काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या खर्चावरून पुन्हा एकदा भाजप आणि त्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या प्रचारासाठी काही बडय़ा उद्योगपतींनी पैशांच्या थैल्या रिकाम्या केल्याचा आरोप गांधी यांनी केला. प्रचाराच्या निधीचा स्रोत काय, याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणीही गांधी यांनी केली.
भाजप दोन-तीन कंपन्यांच्या जोरावर राजकारण करते, कारण या कंपन्या त्यांना भरपूर पैसे पुरवितात. मोठी पोस्टर्स आणि कटआऊट यांच्यासाठी पैसे कोठून येतात, असा सवालही राहुल गांधी यांनी केला. अमेठी मतदारसंघात ते प्रचार करीत होते.
मोदी यांची मोठी पोस्टर्स लावण्यासाठी पैसे कोठून येतात याची विचारणा भाजपकडे करा, हे मोदी यांचे पैसे आहेत का, असे आवाहन राहुल गांधी यांनी जनतेला केले. गरिबांना मनरेगा आणि अन्नसुरक्षा योजनेद्वारे पैसे मोफत का वाटले जातात, असा भाजप आम्हाला सवाल करते. मात्र गरिबांना मोफत पैसे दिले जात नाहीत, त्यांच्याकडून काम करून घेऊन त्याचा मोबदला दिला जातो, मोफत पैसा अदानीला दिला जातो, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
आपला कोणत्याही उद्योगसमूहाला विरोध नाही, परंतु कायदा आणि नियमांचे पालन करून त्यांना सवलती दिल्या पाहिजेत, गुजरातमध्ये अदानी समूहाला सुविधा मिळतात, गरिबांना नाही, असा आरोपही या वेळी त्यांनी केला.

तिसरी आघाडी नाहीच..
काँग्रेस मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसऱ्या आघाडीला पाठिंबा देणार, असे विधान प्रकाश करात यांनी काल केले होते. मात्र काँग्रेसचा असा कोणताही विचार नाही. आणि तिसऱ्या आघाडीला पाठिंबा देणार नाही, असे राहुल म्हणाले.