धुळे जिल्ह्य़ातील बारीपाडा या छोटय़ाशा गावाने पाणी टंचाईपासून मुक्तीसाठी राबविलेली पद्धत सर्वासाठी अनुकरणीय आहे. पाण्याअभावी दर वर्षी उन्हाळ्यात स्थलांतर कराव्या लागणाऱ्या बारीपाडय़ाने श्रमदानातून अशी काही किमया करून दाखवली आहे की, आता टंचाईचा स्पर्शही बारीपाडय़ास होऊ शकत नाही. यंदाच्या तीव्र टंचाईतही या गावास पाण्याची कोणतीही समस्या भेडसावली नाही. ही कहाणी आहे त्याचीच. या कहाणीचा नायक असलेल्या चैत्राम देवचंद पवार या युवकाची.

यंदा महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळ आणि टंचाईने सर्वाचे डोळे उघडले. भूगर्भातील पाण्याची होणारी घट सर्वाचा चर्चेचा विषय झाला. जंगल आणि पाणी अडविण्याचे महत्त्व सर्वाना समजले. कुठे राज्य सरकारच्या सहकार्याने, तर कुठे स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने बंधारे बांधणे, तलाव आणि धरणातील गाळ काढणे अशी कामे सुरू झाली. तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखा हा प्रकार म्हणावा लागेल. धुळे जिल्ह्य़ातील बारीपाडा या छोटय़ाशा गावाने टंचाईपासून मुक्तीसाठी राबविलेली पद्धत सर्वासाठी अनुकरणीय आहे. कधीकाळी पाण्याअभावी दर वर्षी उन्हाळ्यात स्थलांतर कराव्या लागणाऱ्या बारीपाडय़ाने श्रमदानातून अशी काही किमया करून दाखवली आहे की, आता टंचाईचा स्पर्शही बारीपाडय़ास होऊ शकत नाही. यंदाच्या तीव्र टंचाईतही या गावास पाण्याची कोणतीही समस्या भेडसावली नाही. ही कहाणी आहे त्याचीच. या कहाणीचा नायक असलेल्या चैत्राम देवचंद पवार या युवकाची.

sanjay raut
“औरंगजेबाप्रमाणे मोदी अन् शाहांच्या महाराष्ट्रावर स्वाऱ्या”; संजय राऊतांची टीका; म्हणाले, “काही भटकते आत्मे…”
Western Maharashtra Status and Direction of Co operative Movement Maharashtra Day 2024
पश्चिम महाराष्ट्र: सहकार चळवळ दशा आणि दिशा
weather update marathi news, heat wave maharashtra marathi news
पावसाने माघार घेताच उकाड्यात प्रचंड वाढ, काय आहे हवामानाचा अंदाज जाणून घ्या
Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक

गावातून बाहेर पडत एखादी उत्तम नोकरी सहजपणे चैत्राम पवार यास मिळवता आली असती. इतरांप्रमाणे चैनीचे आणि समाधानाचे जीवन जगता आले असते; परंतु आपल्या शिक्षणाचा उपयोग गावासाठी करता आला तरच त्या शिक्षणाला अर्थ असल्याची जाण ठेवत त्याने गावातच राहण्याचा निर्णय घेतला. गावातील एकेका समविचारी व्यक्तीस जोडत गेला. सामूहिकरीत्या प्रयत्न केल्यास गावातील समस्या सहजपणे दूर करता येऊ शकतील, हे ग्रामस्थांना पटवून देण्यात तो यशस्वी झाला. ग्रामस्थांची साथ त्याला मिळत गेली. त्यातून गावाला विकासाची वाट सापडली. या विकासवाटेची दखल केवळ राज्य शासनानेच घेतली असे नव्हे, तर थेट आंतरराष्ट्रीय पातळी या वाटेने गाठली.

