भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी वाराणसीत दाखल झालेल्या आपच्या अरविंद केजरीवाल यांना अनेक ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागले. मंगळवारी येथील काळभैरव आणि काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर पक्षाच्या प्रचार मिरवणुकीत सामील झालेल्या केजरीवाल यांच्यावर शाई फेकण्यात आली, तसेच त्यांच्या गाडीवर अंडीही फेकण्यात आल्याची तक्रार आप कार्यकर्त्यांनी केली आहे.
सकाळी वाराणसीत दाखल झालेल्या केजरीवाल यांनी प्रथम गंगेत स्नान केले. त्यानंतर काशीविश्वेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. तेथून बाहेर पडलेल्या केजरीवाल यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी अंडे फेकल्याची तक्रार आपच्या कार्यकर्त्यांनी केली. मात्र असा कोणताही प्रकार समोर आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तर वाराणसी येथे मिरवणुकीदरम्यान केजरीवाल आणि त्यांच्यासोबत असलेले पक्षाचे उत्तर प्रदेशचे प्रमुख संजय सिंग आणि दिल्लीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी शाई फेकली.
काही तासांतच शाई फेकणाऱ्याची ओळख पटली असून त्याचे नाव अंबरिश आहे. तो ‘हिंदू वाहिनी सेने’चा सदस्य असल्याचे समजते. पोलिसांनी त्याला लगेचच ताब्यात घेतले. मिरवणुकीदरम्यान अनेक ठिकाणी केजरीवाल यांना काळे झेंडे दाखवण्यात आले तसेच आप विरोधी घोषणाही देण्यात आल्या.
दरम्यान, केजरीवाल यांनी वाराणसीतून निवडणूक लढण्याची घोषणा मंगळवारी केली. आणि त्यानुसार प्रचारही सुरू केला आह़े यामुळे वाराणतीत आता मोदी विरूद्ध केजरीवाल अशी लढत रंगणार आहे. येथील सभेत केजरीवाल यांनी मोदींना खुल्या चर्चेचे आव्हान दिल़े
भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
अरविंद केजरीवाल मंगळवारी सकाळी शिवगंगा एक्स्प्रेसने वाराणसीत दाखल झाले. त्या वेळी अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल परत जा, केजरीवाल मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. केजरीवाल यांनी पक्षाच्या मिरवणुकीत भाग घेतला. त्या वेळी अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध प्रदर्शन केले. तर आपच्या कार्यकर्त्यांनी मोदी विरोधी घोषणाही दिल्या. या वेळी काही ठिकाणी भाजप आणि आपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली.