पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल जद(यू)च्या चार आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा निर्णय १२ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. या बंडखोर आमदारांवर नोटिसा बजावण्यात आल्या असून त्याला उत्तर देण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांना अधिक मुदतवाढ दिली आहे. ग्यानेंद्रसिंग ग्यानू यांच्यासह रवींद्र राय, नीरजसिंग बबलू आणि राहुलकुमार या आमदारांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यांनी शनिवारी स्वतंत्रपणे विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांची भेट घेतली.बिहार विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून, नोटिशीला उत्तर देण्यासाठी अधिवेशन संपेपर्यंत वेळ द्यावा, अशी मागणी या आमदारांनी चौधरी यांच्याकडे केली.
दिग्विजय सिंग यांचा उपोषणाचा इशारा
भोपाळ:नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत मिळत नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग ७ जुलैपासून गुणा जिल्ह्य़ाच्या मुख्यालयात एक आठवडा उपोषणाला बसणार आहेत.
गारपीट आणि पुराचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळत नाही, त्याचप्रमाणे सोयाबीन बी-बियाणे आणि खतेही मिळत नाहीत, असे आपण गुणाच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे, असे दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे. पीक विमा योजनेची देयके द्यावीत, खतांचा काळाबाजार थांबवावा, अशा मागण्या करून काँग्रेसच्या नेत्यांनी अन्य प्रश्नही उपस्थित केले आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिग्विजय सिंग यांनी दिला आहे.
तेलंगणमधील सर्व खासदारांची
बैठक आयोजित करा -दत्तात्रय
हैदराबाद:तेलंगणचे विविध प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्याने त्याबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व खासदारांची बैठक त्वरित आयोजित करावी, अशी मागणी सिकंदराबाद येथील भाजप खासदार बंडारू दत्तात्रेय यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. सदर बैठक आयोजित करून चर्चा केल्यास आणि त्याबाबत एक अहवाल तयार केल्यास हे प्रश्न संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणे अधिक सुलभ होईल. सर्व खासदारांनी आपले पक्षीय मतभेद विसरून केवळ तेलंगणाच्या विकासासाठी संसदेत आवाज उठवावा, असे आवाहनही दत्तात्रेय यांनी केले आहे.

गोळ्या घालण्याची आणि बलात्कार करण्याची भाषा करणारे खासदार तपस पाल यांची तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी केली पाहिजे. अशा प्रकरणात कोणताही माफीनामा स्वीकारला जाऊ नये. लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची त्यांची योग्यता नाही. महिलांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन विकृत आहे. ममता बॅनर्जी यांनी पाल यांच्यावर कारवाई केली नाही तर त्यांना जनाधार गमवावा लागेल.
-अमरसिंग, राष्ट्रीय लोकमंच पक्षाचे नेते.

झारखंड प्रदेश काँग्रेस समितीमध्ये लोकशाही राहिलेली नाही, त्यामुळे आपण पक्षत्याग करीत आहोत. भविष्यातील योजनांबाबत आपण पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर निर्णय घेऊ. आपण पक्षाचा राजीनामा झारखंड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुखदेव भगत यांच्याकडे पाठविला आहे.
-राधाकृष्ण किशोर, झारखंडचे माजी मंत्री.

जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल. राज्यातील जनतेला भ्रष्टाचारमुक्त राजवट हवी आहे. जम्मू, काश्मीर आणि लडाखचे नागरिक भाजपकडे अपेक्षेने पाहात आहेत. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पक्ष अशा प्रादेशिक पक्षांना लोक कंटाळले आहेत.
-आर.पी.सिंह, भाजप नेते