तेलंगणमधील निजामाबाद मतदारसंघ चर्चेत आहे तो तेलंगण राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता यांच्या उमेदवारीने. तेलंगण जागृती या सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनेच्या ३५ वर्षीय कविता संस्थापक आहेत. विशेष म्हणजे तेलंगणातील १७ लोकसभा मतदारसंघांपैकी त्या एकमेव महिला उमेदवार आहेत. तेलंगणा राज्यनिर्मितीसाठी चंद्रशेखर राव यांनी संघर्ष केल्याने प्रचाराचा केंद्रबिंदूही तोच आहे. कविता यांचा सामना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि या मतदारसंघातून हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात असलेल्या मधु याश्की गौड यांच्याशी आहे. तेलुगू देशमशी आघाडी केलेल्या भाजपने आमदार लक्ष्मीनारायणन यांना संधी दिली आहे. निजामाबाद आणि करिमनगर या दोन जिल्ह्य़ांचा मिळून हा मतदारसंघ आहे. १७ लाख मतदार असलेल्या निजामाबाद मतदारसंघात तीन ते चार लाख मुस्लीम मते आहेत. आतापर्यंत मुस्लिमांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मात्र या वेळी काही प्रमाणात मुस्लीम तेलंगण राष्ट्र समितीकडे झुकले आहेत. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. उत्तम वक्तृत्व, शिवाय चंद्रशेखर राव यांनी कन्या असल्याने  कविता यांना प्रचारात लाभ मिळत आहे.

 कविता राव  
*तेलंगणनिर्मिती श्रेय मिळणार असल्याने फायदा
*लोकसभेत काँग्रेस व विधानसभेत भाजप प्रतिनिधी असल्याने टीआरएसला संधी देण्याची मानसिकता
*काँग्रेसने स्वतंत्र तेलंगणनिर्मिती केल्याचा प्रचार
*घराणेशाहीचा आरोप, शिवाय काँग्रेस उमेदवार पक्षातील आघाडीचा नेता

मधु याश्की गौड
*तेलंगणनिर्मितीचे श्रेय केंद्रातील सत्ताधारी म्हणून काँग्रेसला मिळण्याचा प्रभावी मुद्दा
*राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र तेलंगणसाठी पाठपुरावा केल्याचा फायदा
*दोन वेळा खासदार राहिल्याने प्रस्थापित विरोधातील नाराजी,
*तेलंगण राष्ट्र समिती-काँग्रेस निवडणूक आघाडी न झाल्याचा फटका