दोनदा मतदानाचा सल्ला विनोदाने दिला होता. त्यातून आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे.
दोनदा मतदानाचा सल्ला दिल्याबद्दल निवडणूक आयोगाने पवार यांना नोटीस बजावली होती. पवार यांनी खुलाशाचे दोन पानी पत्र निवडणूक आयोगाला सादर केले. भारतीय राज्यघटनेत मतदानाचा हक्क एकदाच बजाविण्याची तरतूद आहे. लोकांनी मतदानाचा अधिकार बजवला पाहिजे या उद्देशाने मी तसे विधान केले होते. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात केवळ विनोदाने व मिश्किलपणे दोनदा मतदानाबद्दलचे विधान केले होते. निवडणूक आयोग किंवा यंत्रणेचा अनादर करण्याचा आपला उद्देश नव्हता. या विधानाने निवडणूक आयोगाला मनस्ताप झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे पवार यांनी खुलाशात म्हटल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2014 3:22 am