राज ठाकरेंच्या भेटीमुळे टीकेचे धनी व्हावे लागलेल्या नितीन गडकरींना पूर्व विदर्भात ‘झटका’ देण्याची रणनीती शिवसेनेच्या वर्तुळात आखली जात असून सध्या सेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपच्या उमेदवारांशी पुकारलेला असहकार याच रणनीतीचा भाग असल्याची चर्चा  सुरू झाली आहे. गडकरी यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरून गडकरींवर टीकासुद्धा केली होती. या भेटीमुळे अस्वस्थ असलेल्या शिवसेनेने आता लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू होताच भाजपला हात दाखवायला सुरुवात केली आहे. विदर्भातील यशाच्या बळावर राजकारण करणाऱ्या नितीन गडकरींना त्यांच्याच गडात झटका देण्याचे धोरण आता सेनेच्या वर्तुळात आखले जात आहे. पूर्व विदर्भात रामटेकचा अपवादवगळता इतर जागांवर भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना सेनेच्या स्थानिक नेत्यांकडून सहकार्य मिळत नसल्याचे चित्र सध्या या भागात आहे. चंद्रपूर व गडचिरोली या दोन मतदारसंघातील सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या उमेदवारांवर उघडपणे टीका करणे सुरू केले आहे. नागपुरातसुद्धा सेनेचे पदाधिकारी गडकरींना सहकार्य करण्याऐवजी रामटेकचा रस्ता धरत असल्याचे चित्र आहे. या संदर्भात सेनेच्या वर्तुळात विचारणा केली असता वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसारच हे असहकाराचे धोरण राबवण्यात येत असल्याचे एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.