपेक्षाही नाही. आज लोकांना चमत्काराची नकोय तर स्थिर, निर्णय घेण्याची क्षमता असणारे आणि संवेदनशील सरकार त्यांना हवे आहे. आणि म्हणूनच आम्ही एकही अवाजवी घोषणा केलेली नाही’, असे मोदी यांनी सांगितले.
प्रियंका यांनी मोदींवर केलेल्या टीकेबाबत मोदी यांना मुलाखतीत विचारणा करण्यात आली. ‘एका कन्येला आपल्या आईचा बचाव करण्याचा आणि एका बहिणीला आपल्या भावाची पाठराखण करण्याचा पूर्ण हक्क आहे, आपल्याला त्यात काहीही वावगे वाटत नाही’, असे उत्तर मोदी यांनी त्यावर दिले. मात्र त्याचवेळी सत्तेवर आलो म्हणजे सुडाचे राजकारण करणार नाही, गेल्या दहा वर्षांचे उट्टे काढण्यासाठी रॉबर्ट वढरा यांना गिऱ्हाईक केले जाणार नाही, असे आश्वासनही मोदी यांनी दिले. व्यक्ती कोणीही असो, सर्वाना कायद्यासमोर समान पद्धतीनेच वागवले जाईल आणि गुन्हेगारांना कायद्याने आखून दिलेल्या चौकटींच्या अधीन राहूनच शिक्षा केल्या जातील, असेही ते म्हणाले.
माया, ममता यांचे सहकार्यही हवेच..
सरकार स्थापनेसाठी मायावती, ममता बॅनर्जी आणि जयललिता यांचे सहकार्य घेणार का, या प्रश्नाचे उत्तर देताना, ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सध्या २५ हून अधिक घटक पक्ष आहेत. आणि लोकसभेत सत्तास्थापनेसाठी आवश्यक ती किमान सदस्य संख्या आम्ही निश्चित गाठू’, असे मोदींनी स्पष्ट केले.
तेच खरे असुरक्षित..
देशातील मुस्लीम तुमच्या राजवटीत सुरक्षित भावनेने जगू शकतील का, या प्रश्नास उत्तर देताना ‘ज्यांना मुस्लिमांच्या मतांचे राजकारण करायचे आहे, अशा राजकीय पक्षांच्या झोपाच मोदींच्या राजवटीत उडतील. मुस्लिमांना कोणताही त्रास होणार नाही. आम्ही १२५ कोटी भारतीयांच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत, असे मोदी म्हणाले.
मोदी उवाच
*मागास मुस्लिमांना
अन्य मागास वर्गात आरक्षण देण्याचा काँग्रेसचा निर्णय चुकीचाच.
*अदानी आणि टाटा यांना आपल्याकडून विशेष सवलती नाहीत.
*सरकारच्या कामगिरीविषयी नाराजीमुळे यंदा ‘ध्रुवीकरण’.
*देशातून भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कालबद्ध कार्यक्रम.
*गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या लोकप्रतिनिधींविरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवणार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2014 12:36 pm

Web Title: congress wont reach 100 seats
Next Stories
1 भाजपची अवस्था गोंधळलेल्या उंदरासारखी – प्रियंका
2 ‘वढेरा मॉडेल’ म्हणजे बेकायदेशीर विकासास चालना
3 मतदार यादीतील घोळाचा ठपका ठेवल्यास आंदोलन
Just Now!
X