विधानसभा निवडणुका घोषित होण्यापूर्वीच शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या खडाखडीच्या पाश्र्वभूमीवर ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. तसेच उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर घातलेल्या र्निबधाच्या पाश्र्वभूमीवर उद्धव यांनी हिंदूच्या देवांवरील गंडांतर कदापि सहन केले जाणार नाही, हे सण जल्लोषातच साजरे होतील, असेही ठणकावून सांगितले.
मार्मिक साप्ताहिकाचा ५४ वा वर्धापनदिन सोहळा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या वेळी आपल्या भाषणात ठाकरे यांनी दहिहंडीवरील र्निबधावर टीकास्त्र सोडले. हिंदूंचे सण काय हातपाय बांधून साजरे करायचे का, असे सवाल त्यांनी केला. एवढे र्निबध लादले गेले असताना गर्व से कहो हम हिंदू है, असे काय उगाचच म्हणायचे आणि तसे झाले तर हिंदू म्हणून जगायला आम्ही लायक नाही, असेही ते म्हणाले.
उत्सवातील चुका आणि गैरप्रकाराचे कधीच समर्थन करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सणांमध्ये होत असलेले गैरप्रकार दूर केलेच पाहिजेत. गणेशोत्सवातील बिभत्स नाचाचे कधीही समर्थन होणार नाही. हे प्रकार बंद झाले आहेत. दहीहंडीतही लहान मुलांचा वापर आणि अधिक उंचीचे थर यावरील र्निबध योग्यच आहेत. पण उत्सवांवर बंदी घातली जाणार असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दिवाळीत फटाक्यांवर निर्बध आणले जातात. संक्रांतीमध्ये पतंगोत्सव होतो, तेव्हा मांज्यामुळे पक्षी जखमी होतात, असे कारण दिले जाते. मग उद्या मांज्याशिवाय पतंग उडवा, असे आदेश काढले जातील. असे कायम हिंदूंच्याच सणांवर र्निबध कसे आणले जातात, असा सवाल त्यांनी केला.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्ववादाबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत उद्धव म्हणाले की हिंदुस्थानात राहतो तो हिंदू, असे शिवसेनाप्रमुख नेहमीच म्हणत असत.
 उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असे शिवसेना नेते वारंवार सांगत आहेत. तर आज ठाकरे यांनीही शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, अशी ग्वाही या कार्यक्रमात दिली.