लोकसभा उमेदवार मतदान पद्धतीने निवडण्याच्या राहुल गांधी यांचा प्रयोग वर्धा मतदारसंघात कितपत यशस्वी झाला, असा प्रश्न कार्यकर्तेच विचारू लागले आहेत. कारण मतांसाठी मोठय़ा प्रमाणावर पैशांचा पाऊस पडल्याची चर्चा असून, खासदार दत्ता मेघे यांचे पूत्र सागर यांनी या निवडणुकीत रविवारी बाजी मारली.
सागर मेघे यांनी माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांची कन्या चारुलता टोकस यांचा ४६ मतांनी पराभव केला. १३०३ मतदार असलेल्या या निवडणुकीत मेघे यांना ६०० तर टोकस यांना ५५४ मते मिळाली. पक्षांतर्गत निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी राहुल गांधी यांच्याकडेही करण्यात आल्या. मेघे यांनी पुत्राच्या विजयासाठी सारी यंत्रणा कामाला लावली होती. मतदारांना चांगला ‘भाव’ देण्यात आल्याची चर्चा आहे. मेघे यांच्या साम्राज्याला आव्हान देणे कठीण असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.  मतदान पद्धतीने उमेदवार निवडण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयावर पक्षातूनत टीका केली जात होती. अगदी दत्ता मेघे यांनीही वर्धा मतदारसंघात निवडणूक घेऊ नये, अशी मागणी केली होती. मतांसाठी झालेले आर्थिक व्यवहार लक्षात घेता राहुल गांधी यांचा प्रयोग कितपत यशस्वी झाला, असा प्रश्न नेतेमंडळीच उपस्थित करू लागले आहेत. लातूर मतदारसंघात गुरुवारी मतदान होणार आहे.