धुळे जिल्ह्य़ातील पिंपळनेरपासून २५ किलोमीटर अंतरावर वसलेले बारीपाडा हे सुमारे आठशे लोकवस्तीचे गाव. सध्याचे बारीपाडा म्हणजे सुजलाम् सुफलाम्. परंतु, १९९२ पर्यंत बारीपाडय़ाकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. पिण्यासाठी पोटभर पाणी नाही. किरकोळ पीक.. निरक्षरता.. व्यसनाधीनता.. सर्वत्र उजाड, ओसाड आणि उदासवाणी परिस्थिती. इतर अनेक आदिवासी पाडय़ांप्रमाणे सर्वाच्या लेखी बारीपाडा बेदखल होते; परंतु या गावातील कोणत्याही समस्येची शासकीय पातळीवर आता त्वरित दखल घेतली जाते. समस्या सोडविण्यासाठी शासकीय अधिकारी गावात धाव घेतात. हा बदल चैत्राम पवार यांच्यामुळे घडून आला आहे. चैत्रामची वडिलोपार्जित सतरा एकर शेती आहे. मोठा भाऊ पाटबंधारे विभागात नोकरी करतो. चैत्रामसह लहान भाऊ शेती बघतो. घरात याआधी कोणीही शिकलेले नसल्यामुळे मुलांनी शिक्षण घ्यावे ही चैत्रामच्या वडिलांची इच्छा होती. वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी मिळविलेल्या चैत्रामकडे अगदी अलीकडेपर्यंत गावातील सर्वाधिक शिक्षण घेतलेली व्यक्ती असल्याचा मान होता; परंतु त्याच्याकडूनच प्रेरणा घेत गावातील इतर युवकही गंभीरपणे शिक्षणाकडे पाहू लागल्याने एक जण कायद्याचा पदवीधर झाला आहे.

महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना २४ एप्रिल १९९२ या दिवशी वनवासी कल्याण आश्रमाचे काम करणारे डॉ. आनंद फाटक यांच्याशी चैत्रामची भेट झाली. आदिवासींनी स्वावलंबी व्हावे यासाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने चालणारे काम पाहून चैत्राम प्रभावीत झाला. ही भेट चैत्रामच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. तोपर्यंत इतरांप्रमाणेच आयुष्याची चौकटबद्ध स्वप्ने पाहणारा चैत्राम डॉ. फाटक यांच्या विचारांनी आणि कामाने पूर्णपणे बदलला. जर डॉ. फाटक असे काम करू शकत असतील, तर आपण का नाही, या विचाराने चैत्राममधील सामाजिक कार्यकर्ता जागा झाला. बारीपाडा सुधारण्यासाठी काय करता येऊ शकेल, याविषयी चैत्राम ग्रामस्थांबरोबर चर्चा करू लागला. गाव सुधारण्यासाठी गावाबाहेर जाऊन नव्हे, तर गावात राहूनच प्रयत्न करण्याचे चैत्रामने ठरविले. लोकसहभागाशिवाय गावात एकही काम करता येणार नाही, हे लक्षात घेत तो प्रत्येकाला भेटू लागला. जंगल, जल, जमीन, जनावर, जन या पंचसूत्रीवर काम करण्याचा निश्चय त्याने केला. केवळ जंगल वाढवून चालणार नाही, तर जोडीला मृदसंधारण, पाणी अडविणे आवश्यक ठरेल. हे असे काम करण्यासाठी चांगली जनता म्हणजेच ‘जन’ हवेत. हे ग्रामस्थांना पटवून देण्यात चैत्राम यशस्वी ठरला. प्रत्येक कामावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामविकास समिती तयार करण्यात आली. या समिती अंतर्गत वन व्यवस्थापन, आरोग्य, ऊर्जा आदी उपसमित्या करून कामांची वाटणी करण्यात आली. हळूहळू गावात व परिसरात बदल होऊ लागला. श्रमदानातून परिसरात पाणी अडविण्यासाठी तीनशेपेक्षा अधिक दगडी बांध बांधले गेले. सलग समतल चर करण्यात आले. झाडी लावली गेली. त्यातूनच बघता बघता गाव परिसरात ११०० एकरवर वन उभे राहिले. हे वन म्हणजे जैवविविधतेचे माहेरघरच म्हणावे लागेल. या वनातील ७० टक्के साग ही आता बारीपाडय़ाची अस्सल संपत्ती ठरली आहे. वन आणि बांधांमुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन गावातील पाण्याची समस्या दूर झाली. इतकेच नव्हे, तर परिसरातील इतर आठ गावांनाही त्याचा फायदा झाला. त्याआधी बारीपाडय़ाला शेजारील मांजरी या गावातून पाणीपुरवठा होत असे. सद्य:स्थितीत सर्वत्र भीषण टंचाईची समस्या निर्माण झाली असतानाही बारीपाडय़ातील उपाययोजनांमुळे त्याची धग येथे जाणवत नाही. पाण्याचा अनुकूल परिणाम कुपोषणमुक्तीच्या स्वरूपात पुढे आला. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी कुपोषणग्रस्त असलेल्या बारीपाडय़ात आता कुपोषण नावालाही उरलेले नाही. पाण्यामुळे बागायती पिके घेण्यात येऊ लागली. भात, नागलीचे विक्रमी उत्पादन होऊ लागले. शेती वाढल्याने शेतीपूरक व्यवसायांमध्येही वाढ झाली. शेळीपालन, कुक्कुटपालन, म्हैसपालनाकडे लक्ष देण्यात येऊ लागले. गूळ तयार करणे, पापड, पत्रावळी, दोर, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे, बासमती, इंद्रायणी तांदळाच्या गोण्या गावातच भरून शहरांमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येऊ लागल्या.

