लक्षवेधी लढती
बिहारमधील ऐतिहासिक पाटलीपुत्र मतदारसंघ चर्चेत आहे तो लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मिसा भारती यांच्या उमेदवारीने. आणीबाणीच्या कालखंडात लालूप्रसाद अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली (मिसा) कारागृहात असताना जन्म झाल्याने कन्येचे नाव लालूंनी मिसा भारती ठेवले. चारा घोटाळ्यामुळे लालूप्रसाद आपोआप निवडणुकीच्या रिंगणाबाहेर गेले. त्यामुळे ३९ वर्षीय मिसा भारती यांनी उमेदवारी मिळवली. गेल्या वेळी याच मतदारसंघातून संयुक्त जनता दलाच्या रंजन प्रसाद यादव यांनी लालूप्रसादांना २३००० मतांनी हरवले होते. मात्र या वेळी रंजनप्रसाद यांच्या बरोबरच मिसा भारतींची झुंज रामकृपाल यादव यांच्याशी आहे. रामकृपाल हे खरे तर लालूंचे निकटवर्तीय. त्यांच्या समवेत राष्ट्रीय जनता दल उभा केला. मात्र लालूंनी उमेदवारी मुलीला दिल्याने संतापलेल्या रामकृपाल यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारीही मिळवली. १७ तारखेला येथे मतदान होणार आहे. मिसा भारतींचा प्रचार उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांचे पती शैलेश कुमार यांनी सांभाळला. लालूंनी मुलीसाठी गेल्या दहा दिवसांत २० वेळा या मतदारसंघाचा दौरा केला आहे.
मिसा भारती
* लालूंची कन्या असल्याने घराण्याचा फायदा
* भाजप-जनता दल युती तुटल्याचा फायदा
* अल्पसंख्याक मते मिळण्याची अपेक्षा
* नवमतदारांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा
कच्चे दुवे
* घराणेशाहीचा शिक्का बसल्याने अडचण
* प्रतिस्पध्र्याच्या तुलनेत राजकारणात नवीन
* बिहारमध्ये मोदी लाटेच्या प्रभावाचा फटका शक्य

रामकृपाल यादव
*यापूर्वी खासदार असल्याने मतदारसंघाची माहिती
* लालूप्रसादांनी अन्याय केल्याची भावना
* मोदींच्या प्रभावाचा फायदा मिळण्याची अपेक्षा
* लालूंच्या कार्यपद्धतीची माहिती असल्याचा फायदा
कच्चे दुवे
* पक्षांतर केल्याचा शिक्का
* आयारामांना उमेदवारी दिल्याने भाजप कार्यकर्ते नाराज
* जनता दलाशी युती तुटल्याने फटका बसण्याची चिन्हे