विधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थिती बदलू शकते, पण त्यासाठी लोकोपयोगी महत्त्वाचे निर्णय तात्काळ घेतले जावेत, असा सल्ला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पाश्र्वभूमीवर पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणती भूमिका घेता येईल याबाबत चर्चा केली. तत्पूर्वी, पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांशी गप्पा मारताना पुढील काळात सरकारला काही ठोस निर्णय घ्यावेच लागतील, असे मत व्यक्त केले. अन्यथा केंद्राप्रमाणेच राज्यातही विरोधात बसण्याची तयारी ठेवावी लागेल, असा धोक्याचा इशाराही दिला. केंद्रातील यूपीए सरकारने कल्याणकारी अनेक योजना तयार केल्या, पण या योजनांची अंमलबजावणी योग्यपणे झाली नाही. २ जी, राष्ट्रकूल आणि कोळसा खाणींचे वाटप यावरून झालेल्या आरोपांमुळेही सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झाला.
विधानसभा निवडणुकांपूर्वी निर्णय घेण्यास अजूनही कालावधी आहे. या काळात राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावल्यास त्याचा निश्चितच विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो.
१९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यात जनता पक्षाला विधानसभासंघ निहाय आघाडी मिळाली होती. पण नंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसलाच बहुमत मिळाले होते याकडे पवार यांनी लक्ष वेधले. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस राज्यातील कामगिरीबाबत पक्षाच्या नेत्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे.