उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये दंगलग्रस्त भागात बदला घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाला(भाजप) मतदान करण्याचे आवाहन करणारे भाजप नेते अमित शहा अडचणीत आले आहेत. शहा यांनी मुझफ्फरनगर बद्दल केलेल्या भाषणा संदर्भात निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मुझफ्फरनगर भागात झालेल्या दंगलीचा बदला घ्यायचा असेल कर भाजपला मतदान करा, असे आवाहन अमित शहा यांनी जाट समाजाच्या लोकांना केले होते. यावर काँग्रेस आणि समाजवादी पक्षांसह अनेकांनी आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने शहा यांच्या भाषणचा व्हिडिओ पाहून त्यांना कारणे द्या नोटीस बजावली आहे. तुम्ही केलेल्या भाषणावरून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये? याचे उत्तर येत्या तीन दिवसांत द्यावे असे निवडणूक आयोगाने शहा यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच तीन दिवसांत स्पष्टीकरण न आल्यास कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना न देता पुढील निर्णय घेण्यात येईल असेही आयोगाने म्हटले आहे.