दिल्ली सरकारची प्रत्येक फाईल मान्यतेसाठी सोनिया गांधी यांच्याकडे पाठवली जात होती, असा गंभीर आरोप झाल्यानंतरही सोनिया अजून गप्प का आहेत? रिमोट कंट्रोलने सरकार चालवले जाते हे आतापर्यंत माहिती होते; पण रिमोटच केंद्र सरकार चालवत होता हे आता सिद्धच झाले आहे, असा हल्ला चढवत नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत तीनशेहून अधिक कमळे पाठवून, असले कमजोर सरकार हटवा, असे आवाहन पुणेकरांना शनिवारी केले.
पुणे शहर व जिल्ह्य़ातील महायुतीच्या चार उमेदवारांसाठी येथील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत मोदी यांनी सोनिया, राहुल, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, शीला दीक्षित आणि काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांना लक्ष्य केले. मोदी यांनी राहुल यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख वारंवार ‘शहजादा’ असाच केला. पन्नास मिनिटांच्या सविस्तर भाषणाच्या अखेरीस तुम्हाला महायुतीच्याच उमेदवारांना विजयी करायचे आहे, असेही आवाहन त्यांनी आवर्जून केले.
एका पुस्तकाच्या प्रकाशनामुळे सर्वात मोठे सत्य काल उघडकीस आले, असे सांगून पंतप्रधान कार्यालयात डॉ. मनमोहन सिंग यांनी नियुक्त केलेल्या संजय बारु यांच्या पुस्तकाचा संदर्भ मोदी यांनी दिला. बारु यांचे नाव न घेता मोदी म्हणाले की, या पुस्तकात असा गंभीर आरोप करण्यात आला आहे की मंत्र्यांच्या नेमणुका, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बदल्या यासह केंद्र सरकारच्या सर्व निर्णयांच्या फाईल सोनियांकडून मंजूर केल्या जात असत. त्यामुळे रिमोट कंट्रोलच केंद्र सरकार चालवत होते हे सिद्ध झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय राहुल यांनी पत्रकार परिषदेत फाडून टाकला. पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा यांनी संपवली म्हणूनच अशी हिंमत ते करू शकले.
 अन्न सुरक्षा, शिक्षण हक्क, माहिती अधिकार हे कायदे आम्ही आणले असे राहुल गांधी यांच्याकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र या कायद्यांचा नागरिकांना काहीही लाभ झालेला नाही. भूक लागली आहे कायदा केलाय, गावात शाळा नाही कायदा केलाय, अशिक्षित आहेस कायदा केलाय, शाळेत मास्तर येत नाही कायदा केलाय अशी परिस्थिती असल्याचे सांगून मोदी यांनी तुमचा माहिती अधिकार आणि अन्य अनेक कायदे जम्मू काश्मीरमध्ये लागू होतात का, अशी विचारणा केली. वास्तविक, अन्न सुरक्षेचा हक्क, शिक्षणाचा हक्क आदी अनेक अधिकार व हक्क घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच आम्हाला मिळाले आहेत. त्यात काँग्रेसने काही देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले. देशातील सर्वसामान्यांचा लुटलेला पैसा आणि काळा पैसा परदेशी बँकांमध्ये ठेवण्यात आला आहे, तो या देशात परत आलाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.