ग्रामस्थ आता आपल्या शेतीतून स्ट्रॉबेरीही पिकवू लागले आहेत. पूर्वी गावात पोट भरण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने कुटुंबांचे स्थलांतर ठरलेले असायचे; परंतु पाण्यामुळे शेतीच्या स्वरूपात बदल झाल्याने स्थलांतर होणे थांबले.

परिसरात मोहाच्या वृक्षांची संख्या अधिक असल्याने मोह-फूलविक्रीतून आदिवासींना पैसा मिळू लागला. अशा प्रकारे गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने गावातील श्रमसंख्या गावातीलच कामांसाठी उपयोगात आणणे शक्य झाले. बारीपाडय़ाने केलेल्या प्रगतीमुळे अनेक जण भेट देण्यासाठी येऊ लागले. कॅनडास्थित डॉ. शैलेश शुक्ल यांनी पीएच. डी.साठी बारीपाडय़ाची निवड केली. त्यांनी चैत्राम यांना सुचविलेल्या संकल्पनेतून २००४ पासून वनभाजी पाककला स्पर्धा घेण्यात येऊ लागली. परिसरातील वनभाज्यांचे महत्त्व सर्वाना कळावे हा या स्पर्धेमागील हेतू. पहिल्या वर्षी २७ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. मागील वर्षी १७० स्पर्धकांनी पाककलांचे ७४ प्रकार सादर केले.

गावाचा सर्वागीण विकास कसा होईल, यासाठी चैत्राम प्रयत्न करत आहे. गावातील सर्वानी शिक्षण घेतल्यास अनेक चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातील हे ध्यानात घेत गावात सर्वासाठी शिक्षण सक्तीचे करण्यात आले. प्रौढांसाठी रात्रशाळा घेण्यात येऊ लागली. शिक्षण न घेणाऱ्यास दंड ठोठावण्यात येऊ लागला. गावात चौथीपर्यंत शाळा असून पुढील शिक्षणासाठी पिंपळनेर किंवा साक्री येथे जावे लागते. शिक्षण आणि जनजागृतीमुळे पुरुष कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांचे प्रमाण गावात ५० टक्के आहे. सामुदायिक विवाह सोहळा, क्रीडा स्पर्धा, सामुदायिक शेतीसह विविध उपक्रम राबविले जात आहेत.

अनेक पुरस्कारांनी चैत्रामचा गौरव

एखादी शासकीय योजना आपल्या गावात सुरू होण्यासाठी अनेकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. बारीपाडय़ाच्या बदललेल्या स्वरूपामुळे मात्र शासकीय योजना आपोआप आल्या. बारीपाडय़ाच्या बदलाचे जनक म्हणून चैत्रामला आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात इंटरनॅशनल फंड्स फॉर अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट यांच्या वतीने बँकॉक येथे २००३ मध्ये झालेल्या कार्यक्रमात चैत्रामचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याशिवाय राष्ट्रीय जैवविविधता विकास कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी अंदमान येथे आयोजित कार्यक्रमातही गौरविण्यात आले. याशिवाय राज्य शासनाचा संत तुकाराम वनग्राम, पुण्याच्या नातू फाऊंडेशनतर्फे सेवाव्रती कार्यकर्ता, पु. भा. भावे स्मृती असे अनेक पुरस्कार चैत्राम आणि बारीपाडय़ास मिळाले आहेत. जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवरांनीही बारीपाडय़ाला भेट दिली आहे. दापोली आणि राहुरी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडूनही चैत्रामने बारीपाडय़ातील वनसंपदेसंदर्भात मार्गदर्शन घेतले आहे. बारीपाडय़ात बदल घडवून आणण्यासाठी वनवासी कल्याण आश्रम, पुण्याचे जनसेवा फाऊंडेशन, औरंगाबादचे डॉ. हेडगेवार रुग्णालय यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याचा चैत्रामकडून आवर्जून उल्लेख करण्यात येतो.

avinashpatil@expressindia.com