शेवटची मतदानाची फेरी राहिली आहे. प्रचाराला उग्र स्वरूप आलंय. प्रचार टिपेला पोहोचलाय. शाब्दिक तलवारी एकमेकांवर आदळून कर्कश आवाज करताहेत. मुद्यांची जागा गुद्यांनी घेतलीय. शेवटच्या षटकातली फटकेबाजी सुरू झाली आहे.
या सर्व रणकंदनात एक गोष्ट लख्ख वेगळेपणाने जाणवतेय. मनावर धडकतेय. ती म्हणजे नरेंद्र मोदींनी भारताच्या राजकीय प्रथम परिवाराच्या तंबूत शिरून जी पळापळ घडवून आणलीये. गांधी परिवार मोदींच्या थेट आक्रमणाने पुरता सुन्न झालाय. या परिवाराला अशाप्रकारच्या थेट क्षेपणास्त्र हल्ल्याची कधीच सवय नव्हती. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये मुख्य भूमिका निभावणाऱ्या नेहरूंच्या पुढील पिढय़ा भारत म्हणजे आपण आणि आपण म्हणजे भारत या स्वप्नरंजनात कायम रममाण होत्या आणि आहेत. भारतातील प्रत्येक व्यक्तीस आपल्याविषयी पूज्यभाव असलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह. त्यांच्या भोवतालचे वलय असे की निवडणूक काळातदेखील त्यांच्याबद्दल कोणी प्रतिकूल मत मांडले तर ते ईश्वरनिंदेइतके भयंकर समजले जाते.
अशा परिवाराच्या मक्तेदारीविरुद्ध मोदींनी असा शंखनाद केला की जनता स्तिमित झाली. गांधी घराण्यामुळे काँग्रेस एकसंध राहात असेलही, पण आज भारतात असे कोटय़वधी लोक आहेत की ज्यांना मनापासून वाटते की भारतात अनेक हुशार, सुज्ञ लोक आहेत ज्यांची गुणवत्ता कितीतरी अधिक आहे. आज भारतात असे करोडो लोक आहेत ज्यांना वाटते, की १२५ कोटींच्या देशात एवढी काय टंचाई आली की इटलीच्या वंशाच्या व्यक्तीने या देशाची कुंडली ठरवावी. या खदखदीस आतापर्यंत कोणी वाट करून दिली नव्हती. तो बोळा मोदींनी काढला आणि पाणी वाहते केले. गांधी परिवार म्हणजे ईश्वराचे दूत नाहीत. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा अत्यंत दु:खद मृत्यू झाला, पण त्या मृत्यूचे भांडवल करून काँग्रेसवाले जनतेला भावनावश करत असतात. या भांडवलामुळे केंद्र सरकारचे घोटाळे, आदर्श प्रकरण आणि इतर अनेक गोष्टी कार्पेटखाली ढकलता येतात. बिचाऱ्या मनमोहन सिंगांना मौनी बाबा बनवून सरकारमधल्या बाहुल्यांच्या दोऱ्या कोणाच्या हातात होत्या, हे समजायला मोठा बुद्धय़ांक गरजेचा नाही.
क्रिकेटमध्ये जरी दुसऱ्या टीमला चितपट करायला कॅप्टनला लक्ष्य केले जाते तसे मोदींनी ठरवून गांधी परिवाराला सळो की पळो केले. त्यामुळे काँग्रेसजन बॅटिंगला जायच्या आधीच आऊट होऊन बसले आहेत. गांधी परिवाराने दहा वर्षे रिमोट कंट्रोलने सरकार चालवले. अनियंत्रित सत्ता भोगली. हे पटवून दिल्यावर गेल्या फेऱ्यांच्या मतदानानंतर मोदींनी ‘माँ-बेटे की सरकार गई’ हा अत्यंत मनोवेधक नारा लावला. सोनिया गांधींच्या नियंत्रणावर टीका करत राहुल गांधींचा अननुभव विनोदी शैलीत मांडायला सुरुवात केली. त्याला काँग्रेसने उत्तर शोधेपर्यंत मोदींनी जिजाजींचा वार केला. आता काँग्रेसला कळेना, आधी स्वयंपाकघरातली आग विझवावी की हॉलमधली. प्रियंका गांधींना काँग्रेसने धावा करून बोलावले, पण निकाल बराचसा ठरल्यानंतर प्रियंका गांधींनीदेखील आमच्या परिवाराला अपमानित केले जात आहे वगैरे ठेवणीतली अस्त्रे काढली, पण आता लोकांचा मूड ते ऐकायला तयार नाही.
लोकांनी मोदींचे आक्रमण मान्य केले त्याला काही कारणे आहेत. एक म्हणजे मोदींची पार्श्वभूमी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाच्या भूमिकेत गावोगावी, वस्ती-वाडय़ात भटकून देशाची सामाजिक घडण जाणणारा हा फकीर माणूस आहे. वैयक्तिक फायद्यातोटय़ाच्या क्षुल्लक आणि फालतू हेतूपासून हजारो मैल दूर. त्यांच्या मातोश्री आणि इतर परिवार सदस्य कसे जीवन जगतात ते सर्वानी पाहिले आहे. बारा वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत त्यांनी गुजरातमध्ये सर्वस्तरीय विकासाचे धोरण यशस्वी करून दाखवले. मजुरापासून कारखानदारापर्यंत सर्वाच्या डोळय़ांना विकास दिसला. जीवनमानात बदल झाल्याचे लक्षात आले. विकास आणि राज्य चालवण्याची हातोटी या दोन्ही बाबतीत त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यांच्या या निर्विवाद पार्श्वभूमीमुळे जनतेने त्यांना स्वीकारले आहे. त्यांच्या पन्नास वर्षांच्या व्रतस्थ कारकीर्दीपुढे गांधी परिवाराची पाटी साफ कोरी आहे. लोखंडाचे चणे पचवलेला हा कष्टाळू माणूस राजकीय नभात उजळून दिसतो आहे.

– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)