आर्थिक सुधारणा केल्या म्हणून ज्या व्यक्तीवर देशाने भरभरून प्रेम केलं तीच व्यक्ती पंतप्रधानपदावरून पायउतार होताना मात्र लोकांचे मत संपूर्णपणे त्यांच्या विरोधात गेले, ही बाब क्लेषकारक आहे, असे उद्गार माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कन्या दामन सिंग यांनी काढले. ‘स्ट्रिक्टली पर्सनल : मनमोहन अँड गुरुशरण’ या आपल्या आईवडिलांच्या जीवनावर दामन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर बोलताना, माझे बाबा अर्थमंत्री असताना प्रसारमाध्यमे अधिक जबाबदार होती आणि विषयाचे गांभीर्य त्यांना कळत होते. मात्र आता परिस्थिती वेगळी होती. म्हणूनच त्यांनी आत्मचरित्र लिहावं, असं मला मनापासून वाटतं, असेही दामन सिंग म्हणाल्या.
डॉ. मनमोहन सिंग आत्मचरित्र लिहिताहेत का, या प्रश्नाचे उत्तर देताना, कदाचित लिहीत असावेत. मला माहिती नाही. पण सध्या जो उठतो तो पुस्तक लिहितो, मग त्यांच्यासारख्या अनुभवी माणसाने पुस्तक का लिहू नये, असा सवाल दामन यांनी केला.
माझे बाबा निधडय़ा छातीचे आहेत, पण माझी आई हळवी आहे. पंतप्रधान म्हणून त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेमुळे माझी आई हळवी झाली होती. त्या टीकेमुळे माझ्या आईला प्रचंड मानसिक वेदनांचा सामना करावा लागला, असे दामन यांनी सांगितले.
मग पंतप्रधानपदाविषयी त्यांना तिरस्कार वाटतो का, या प्रश्नाचे उत्तर देताना हा खूपच कठोर शब्द आहे. माझे आई-बाबा अशी भाषा वापरत नाहीत, असे दामन म्हणाल्या. लालकृष्ण अडवाणींसारख्या नेत्याने आपल्या वडिलांची ‘सर्वात दुर्बळ पंतप्रधान’ अशा शब्दात केलेली संभावना सुरुवातीला हृदयावर ओरखडे आणणारी ठरली, मात्र वारंवार असा उल्लेख होऊ लागल्यानंतर त्याची तीव्रता आपोआप कमी झाली, असे त्या म्हणाल्या.