२००४ मध्ये इंडिया शायनिंग घोषणा देत भाजपने पुन्हा सत्तेत येण्याची वातावरणनिर्मिती केली होती. त्याचप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला अतिआत्मविश्वास नडेल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
मोठा गाजावाजा करून भाजपने वातावरणनिर्मिती केली असली तरी, बहुमताच्या आसपास तो पक्ष जाईल अशी शक्यता वाटत नसल्याचे पवारांनी सांगितले. मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने प्रचाराची राळ उडवून दिलेली असताना काँग्रेसने अधिक आक्रमक व्हायला हवे अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. निवडणूक निकालानंतर आपल्याला स्थैर्याची चिंता आहे. १९९६ मध्ये ज्या पद्धतीने भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, त्यांचे सरकारही केवळ १३ दिवस टिकले तशीच आताही स्थिती होण्याची भीती असल्याचे पवार म्हणाले. देशात मोदीलाट असल्याचा दावाही पवारांनी फेटाळला. वाजपेयींसारखे उत्तुंग नेतृत्व असतानादेखील २००४ मध्ये भाजप पराभूत झाला होता. ‘फिल गुड’ आणि ‘इंडिया शायनिंग’ या भाजपच्या घोषणा हवेत विरल्या आणि मनमोहन सिंग पंतप्रधान  कसे झाले हे भाजपला समजलेही नाही असा टोलाही लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस देशभरात ३१ जागा लढवत आहे, त्यामुळे त्या बळावर पंतप्रधान होण्याचे स्वप्न आपण पाहत नाही हे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. मोदींमध्ये पंतप्रधानपदाची क्षमता आहे काय? असे विचारता, एखाद्या व्यक्तीबाबत बोलणे योग्य नाही, मात्र आपण मोदींची कार्यपद्धती पाहिलेली आहे, त्यांच्यात पंतप्रधानपदाचे गुण आहेत काय याबाबत साशंक असल्याचे उत्तर पवारांनी दिले. केंद्रात काँग्रेस आणि भाजपला वगळून सरकारच्या शक्यतेबाबत आपल्याला शंका आहे.
अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव कितपत पडेल हे सांगता येत नाही. मात्र एक गोष्ट निश्चित, अनेक ठिकाणी टोप्या घातलेले लोक दिसतात अशी टिप्पणी केली. निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतल्यावर संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय साधणे आवडेल असे एका उत्तरात सांगितले.

एखाद्या व्यक्तीला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करून प्रचार होतो हे या निवडणुकीचे वैशिष्टय़ असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांची भाषणेही चित्रवाणीवरून घरबसल्या पाहायला मिळत असल्याने पंतप्रधानाचे हे उमेदवार भाग्यवान आहेत अशी कोपरखळी त्यांनी मारली. अनेक पंतप्रधानांच्या वाटय़ाला हे भाग्य आले नाही असे पवार म्हणाले.